चाहता म्हणून आला अन्‌ "वर्ल्ड कप' स्टार बनला

वृत्तसंस्था
Sunday, 17 June 2018

स्टेडियमवर जाऊन "याची देही याची डोळा' एखादा सामना पाहणे ही एक अनुभूती असते. ऑस्ट्रेलियाच्या एका मुलाला अशीच अनुभूती झाली आणि प्रेरित होऊन त्याने थेट विश्‍वकरंडकापर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियन संघातील जॅक्‍सन आयर्विन याची यशोगाथा अशीच आहे. 

कझान - स्टेडियमवर जाऊन "याची देही याची डोळा' एखादा सामना पाहणे ही एक अनुभूती असते. ऑस्ट्रेलियाच्या एका मुलाला अशीच अनुभूती झाली आणि प्रेरित होऊन त्याने थेट विश्‍वकरंडकापर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियन संघातील जॅक्‍सन आयर्विन याची यशोगाथा अशीच आहे. 

जॅक्‍सन 12 वर्षांचा असताना सिडनीतील विश्‍वकरंडक पात्रता सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या विश्‍वविजेत्या उरुवेला हरवून 32 वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर विश्‍वकरंडक पात्रता साध्य केली. 2006 च्या स्पर्धेला "सॉकेरूज' पात्र ठरल्यानंतर एकच जल्लोष झाला. त्यात सहभागी झालेल्या जॅक्‍सनसाठी मग फुटबॉल हाच श्‍वास अन्‌ ध्यास बनला. वयाच्या 25व्या वर्षी त्याचा विश्‍वकरंडक संघात समावेश झाला. 

मेलबर्नमध्ये जन्मलेल्या जॅक्‍सनने सेल्टिक ऍकॅडमीत खेळाचा श्रीगणेशा केला. त्याचे वडील स्कॉटलंडचे आहेत. त्यामुळे तो "यूएफा' युवा (19 वर्षांखालील) स्पर्धेत त्याने स्कॉटलंडचे प्रतिनिधित्व केले, पण त्याची पहिली पसंती ऑस्ट्रेलियालाच होती. 2012 मध्ये त्याने 20 वर्षांखालील स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. मग पुढच्याच वर्षी त्याने वरिष्ठ पातळीवर आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो इंग्लिश साखळीतही खेळतो. 2017-18 मध्ये तो द्वितीय श्रेणी साखळीत बरटॉन अल्बिऑनकडून खेळला. त्यानंतर हल सिटीने 25 लाख डॉलरचा करार त्याच्याशी केला. 

जिगरी दोस्तही संघात! 
ऑस्ट्रेलियन संघात जेमी मॅक्‍लारेन नावाचा खेळाडू आहे. तो आणि जॅक्‍सन खास मित्र आहेत. लहानपणापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न पाहायचे. प्रशिक्षक बर्ट वॅन मार्विक यांनी निवडलेल्या 26 जणांच्या प्राथमिक संघात जेमीची निवड झाली नव्हती. त्यामुळे तो दुबईला सहलीसाठी गेला होता. दरम्यानच्या काळात टॉमी ज्युरीचला दुखापत झाली. त्यामुळे जेमीला पाचारण करण्यात आले. दुबई सहलीसाठी जेमीने नवे बूट खरेदी केले होते. "कॉल' येताच त्याने "स्टड्‌स' चढविले आणि तो सज्ज झाला.


​ ​

संबंधित बातम्या