विराट नसला तरी धोनी आहे की : अंबाती रायडू

वृत्तसंस्था
Sunday, 16 September 2018

विराटची अनुपस्थिती असली तरी महेंद्रसिंह धोनीसारखा प्रेरणा देणारा माणूस संघात आहे. धोनीही भारतीय संघाचा कर्णधार होता आणि त्याला संघातील प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीची जाणीव आहे. विराट नसल्याचा निश्चितच फरक पडेल.

दुबई : विराट कोहली भारतीय संघात नसणे ही मोठी गोष्ट आहे. पण, त्याच्याशिवाय भारतीय संघ आशिया करंडक जिंकू शकत नाही असे का? भारतीय संघात पुरेशी ताकद आहे, विजेतेपद मिळविण्याची असे मत भारताचा फलंदाज अंबाती रायडू याने व्यक्त केले आहे.

भारतीय संघ सध्या यूएईमध्ये असून, आशिया करंडक स्पर्धेत भारताला विराट कोहलीशिवाय आपली ताकद दाखवावी लागणार आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये विराट व्यतिरिक्त एकही भारतीय फलंदाजाला आपला ठसा उमटविता आलेला नाही. त्यामुळे विराटच्या कामगिरीवर संघ अवलंबून असल्याची प्रतिमा निर्माण झाली आहे. याविषयीच रायडूने वक्तव्य केले आहे.

रायडू म्हणाला, की विराटची अनुपस्थिती असली तरी महेंद्रसिंह धोनीसारखा प्रेरणा देणारा माणूस संघात आहे. धोनीही भारतीय संघाचा कर्णधार होता आणि त्याला संघातील प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीची जाणीव आहे. विराट नसल्याचा निश्चितच फरक पडेल. धोनीच्या मार्गदर्शनामुळे मला कामगिरी सुधारण्यासाठी खूप मदत झाली. मी आता कोणत्या नंबरवर खेळणार याचा विचार करत नसून, मिळालेल्या संधीचे सोने करायचे एवढेच माझ्या डोक्यात आहे. विश्वकरंडकाबाबत अद्याप कोणी विचार करत नाही. 

संबंधित बातम्या