आर्चरने 6 वर्षापूर्वी ट्विटमध्ये केला होता 'रिया'चा उल्लेख ; सोशल मीडियावर चर्चा

टीम ई-सकाळ
Monday, 24 August 2020

गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय आयसीसी विश्वचषक स्पर्धेदरम्यान वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आपल्या ट्विटबद्दल बर्‍याच चर्चेत होता.

गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय आयसीसी विश्वचषक स्पर्धेदरम्यान वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आपल्या ट्विटबद्दल बर्‍याच चर्चेत होता. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने केलेले काही वर्षांपूर्वी केलेले हे ट्विट त्यानंतर बऱ्याच काळापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जोफ्रा आर्चरने केलेले हे ट्विट सध्याच्या परिस्थितीवर अचूकपणे जुळत असल्याचे काहीसे चित्र पाहायला मिळत असल्याची चर्चा भारतीय जनमानसात उमटत आहे. नुकतेच आर्चरच्या या ट्विटमध्ये 'रिया' हे नाव सापडल्यामुळे सर्वच भारतीयांमध्ये याविषयी कुतहूल निर्माण होऊन, सोशल मीडियावर याविषयीची चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावरील काही जणांनी जोफ्रा आर्चरचे हे ट्विट शेअर करताना, आर्चरला गॉड किंवा टाइम मशीन म्हटले आहे. 

शतकांनी हुलकावणी दिलेला भारताचा सलामीवीर काळाच्या पडद्याआड 

चित्रपट सृष्टीतील अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपास सुरू केला आहे. या तपासणीत सुशांतसिंग राजपूतची मैत्रीण व अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची देखील चौकशी केली जात आहे. आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनली आहे. मात्र इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरने 16 जुलै 2014 रोजी 'रिया आणि टेसल' असे सोशल मीडियावर लिहीत ट्विट केले होते. या ट्विट मध्ये लिहिलेल्या 'टेसल' चा अर्थ दरवाजा किंवा खिडकीच्या पडद्याला बांधण्यासाठी अथवा अशा कोणत्याही गोष्टीला नकळत सैल बांधण्यासाठीचा रेशमाचा गुच्छ. आणि महत्वाचे म्हणजे सुशांतसिंग राजपूतने स्वत: ला फाशी घेऊन आत्महत्या केली होती. 

त्यामुळे काही जणांनी जोफ्रा आर्चरचे हे ट्विट पाहून त्याचा संबंध सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येशी जोडत, आर्चरला सहा वर्षांपूर्वीच सर्व काही माहित असल्याचे म्हटले आहे. तसेच आर्चरकडे टाइम मशीन आहे म्हणून त्यामुळेच त्याला याअगोदरच सर्व काही माहित होते, असे सोशल मीडियावर म्हटले आहे. तर काही जणांनी त्याला 'देव' म्हणून देखील संबोधण्यास सुरवात केली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावरील काही जणांनी जोफ्रा आर्चरचे सर्व ट्विट पाहण्याची गरज असल्याचे म्हणत, कदाचित त्यामध्ये कोरोना कधी संपणार याबाबत लिहिले असण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. 

लुकाकूच्या आत्मघाती गोलमुळे युरोपा लीगमध्ये सेविलाची खिताबावर मोहर   

दरम्यान, इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर आपल्या धोकादायक आणि धारदार गोलंदाजी साठी ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या काळानंतर सुरु झालेल्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावेळेस जोफ्रा आर्चरने जैव-सुरक्षित नियमाचा भंग केला होता. त्यानंतर त्याच्यावर चहुबाजुंनी टीका करण्यात आली होती.


​ ​

संबंधित बातम्या