जोफ्रा आर्चर : निधड्या छातीचा, जबरदस्त जिद्दीचा तेजतर्रार गोलंदाज

मुकुंद पोतदार
Wednesday, 22 May 2019

इंग्लंडचे दोन अतीशय खडूस असे आजी-माजी ज्याची मुक्तकंठाने स्तुतीत करीत होते-आहेत आणि असतील तो वेगवान गोलंदाज हाच. अँड्र्यू फ्लिंटॉफ यांनी आयपीएलनंतर म्हटले होते की, इंग्लंडने कुणालाही संघातून काढावे, पण आर्चरला घ्यावे. 

क्रिकेटचा खेळ कोणताही असला तरी फलंदाजांनी मारलेले शैलीदार किंवा जोरदार शॉट््स पाहणे ही पर्वणी असते. त्यांच्या बॅटमधून सीमापार होणारे चेंडू पाहणे नेत्रसुखद असते. क्रिकेट हा फलंदाजांचे अधिपत्य असलेला खेळ आहेच, पण या खेळातील आणखी एक दृश्य नेत्रदिपकच नव्हे तर थरारक-रोमांचक असते आणि ते म्हणजे तेजतर्रार गोलंदाजांनी लयबद्ध वेगाने धावत येऊन सुत्रबद्ध मारा करीत टाकलेले चेंडू. असे चेंडू फलंदाजांना चकवितात. त्यांची भंबेरी उडवितात. कधी उसळत्या चेंडूवर फलंदाज चकतो, तर यॉर्करमुळे गडबडतो. ताशी 90-100 मैल वेगाने तिखट मारा करणारे तेजतर्रार गोलंदाज क्रिकेटप्रेमींना भावतात. असे गोलंदाज फलंदाजाला चकविल्यानंतर फॉलोथ्र्यूमध्ये त्याच्या नजरेला नजर भिडवितात. काही जण काही वेळा (खरे तर अनेक जण अनेक वेळा) चार पावले पुढे टाकत क्रिझपर्यंत जाऊन धडकतात आणि आक्रमक देहबोली प्रदर्शित करतात. काही वेळा धाव काढणाऱ्या फलंदाजाला ढुशी देण्यासही ते मागे पुढे पाहात नाहीत.

तेजतर्रार गोलंदाजांमध्ये वेस्ट इंडिजचे माल्कम मार्शल, मायकेल होल्डिंग, कोर्टनी वॉल्श, कर्टली अँब्रोस, ऑस्ट्रेलियाचे डेनिस लिली, जेफ थॉमसन, ग्लेन मॅक््ग्रा, ब्रेट ली, न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली, शेन बाँड, दक्षिण आफ्रिकेचे शॉन पोलॉक, डेल स्टेन, पाकिस्तानचे इम्रान खान, वसिम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर, महंमद आमीर, अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. डावखुरे फलंदाज उपजत शैलीदार मानले जातात आणि ते तसे असतातच. डावखुरेपणाचा हा निकष वेगवान गोलंदाजांना मात्र लागू केला जात नाही आणि यांत क्रिकेटमध्ये सर्वच पातळ्यांवर सर्व जण फलंदाजांना झुकते माप देतात हे सिद्ध होते.

अर्थात यानंतरही क्रिकेटच्या इतिहासात वेगवान गोलंदाजांनी आपले खास स्थान निर्माण केले आहे. खास करून हे तेजतर्रार गोलंदाज पदार्पण करतात तेव्हा ते तरुण अन्् पर्यायाने चुस्त-तंदुरुस्त असतात. तेव्हा गमावण्यासारखे काहीच नसल्यामुळे ते निधड्या छातीने अन् निर्धाराने मारा करतात. त्यामुळे असे गोलंदाज लक्षवेधी ठरतात. वेगवान गोलंदाजाच्या रन-अपप्रमाणे अनेक पावले चालत (खरे तर धावत) आलेली ही प्रस्तावना अखेर थांबवून आपण स्वागत करूयात जोफ्रा आर्चरचे, ज्याची इंग्लंडच्या विश्वकरंडक संघात निवड झाली आहे.

इंग्लंडचे दोन अतीशय खडूस असे आजी-माजी ज्याची मुक्तकंठाने स्तुतीत करीत होते-आहेत आणि असतील तो वेगवान गोलंदाज हाच. अँड्र्यू फ्लिंटॉफ यांनी आयपीएलनंतर म्हटले होते की, इंग्लंडने कुणालाही संघातून काढावे, पण आर्चरला घ्यावे. 

