क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वात प्रथम शतकांची बरसात करणारा रैना

टीम ई-सकाळ
Saturday, 15 August 2020

महेंद्र सिंग धोनीने निवृत्ती जाहीर केल्याच्या काहीवेळानंतर भारतीय संघाचा क्रिकेटपटू सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा केली.

मुंबई : महेंद्र सिंग धोनीने निवृत्ती जाहीर केल्याच्या काहीवेळानंतर भारतीय संघाचा क्रिकेटपटू सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा केली. महेंद्रसिंह धोनीने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्ती स्वीकारल्याचे जाहीर केले. त्यानंतर सुरेश रैनाने देखील धोनी प्रमाणेच सोशल मीडियावर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारा सुरेश रैना हा पहिला भारतीय फलंदाज आहे. सुरेश रैनाने जुलै 2005 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी श्रीलंकेविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यातून क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर त्यानंतर पाच वर्षांनी जुलै 2010 मध्ये श्रीलंकेविरूद्धच कसोटी क्रिकेट मध्ये रैनाने पदार्पण केले होते. आणि या कसोटी सामन्यातच त्याने शतक झळकावले होते. सुरेश रैना 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. 

सुरेश रैनाने कसोटी कारकिर्दीत 19 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 26.18 च्या सरासरीने 768 धावा केल्या असून, यात 1 शतक व 7 अर्धशतकांचा समावेश आहे. तर सुरेश रैनाने 226 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रातिनिधीत्व केले असून, रैनाने 35.31 च्या सरासरीने 5615 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 5 शतक व 36 अर्धशतक झळकावले आहेत. याव्यतिरिक्त टी-20 प्रकारात सुरेश रैनाने 78 सामने खेळले आहेत. टी-20 च्या प्रकारात त्याने 29.2 च्या सरासरीने 1605 धावा केल्या आहेत.    

याव्यतिरिक्त, इंडियन प्रीमिअर लीगच्या सामन्यांमध्ये देखील सुरेश रैनाने दमदार कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाकडून खेळणाऱ्या सुरेश रैनाने 193 सामन्यांमध्ये 5368 धावा केल्या आहेत. या धावा करताना सुरेश रैनाने 33.34 च्या सरासरीने 1 शतक व  38 अर्धशतक केले आहेत.        


​ ​

संबंधित बातम्या