मरेची पुनरागमनात विजयी सलामी 

वृत्तसंस्था
Wednesday, 29 August 2018

ब्रिटनच्या अँडी मरेने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. कंबरेची दुखापत आणि शस्त्रक्रियेमुळे 411 दिवसांच्या ब्रेकनंतर त्याने पुनरागमन केले आहे. स्पेनचा रॅफेल नदाल आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. 

न्यूयॉर्क : ब्रिटनच्या अँडी मरेने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. कंबरेची दुखापत आणि शस्त्रक्रियेमुळे 411 दिवसांच्या ब्रेकनंतर त्याने पुनरागमन केले आहे. स्पेनचा रॅफेल नदाल आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. 

मरेने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थला 6-7 (5-7), 6-3, 7-5, 6-3 असे हरविले. हा सामना तीन तास 17 मिनिटे चालला. डकवर्थ 448व्या स्थानावर आहे. मरेची 382व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. क्रमवारीच्या नियमानुसार त्याला या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला, पण त्याला मानांकन मिळू शकले नाही. त्यामुळे ड्रॉ त्याच्यासाठी खडतर ठरला आहे. 31 वर्षीय मरे यापूर्वी गेल्या वर्षीच्या विंबल्डनमध्ये सहभागी झाला होता. उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या सॅम क्‍युरीकडून तो हरला होता. त्याची 31व्या मानांकित स्पेनच्या फर्नांडो व्हरडॅस्कोशी लढत होईल. मरेने ग्रॅंड स्लॅम कारकिर्दीत सर्वप्रथम येथेच 2008 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. 2012 मध्ये येथेच त्याने पहिले ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले होते. 

नदालची फेररवर मात 

गतविजेत्या नदालने देशबांधव डेव्हिड फेरर याला 6-3, 6-4 असे हरविले. पोटरीचे स्नायू दुखावल्यामुळे फेररला सामना सोडून द्यावा लागला. नदाल आणि फेरर यांच्यात चांगली मैत्री आहे. स्पेनला तीन वेळा डेव्हिस करंडक जिंकून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. 36 वर्षांच्या फेररची ही कारकिर्दीतील अखेरची ग्रॅंड स्लॅम स्पर्धा आहे. पुढील बार्सिलोना किंवा माद्रिद येथील स्पर्धेद्वारे तो कारकिर्दीची सांगता करेल. त्याच्या अखेरच्या ग्रॅंड स्लॅम सामन्याचा असा शेवट झाल्याबद्दल नदालने दुःख व्यक्त केले. दुसऱ्या फेरीत नदालची कॅनडाच्या वाचेक पोस्पीसील याच्याशी लढत होईल. वाचेक 88व्या क्रमांकावर आहे. 

सेरेनाची सरशी 

कारकिर्दीतील 24व्या ग्रॅंड स्लॅम जेतेपदाची मोहीम सेरेनाने धडाक्‍यात सुरू केली. तिने 68व्या क्रमांकावरील पोलंडच्या मॅग्डा लिनेट्टीला 6-4, 6-0 असे हरविले. मार्गारेट कोर्ट यांच्या उच्चांकाची बरोबरी करण्याची सेरेनाला प्रतीक्षा आहे. तिला 17वे मानांकन आहे. दुसऱ्या फेरीत तिची जर्मनीच्या कॅरीना विथ्थोएफ्टशी लढत होईल. ड्रॉनुसार निकाल लागले, तर तिसऱ्या फेरीत तिची मोठी बहीण व्हिनसशी लढत होऊ शकेल. 
 
कोट 

ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत पुन्हा खेळण्यासाठी मी सज्ज झालो होतो. या घडीला सर्वोत्तम खेळ होण्याची मला अपेक्षा नाही, पण जिंकल्याचा आनंद वाटतो. अंतिम टप्प्यात माझा खेळ चांगला झाला. 
- अँडी मरे 

 


​ ​

संबंधित बातम्या