जागतिक मैदानी स्पर्धा : भालाफेकीत अनू राणीचे आठवे स्थान

नरेश शेळके
Wednesday, 2 October 2019

जागतिक मैदानी स्पर्धेत पात्रता फेरीत राष्ट्रीय विक्रम केल्यानंतर अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र अंतिम फेरीत त्या अपेक्षांची पूर्ती करू शकली नसली तरी आठवे स्थान मिळविल्याचा निश्चितच आनंद आहे. आता माझे लक्ष्य टोकीयो आॉलिंपीकमध्ये पदक जिंकणे आहे, अशी प्रतिक्रीया भारताची भालाफेकपटू अनू राणीने दिली.

दोहा : जागतिक मैदानी स्पर्धेत पात्रता फेरीत राष्ट्रीय विक्रम केल्यानंतर अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र अंतिम फेरीत त्या अपेक्षांची पूर्ती करू शकली नसली तरी आठवे स्थान मिळविल्याचा निश्चितच आनंद आहे. आता माझे लक्ष्य टोकीयो आॉलिंपीकमध्ये पदक जिंकणे आहे, अशी प्रतिक्रीया भारताची भालाफेकपटू अनू राणीने दिली.

अंजू जॉर्जनंतर अंतिम आठ खेळाडूंत स्थान मिळविणारी ती आता दुसरी भारतीय महिला अॅथलिट् ठरली आहे. पात्रता फेरीत अनूने 62.43 सेकंदाचा नवीन राष्ट्रीय विक्रम केला होता. अंतिम फेरीत तिला 61.12 मीटर अंतरावरच भाला फेकता आला. गेल्यावर्षी जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेपर्यंत ती काशिनाथ नाईक यांच्याकडे प्रशिक्षण घेत होती. जकार्तातील अपयशानंतर (सहावे स्थान) ती भारतीय संघाचे जर्मन प्रशिक्षक उवे हॉन यांच्याकडे प्रशिक्षण घेऊ लागली. त्यामुळे तिच्या कामगिरीत बरीच सुधारणा झाली. यंदा तिने दहावेळा साठ मीटरच्या भाला फेकण्याची कामगिरी केली आहे. याविषयी अनू म्हणाली, 2018 माझ्या जीवनातील सर्वात कठीण वर्ष होते. शारीरिक व मानसीकदृष्ट्या खचले होते. परत येण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. संघर्ष केल्यानंतर खेळाडू कसा पुढे जातो, हे मला 2018 ने शिकविले. उवे हॉन यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम तंत्रात बदल केला. अजूनही सुधारणा करायची आहे.  

टोकीयो आॉलिंपीकसाठी 64 मीटरची पात्रता आहे. याविषयी उत्तर प्रदेशातील मेरठ जवळच्या बादलपूर गावची असलेली अनू म्हणाली, पात्रता गाठण्यासाठी कोणत्या स्पर्धा खेळायच्या हे प्रशिक्षकाशी चर्चा केल्यानंतरच सांगता येईल. माझ्यात क्षमता आहे, फक्त तंत्रात आणि मानसीकतेत थोडा बदल करावा लागेल. कारण सरावात जी कामगिरी करते, ती कामगिरी स्पर्धेत होत नाही. यात सुधारणा झाली तर नक्कीच 64 मीटरपेक्षा अधिक भाला फेकून देशासाठी टोकीयो आॉलिंपीकमध्ये पदक जिंकण्याची इच्छा आहे. 

यात आॉस्ट्रेलियाच्या केल्सी बार्बरने अंतिम फेकीत 66.56 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या शियींग लियुची रौप्य तर विद्यमान आशियाई विजेत्या हुईहुई यु हिची ब्राँझपदकावर घसरण झाली. याबाबत अनू म्हणाली, स्पर्धा अशीच असते. शेवटपर्यंत कुणी सांगू शकत नाही की कोण जिंकणार, अंतिम क्षणी कुणीही बाजी मारून जाऊ शकतो. 

दरम्यान पुरुषांच्या आठशे मीटर शर्यतीत अमेरिकेच्या डोनाव्हन ब्रेझीयरने स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. त्याने स्पर्धा विक्रम करताना केनियाच्या बिली कोन्चेलाचा 1987 च्या स्पर्धेत नोंदविलेला 1 मिनिटे 43.06 सेकंदाचा विक्रम मोडला. 

इतर निकाल : पुरुष - दोनशे मीटर - नोह लेलेस (अमेरिका, 19.83 सेकंद), आंद्रे दी ग्रास (कॅनडा, 19.95 सेकंद), अॅलेक्स क्विनोनेझ (इक्वेडोर, 19.98 सेकंद), आठशे मीटर - डोनाव्हन ब्रेझीयर (अमेरिका, 1 मि.42.34 सेकंद), अमेल तुका (बोस्निया व हर्झेगोवीना, 1 मि. 43.47 सेकंद), फर्गुसन रोटीच (केनिया, 1 मि.43.82 सेकंद), पोल व्हॉल्ट - सॅम केंड्रीक्स (अमेरिका, 5.97 मीटर), अर्मांड डुप्लॅन्टीस (स्वीडन, 5.97 मीटर), पिओत्र लिसेक (पोलड, 5.87 मीटर). 
महिला - भालाफेक - केल्सी बार्बर (आॉस्ट्रेलिया, 66.56 मीटर), शियींग लियु (चीन, 65.88 मीटर), हुईहुई यू (चीन, 65.49 मीटर). 
महत्वाचे
- पुरुष आठशे मीटरमध्ये अमेरिकाला प्रथमच सुवर्ण
- पुरुष दोनशे मीटरमध्ये अमेरिकाला 2007 नंतर प्रथमच सुवर्ण
-पोल व्हॉल्टमध्ये सॅम केंड्रीक्स सलग दुसऱ्यांदा विजयी, यापूर्वी फक्त सर्गेई बुबकाला सलग विजेतेपद.
-महिला भालाफेकीत आॉस्ट्रेलियाला प्रथमच सुवर्ण


​ ​

संबंधित बातम्या