शेतकऱ्याचंच पोर ते, मातीशी जोडून राहणारच!

हर्षदा कोतवाल
Tuesday, 5 November 2019

माझं आणि शेतकऱ्यांचा एक वेगळं नातं आहे असं म्हणून तो थांबत नाही तर कोणताही गाजावाजा न करता मीडियापासून सगळ्या गोष्टी लपवून उस्मानाबाद मधील शेतकऱ्यांना गेली तीन वर्षे मदत करतो आहे.

''या आधी कधीच बोललो नव्हतो पण मी क्रिकेट खेळायला सुरवातच मुळात वावरात केली. संगमनेरला आमची शेती आहे, आजही आजी आजोबा तिथे राबतात. मी पहिल्यांदा क्रिकेट शेतातच खेळलो.'' असं म्हणतं त्यानं सुरवात केली आणि मला कळालं की हा माणूस खूप प्रगल्भ आहे.

Happy Birthday Virat Kohli : वाढदिवशी विराटने लिहले स्वत:लाच भावूक पत्र

 माझं आणि शेतकऱ्यांचा एक वेगळं नातं आहे असं म्हणूनच तो थांबत नाही तर कोणताही गाजावाजा न करता मीडियापासून सगळ्या गोष्टी लपवून उस्मानाबाद मधील शेतकऱ्यांना गेली तीन वर्षे मदत करतो आहे. शेतातच क्रिकेट खेळायला सुरवात केलयाने दक्षिण आफ्रिकेतील खराब खेळपट्ट्यावरही अत्यंत सहजपणे खेळू शकलो असे अभिमानाने सांगण्यासही तो विसरत नाही.

यापूर्वीही वेळोवेळी त्याने शेतकऱ्यांबद्दल आदर दाखविणारे, त्यांच्या कामाबद्दल त्याचे आभार मानणारे ट्विट केले आहेत. मला नेहमी वाटायचे की हे खेळाडू फक्त ट्विट करतात आणि थांबतात, शोऑफ करायला काय जातंय यांना? मात्र, हे शेतकऱ्याचं पोर मातीशी जोडून नसतं राहिलं तर नवलंच. ''गावाला गेल्यावर मी पाहायचो माझी आजी पहाटे चार वाजता उठून शेतात राबायची. मी माझ्या काकासोबत नांगर चालवायचो. मला अजूनही बैलगाडी आणि नांगर प्रचंड आवडतात. कदाचित मैदानात नांगर टाकतो त्याचं हेच कारण असेल,'' असं म्हणाला आणि तो दिलखुलास हसला.

 

पाहा पूर्ण मुलाखत

क्रिकेट खेळायला जेव्हा त्यानं सुरवात केली तेव्हा तो तब्बल सहा ते दहा किमी चालत सरावाला जायचा. का? तर रिक्षा किवा बसने जाण्याची परिस्थिती नव्हती. मात्र, एवढ्या बिकट परिस्थितीतही गावी शेती करणाऱ्या आजी आणि काकांना लागेल ती मदत करा असा तो त्याच्या बाबांकडे हट्ट करायचा. आपण आपापल्या घरी बसून टिव्हिवर पावसामुळे, दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे झालेले हाल पाहतो, तेवढ्यापुरती हळहळ व्यक्त करतो आणि त्यानंतर विसरुन जातो. आपल्या याच वृत्तीला हळूवार पिन टोचताना तो म्हणाला, ''आपण आज जे काही आहोत ते फक्त शेतकऱ्यांमुळेच. टिव्हिवर दिसणारं सारं ग्लॅमर खोटं आहे, आपले शेतकरीच देशाचे रिअल हिरो आहेत.

Happy Birthday Virat Kohli : सुरवंटाचं फुलपाखरु झालं...

उस्मानाबादचा समानार्थी शब्द म्हणजे दुष्काळ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुण्यात यंदा जर 200 टक्के पाऊस पडला असेल तर उस्मानाबादमध्ये फक्त 8 टक्के. अशा या परिस्थितीत शेतकऱ्यांचे काय हाल झाले असतील याचा फक्त विचार केलेलाच बरा. उस्मानाबादची शेळी म्हणजे तिथला देवदूतच समजा. या शेळीच्या दुधाला अमृताएवढी किंमत आहे असे म्हटलं तरी ते योग्यच ठरेल. अशा या शेळीच्या मदतीने उस्मानाबादमधूल दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पोटापाण्याची सोय करुन देणारा हक्काचा पर्याय शिवार संसद या संस्थेनं निर्माण करुन दिला. या शेळीच्या दूधापासून शिवारनं अगदी नॅचरल साबण तयार करुन त्याची विक्री करण्यास सुरवात केली आहे. षिवार हे साबण नुसतेच तयार करुन थांबलं नाही तर त्याचं पेटंटही घेतलं आहे. आता तुम्ही म्हणाल या सर्वांत अजिंक्य रहाणेचं काय काम?

शिवार सुरु केलं ते कोल्हापूरमधल्या एका शेतकऱ्याच्या पोरानं. बीएससी अॅग्रीकल्चर शिकलेल्या पोराला काहीही करुन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या आहेत आणि महाराष्ट्रात दुर्देवाने सर्वाधिक आत्महत्या उस्मानाबादमध्ये होतात. आता कोल्हापूरमध्ये ऑफिस थाटून, तिथे बसून तर उस्मानाबादमधील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. पण उस्मानाबादमध्ये ऑफिस थाटायचं, तिथल्या शेतकऱ्यांना समुपदेशन द्यायचं तर यासाठी लागणारे पैसे आणायचे तरी कुठून? आणि इथेच अजिंक्य रहाणे खंबीरपणे उभा राहतो. 

बीसीसीआयने 'तो' व्हिडिओ शेअर करून 'रन मशीन'ला दिल्या शुभेच्छा

आजही महाराष्ट्रात शेतजमीन विकून मुलीचं थाटात लग्न लावून देण्याची प्रथा आहे. अशावेळी शेतकऱ्यांना लग्नासाठी जमिनी विकण्यापासून थांबवण यासाठी समुपदेशन करावं लागलं. उस्मानाबादमध्ये जाऊन ऑफिस थाटायला लागलेला सगळा खर्च, चार भिंती बांधून न थांबता ऑफिसमध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू म्हणजेच कॉम्प्युटर, प्रिंटर, प्रोजेक्टर, टेबल खुर्ची अशा सगळ्या वस्तूंचा खर्च अजिंक्यनं उचलला. गेली तीन वर्षं आता तो शिवारसोबत काम करतो आहे. महाराष्ट्र आत्महत्यामुक्त करण्यासाठी कोणताही गाजावाजा न करता काम करतो आहे. अजून बरंच काम करायचंय म्हटल्यावर तो म्हणतो ''भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन आहे. आपल्याकडे पेशन्सची कमतरता नाहीये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचे कल्याण होत नाही तोवर आपण काम करत राहायचं.''

हे सगळं त्याच्यासमोर बसून त्याच्या तोंडातून ऐकल्यावर मला एकच प्रश्न पडतो, हे शेतकऱ्याचं पोर अशा अजून किती संस्थांसोबत काम करत असेल? शेतकऱ्यांसाठी एवढा मन लावून, पोटतिडकीनं काम करणारा मी पाहिलेला हा पहिलाच क्रिकेटपटू असेल कदाचित. 

अजिंक्य तुला जेंटलमन का म्हणतात यावर आता माझं काहीचं दुमत नाही!


​ ​

संबंधित बातम्या