'हीट'मध्येच टेनिस कोर्टवर तणातणी;  स्पेनच्या फर्नांडो व्हरडॅस्कोचा अँडी मरेवर विजय 

वृत्तसंस्था
Thursday, 30 August 2018

ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरेचे ग्रॅंड स्लॅम पातळीवरील पुनरागमन निराशाजनक ठरले. अमेरिकन ओपनच्या दुसऱ्या फेरीत स्पेनच्या फर्नांडो व्हरडॅस्को याच्याकडून तो चार सेटमध्ये हरला. सलग दुसऱ्या दिवशी उष्ण हवामानामुळे स्पर्धक त्रस्त झाले. 

न्यूयॉर्क : ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरेचे ग्रॅंड स्लॅम पातळीवरील पुनरागमन निराशाजनक ठरले. अमेरिकन ओपनच्या दुसऱ्या फेरीत स्पेनच्या फर्नांडो व्हरडॅस्को याच्याकडून तो चार सेटमध्ये हरला. सलग दुसऱ्या दिवशी उष्ण हवामानामुळे स्पर्धक त्रस्त झाले. 

त्यातच 'ब्रेक'च्यावेळी व्हरडॅस्कोने नियम मोडून प्रशिक्षकांच्या 'टिप्स' घेतल्याचा आरोप मरेने केला. व्हरडॅस्कोने याचा इन्कार केला. त्यामुळे काही काळ तणातणी झाली. तीन तास 23 मिनिटे चाललेल्या लढती मरेने दोन मॅचपॉइंट वाचविले, पण 31 वर्षीय मरेला 34 वर्षीय व्हरडॅस्कोने 7-5, 2-6, 6-4, 6-4 असे हरविले. 

लढतीच्यावेळी आर्थर ऍश स्टेडियमवरील तापमान 38 अंश सेल्सियस होते. त्यामुळे तिसऱ्या सेटनंतर दोन्ही खेळाडूंना दहा मिनिटांचा ब्रेक देण्यात आला. त्या वेळी मरेची जास्त दमछाक झाल्यासारखे जाणवत होते. 
'ब्रेक'नंतर कोर्टवर परतलेल्या मरेने पंचांकडे तक्रार केली. 'लॉकर रूम'मध्ये व्हरडॅस्को आणखी एका स्पॅनिश खेळाडूसह प्रशिक्षकांशी बोलत होता. मी सुपरवायझरला याची कल्पना दिली. मी व्हरडॅस्को आणि त्याच्या 'टीम'ला दोष देणार नाही. त्यांना कदाचित नियम माहीत नसावा. प्रतिस्पर्धी खेळाडूने सुपरवायझरची भूमिका बजावणे योग्य नाही.' 

व्हरडॅस्कोने याचे खंडन केले. तो म्हणाला, की "मी मार्कोस बघदातीस (सायप्रसचा खेळाडू) आणि त्याच्या प्रशिक्षकांसह 'आईस बाथ' घेत होतो. मरे खोटे बोलला असे मला म्हणायचे नाही, पण मी प्रशिक्षक किंवा माझ्या 'टीम'मधील इतर कुणाशीही एकसुद्धा शब्द बोललो नाही. मला नियम नक्की माहीत आहे. मला तो मोडायचा नाही.' मरेने मात्र नंतर व्हरडॅस्कोचा दावा खोडून काढला. 

"लायर, लायर, पॅंट्‌स ऑन फायर' 

मरे 14 महिन्यांच्या ब्रेकनंतर प्रथमच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत खेळत होता. 
मरेने व्हरडॅस्कोचा दावा फेटाळून लावताना सोशल मीडियाचा आणि बालवाडीतील एका गीताचाही आधार घेतला. "लायर, लायर, पॅंट्‌स ऑन फायर' अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. हे बालवाडीतील गीत आहे. ही एक म्हणसुद्धा आहे. समोरचा मुलगा खोटे बोलतोय असे वाटत असेल तर त्याला चिडविण्यासाठी हे गीत म्हटले जाते. 
'लायर लायर पॅंट्‌स ऑन फायर'च्या पुढील ओळी "युवर नोझ इज लॉंगर दॅन टेलिफोन वायर' (तुझे नाक फोनच्या वायरपेक्षा लांब आहे) अशा आहेत. मरेने नंतर इन्स्टाग्रामवरून चाहत्यांचे आभार मानले. त्याचवेळी ''मला भास होऊ लागले आहेत. त्यामुळे "चेक-अप' करून घ्यावा लागेल,'' असे वक्तव्य करीत व्हरडॅस्कोला आणखी एक टोला लगावला. 


​ ​

संबंधित बातम्या