ब्रॉड याचीही मागणी

फ्लिंटॉफ हे तर निवृत्त झाले आहेत, पण ज्याची कारकिर्द सक्रीय आहे आणि जो फ्लिंटॉफ यांच्याप्रमाणेच खडूस आहे त्या स्टुअर्ट ब्रॉड यानेही आर्चरला पाठिंबा दिला. आर्चर अॅशेस मोहिमेचा घटक असायला हवा, असे ब्रॉडने म्हटले आहे. जो आर्चर मुळात इंग्लंडमध्ये जन्मलेला नाही, जो नियम शिथील झाल्यामुळे यंदा मार्च महिन्यातच प्रतिनिधीत्वास पात्र ठरला, जो आंतरराष्ट्रीय पातळीवर निवडक सामने खेळला आहे, त्याच्याविषयी इतके आग्रही मत व्यक्त होणे आश्चर्याचे वाटले असते, पण आर्चरची शैली, दृष्टिकोन बघता ते योग्यच असल्याचे दिसून येते.

आयपीएलमुळे प्रकाशझोतात

केवळ तीन वन-डे आणि एक टी20 सामना खेळलेला 24 वर्षी आर्चर आयपीएलमुळे प्रकाशझोतात आला. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा, वेस्ट इंडिजचा अल्झारी जोसेफ आणि आर्चर यांची कामगिरी आयपीएलच्या बाराव्या मोसमाची वैशिष्ट्ये ठरली. आयपीएलनंतरच आर्चरच्या निवडीसाठी होणाऱ्या मागणीने जोर पकडला. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने रोहित शर्मा, कायरन पोलार्ड आणि क्विंटन डीकॉक असे तीन मोहरे गारद केले. 11 सामन्यांत 11 विकेट घेतलेला आर्चर हे इंग्लंडसाठी फाईंड ठरले असे म्हणावे लागेल. राजस्थान रॉयल्समधील सहकारी जॉस बटलर आणि सनरायझर्स हैदराबादमधील जॉनी बेअरस्टॉ यांच्या फलंदाजीची चर्चा सुद्धा आर्चरने झाकोळून टाकली.

दिग्गजांना ओपन चॅलेंज

दुर्दम्य आत्मविश्वास हे आर्चरचे बलस्थान आहे. तो Big Match Player आहे. कमालीच्या दडपणाखाली कमाल कामगिरी उंचावण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. विश्वकरंडकासाठी निवड झाल्यानंतर त्याने दिलेल्या मुलाखतीत त्याच्या मानसिकतेचा एक पैलू दिसून आला. तेज गोलंदाज हे तिखट मारा करतात. ते फलंदाजाविरुद्ध मानसिक चकमकही करीत असतात. आर्चरने तसे करताना ओपन चॅलेंज दिले आहे ते आजघडीच्या दिग्ग फलंदाजांना. भारताचा विराट कोहली आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल असे दोन मोहरे आपल्या रडारवर असल्याची गर्जना करीत त्याने रणशिंग फुंकले. 

तो म्हणतो की, विराटला आऊट करायला मला फारच आवडेल, कारण आयपीएलमध्ये मी त्याला बाद करू शकलो नाही. तेव्हा जवळपास प्रत्येक सामन्यात त्याला लेगस्पीनरने बाद केले होते वाटते. एबी डिव्हीलीयर्स याच्याविरुद्धही मला गोलंदाजी करायची होती, पण तो खेळणार नय्ये. याशिवाय ख्रिस गेल सुद्धा.

आर्चरने जवळपास प्रत्येक फलंदाजाचा होमवर्क केला आहे आणि यात त्याच्या संघातील सहकाऱ्यांचाही समावेश असल्याचे या मुलाखतीतून दिसून आले. राजस्थान रॉयल्समधील सहकारी जॉस बटलर हा गोलंदाजी करण्यास सर्वाधिक खडतर फलंदाज असल्याचे त्याने नमूद केले. मी सामोरा गेलो त्यांच्यातील सर्वोत्तम होता बटलर. त्याला मी नेटमध्ये गोलंदाजी केली. तो 360 डिग्रीचे कौशल्य असलेला क्रिकेटपटू आहे. तो तुमचा चेंडू स्ट्रेट शॉटवर थेट मैदानाबाहेर किंवा यष्टिरक्षकाच्या डोक्यावरूनही भिरकावून देऊ शकतो. त्याच्याबाबतीत कोणतेच ठिकाण सुरक्षित नाही.

