ऍशेस मालिका : 'ऍशेस'बद्दलच्या 'या' 10 रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

टीम ई-सकाळ
Thursday, 1 August 2019

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना 1877 साली मेलबर्न येथे खेळला गेला. त्यानंतर 1882 साली झालेल्या पहिल्या ऍशेस कसोटी मालिकेत या दोन संघांदरम्यान एकूण 9 कसोटी सामने खेळले गेले. 1882 मध्ये इंग्लंडमध्ये खेळला गेलेला पहिला ऍशेस कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून ऍशेस कसोटीचा 'श्रीगणेशा' केला.

बर्मिगहॅम : गेल्या महिन्यात इंग्लंडमध्येच विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात एजबॅस्टनच्याच मैदानात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. त्यानंतर अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत इंग्लंडने पहिल्यावहिल्या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. 

आजपासून (गुरुवार) येथील मैदानावर ऍशेस कसोटी मालिकेच्या पहिल्या लढतीला सुरूवात झाली असून ऑस्ट्रेलियावर पुन्हा वर्चस्व गाजवण्यासाठी इंग्लंड संघाचा प्रयत्न राहणार आहे. इथून पुढे होणारी प्रत्येक कसोटी मालिका ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार असल्यामुळे सामनाच नव्हे, तर मालिकाही खिशात घालण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असणार, हे नक्की. 

जगप्रसिद्ध असलेल्या ऍशेस मालिकेबद्दल काही रंजक माहिती जाणून घेऊयात :  

- इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना 1877 साली मेलबर्न येथे खेळला गेला. त्यानंतर 1882 साली झालेल्या पहिल्या ऍशेस कसोटी मालिकेत या दोन संघांदरम्यान एकूण 9 कसोटी सामने खेळले गेले. 1882 मध्ये इंग्लंडमध्ये खेळला गेलेला पहिला ऍशेस कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून ऍशेस कसोटीचा 'श्रीगणेशा' केला.  

- 137 वर्षांचा इतिहास असलेली ही 71 वी कसोटी मालिका आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने 33, तर इंग्लंडने 32 वेळा मालिका विजय साजरा केला आहे. तर पाच मालिका बरोबरीत सुटल्या आहेत. दर दोन वर्षांनी ही कसोटी मालिका आयोजित करण्यात येते. या मालिकेत 5 कसोटी सामने खेळले जातात. ऍशेस जिंकल्यानंतर देण्यात येणारी ट्रॉफी फक्त 6 इंचांची आहे. या ट्रॉफीचा इतिहाससुद्धा तितकाच रंजक आहे.

- 1882 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभूत केले होते. हा पराभव इंग्लंडला इतका जिव्हारी लागला होता की, प्रसार माध्यमांनीसुद्धा यावर कठोर शब्दांत टीका केली होती. 'स्पोर्टिंग टाईम्स' या वृत्तपत्राने तर इंग्लंडच्या क्रिकेटचा मृत्यू झाला असेच म्हटले होते.

- इंग्लंडच्या क्रिकेटवर अंत्यसंस्कार केले आणि त्याची राख ऑस्ट्रेलियाने नेली असे वृत्त देण्यात आले होते. त्यानंतर इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाला खेळण्यासाठी गेला होता. तेव्हा ती राख परत आणू असा विश्वास तत्कालिन कर्णधार इवो ब्लोगने संघ सहकाऱ्यांमध्ये निर्माण केला.

- इंग्लंडच्या कर्णधाराला ज्या महिलेने ती ट्रॉफी दिली होती, त्या फ्लोरेन्स मॉर्फीशीच 1884 मध्ये त्याने लग्न केलं. ब्लोगच्या मृत्यूनंतर फ्लोरेन्सनं त्यांच्या प्रेमाचं प्रतिक असलेली ती ट्रॉफी 1929 मध्ये मेलबर्न क्रिकेट क्लबला दिली. आजही ऍशेस ट्रॉफी संग्रहालयात असून विजेत्या संघाला प्रतिकृती दिली जाते.
1998-99 मध्ये क्रिस्टल ट्रॉफी विजेत्या संघाला देण्यास सुरूवात झाली. मूळ ट्रॉफी संग्रहालयातच ठेवली जाते. याआधी 1988 मध्ये आणि 2006-07 मध्ये ती ऑस्ट्रेलियाला नेण्यात आली होती. 

- गेल्या 18 वर्षांत ऑस्ट्रेलियाने एकदाही इंग्लंडमध्ये ऍशेस मालिका जिंकलेली नाही. 2001 मध्ये स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये अखेरची ऍशेस जिंकली होती.

- आतापर्यंत प्रत्येकी तीन वेळा दोन्ही संघांनी मालिकेत एकतर्फी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने 1920, 2006 व 2013मध्ये हा पराक्रम केला, तर इंग्लंडने 1886, 1887 व 1890मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सर्व सामने जिंकले आहेत.

- ऑस्ट्रेलियाकडून सर डॉन ब्रॅडमन हे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले आहेत. त्यांनी 89.8 च्या सरासरीने 5,028 धावा केल्या आहेत. तर इंग्लंडच्या जॅक हॉब्ज यांनी 54.3 च्या सरासरीने 3636 धावा केल्या आहेत. 

- गोलंदाजीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. शेन वॉर्न (195 बळी) आणि ग्लेन मॅकग्रा (157 बळी) या दोन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा विक्रम आजही अबाधित आहे. 

- सध्या जे खेळाडू ऍशेस मालिका खेळत आहेत, त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (2026 धावा) फलंदाजांच्या यादीत आघाडीवर आहे. तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अॅण्डरसन (104 बळी) हा गोलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी विराजमान आहे.


​ ​

संबंधित बातम्या