विजयानंतर मरेला अश्रू अनावर; वॉशिंग्टन ओपनमधून माघार

वृत्तसंस्था
Saturday, 4 August 2018

सलग तिसऱ्या फेरीत मरेला तीन सेटपर्यंत झुंजावे लागले. सामन्यानंतर तो भावविवश झाला होता. चेहरा टॉवेल झाकून त्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हा सामना मध्यरात्री तीन वाजता संपला.

वॉशिंग्टन : ब्रिटनच्या अँडी मरेने वॉशिंग्टन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने 93व्या क्रमांकावरील रुमानियाच्या मॅरीयूस कॉपीलवर 6-7 (5-7), 6-3, 7-6 (7-4) अशी मात केली. या विजयासह त्याने दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी वॉशिंग्टन ओपन आणि पुढील आठवड्यात होणाऱ्या रॉजर कपमधून माघार घेतली आहे. यापूर्वी रॉजर फेडररनेही रॉजर कपमधून माघार घेतली आहे. 

सलग तिसऱ्या फेरीत मरेला तीन सेटपर्यंत झुंजावे लागले. सामन्यानंतर तो भावविवश झाला होता. चेहरा टॉवेल झाकून त्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हा सामना मध्यरात्री तीन वाजता संपला.

 

कॉपीलविरुद्धच्या सामन्यानंतर त्याची पुढील लढत ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्‍स डी मिनौरविरुद्ध होती. मात्र सलग चार दिवस खेळल्यामुळे थकलेल्या मरेने स्पर्धेतून माघार घेतली. तो म्हणाला, ''मागील 18 महिने कोर्टपासून मी लांब होतो, आता अचानक सलग चार दिवस खेळून मी प्रचंड थकलो आहे. पुनरागमन करताना माझे शरीर किती साथ देते याकडेही मला लक्ष द्यायला हवे.''

पुढील आठवड्यात होणाऱ्या सिनसिनाटी मास्टर्समध्ये खेळण्याचे त्याचे नियोजन असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

संबंधित बातम्या