रेयाल माद्रिदची पीछेहाट कायम

वृत्तसंस्था
Thursday, 19 September 2019

-नेमार अपात्र, तर किलिन एम्बापो तसेच एडिनसन कॅव्हिनी जखमी; तरीही पीएसजीने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत रेयाल माद्रिदचा 3-0 असा सहज पराभव केला.

-अखेरच्या वीस मिनिटांत दोन गोल करीत ऍटलेटिकोने युव्हेंटिसला रोखले.

-मॅंचेस्टर सिटीने प्रीमियर लीगमधील पराभवातून सावरताना शाख्तार दॉनेत्सकचा 3-0 पाडाव केला.

लंडन ः नेमार अपात्र, तर किलिन एम्बापो तसेच एडिनसन कॅव्हिनी जखमी; तरीही पीएसजीने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत रेयाल माद्रिदचा 3-0 असा सहज पराभव केला. अँगेल डे मारियाने या विजयात मोलाची कामगिरी बजावताना जणू गतमोसमातील रेयाल संघाचा दर्जा फारसा उंचावला नसल्याचेच दाखवले. 

ऍटलेटिको माद्रिदने अखेरच्या मिनिटात गोल करीत युव्हेंटिसला रोखले. ख्रिस्तियानो रोनाल्डोची ऍटलेटिकोने मोक्‍याच्या वेळी कोंडी केली आणि त्यानंतर चांगला प्रतिकार केला होता. मॅंचेस्टर सिटीने जणू आपली ताकद दाखवत विजय मिळविला. 

खेळाडूंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर रक्कम दिल्यानंतरही पीएसजी युरोपात निष्प्रभच ठरले आहेत. त्यांना गेल्या स्पर्धांत उपउपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली आहे. पण, या वेळी किमान विजयी सुरवात होईल, याची काळजी अँगेल डे मारियाने घेतली. या स्पर्धेतील यापूर्वीच्या रेयालविरुद्धच्या लढतीत पीएसजी पराजित झाले होते. पण, या वेळी त्यांची पुनरावृत्ती टाळली. या वेळी जसे खेळावर वर्चस्व राखले, तसेच सातत्याने राखणे आवश्‍यक आहे, असे पीएसजीचा कर्णधार थिएगो सिल्वा याने सांगितले. 
तेरा वेळचे विजेते रेयाल गट तुलनेत सोपा असल्याने आगेकूच करू शकतील. पण, त्यानंतरचे आव्हान अवघड असल्याची जाणीव रेयालला झाली. पीएसजी आमच्यापेक्षा सर्वच बाबतीत सरस होते. पण, आम्ही जोशही दाखवला नाही, हे सलत असल्याचे झिनेदिन झिदान यांनी सांगितले. 

ऍटलेटिकोने युव्हेंटिसला रोखले

अखेरच्या वीस मिनिटांत दोन गोल करीत ऍटलेटिकोने युव्हेंटिसला रोखले. नवोदित जाओ फेलिक्‍स वि. ख्रिस्तियानो रोनाल्डो, असे लढतीचे वर्णन केले जात होते. पण, ऍटलेटिकोच्या यशस्वी प्रतिकाराने ही चर्चाच मागे पडली. रोनाल्डोची मोक्‍याच्या वेळी कोंडी करण्यात ऍटलेटिको यशस्वी ठरले. विजय गृहीत धरला आणि त्याचा फटका बसला, अशी कबुली युव्हेंटिसचे मार्गदर्शक मॉरिझिओ सारी यांनी दिली. लोकोमोतिव मॉस्कोने बायर लिव्हरकुसेनला 2-1 हरवत गटात आघाडी घेतली. 

मॅंचेस्टर सिटीचा  विजय

मॅंचेस्टर सिटीने प्रीमियर लीगमधील पराभवातून सावरताना शाख्तार दॉनेत्सकचा 3-0 पाडाव केला. एक लढत हरलो, तर आम्हाला लक्ष्य करण्यात आले. आमच्या क्षमतेबाबत शंका घेण्यात आली. आमची ताकद दाखवली, असे सिटीचे मार्गदर्शक पेप गॉर्डिओला यांनी सांगितले. बायर्न म्युनिचने बेलग्रेडचे आव्हान परतवले. गत उपविजेत्या टॉटनहॅमने ऑलिम्पिकॉसविरुद्ध सुरवातीची दोन गोलची आघाडी दवडली. 


​ ​

संबंधित बातम्या