आयपीएलमुळे दडपणाची सवय

आर्चरने आयपीएलचा आवर्जून उल्लेख केला आहे. त्याने सांगितले की, आमच्या संघातील काही खेळाडूंच्या तुलनेत मला जास्त फायदा होईल. याचे कारण आयपीएलमुळे मी बऱ्याच खेळाडूंविरुद्ध आयपीएलच्या एका मोसमात जवळपास दोन वेळा खेळलो आहे. त्यामुळे त्यांचे कच्चे-पक्के दुवे मला माहित आहेत. त्यांचे रनिंग बिटवीन द विकेट््स कमकुवत आहे का हे सुद्धा ठाऊक असते. तुमच्याकडे आतील गोटातली माहिती असते.

आयपीएल तर इंटरनॅशनलच

प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चुरस आयपीएलइतक्याच तीव्रतेची असते. फरक एकच असतो तो षटकांच्या संख्येचा आणि तो म्हणजे आयपीएल ही टी20 स्पर्धा आहे, असे आर्चरचे विधान त्याचा दृष्टिकोन किती परिपक्व आहे हे दाखवून देते.

आता लक्ष फक्त वर्ल्ड कपवर

आर्चर वर्ल्ड कपच नव्हे तर त्यानंतर होणाऱ्या अॅशेसमध्येही सहभागी व्हायला हवा अशी चर्चा आहे. कसोटी संघात स्थान मिळण्याची किती संधी आहे, या प्रश्नावर तो म्हणतो की, त्यांनी माझी निवड केली तर मला जणू काही चंद्रावर गेल्यासारखे वाटेल, पण या घडीला विचार करायचा आहे तो वर्ल्ड कपचा. मी आत्ताच संघात प्रवेश केला आहे. त्यामुळे थेट कसोटी संघात निवड होण्याची मला अपेक्षा नाही. तरिही निवड झाली तर मी घाम गाळत कसून सराव करेन. जर निवडले नाही तर मी ससेक्स कौंटी सगात परतेन आणि कामगिरी करीत राहीन.

खुल्या दिलाने स्वागत

आर्चरचे संघात अनपेक्षित आगमन झाले असले तरी सहकाऱ्यांनी खुल्या दिलाने स्वागत केले. आपण एका खरोखरच चांगल्या संघाचे घटक बनलो आहोत, ज्यात ग्रेट खेळाडू आहेत, ग्रेट कर्णधार आहे, सपोर्टस्टाफ आणि प्रशिक्षकही ग्रेट आहेत, असे तो सांगतो.

दडपण असेल, पण कौंटीचा फायदा

जागतिक वन-डे क्रमवारीत अव्वल स्थान आणि संभाव्य विजेते म्हणून मायदेशात वर्ल्ड कप खेळण्याचे दडपण येईल का, या प्रश्नावर त्याने सांगितले की, संघातील गुणवत्तेचा मुद्दा असला तरी मायदेशातील स्पर्धेचे दडपण असेल, पण प्रदिर्घ कौंटी मोसमात अनुकूल निकाल साध्य करण्याचा अनुभव खेळाडूंना आहे. तो सहा आठवड्यांच्या दिर्घ मोहीमेत कामी येईल. कौंटी मोसम पाच-सहा महिन्यांचा असतो. त्या कालावधीत अथक क्रिकेट चालते. आम्ही असेही मार्च ते सप्टेंबरदरम्यान खेळत असतो. त्यामुळे आमच्या कोणत्याही खेळाडूला वेगळे वाटणार नाही. इतर बहुतांश संघांचा मोसम या कालावधीचा नसतो. ते या काळात सहसा क्रिकेट खेळत नाहीत. आम्हाला अशा छोट्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो.

आर्चरचा दृष्टिकोन, मानसिकता बघता तो खरोखरच सुसज्ज झाल्याचे दिसून येते. इंग्लंडच्या मोहिमेत आर्चरची निवड हा टर्निंग पॉइंट ठरू शकेल असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरू नये. त्यामुळे आर्चरच्या रन-अपकडे आपण लक्ष ठेवूयात.


​ ​

संबंधित बातम्या