वय वर्ष अवघे 81 आणि 74! अन् जिंकले मिश्र दुहेरीत ब्राँझपदक

किशोर पेटकर
Friday, 30 August 2019

जिद्दीला वयाचे बंधन नसते, हीच बाब गोव्याच्या सिक्लेटिका रिबेलो आणि सतीश कुडचडकर या डॉक्टरद्वयींनी पेडे-म्हापसा येथील दयानंद बांदोडकर क्रीडा संकुलात सिद्ध केली. सिक्लेटिका ८१, तर सतीश ७४ वर्षांचे आहेत. अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत या जोडीने ६० वर्षांवरील वयोगटात मिश्र दुहेरीत ब्राँझपदक प्राप्त करून साऱ्यांची वाहव्वा मिळविली. 

पणजी : जिद्दीला वयाचे बंधन नसते, हीच बाब गोव्याच्या सिक्लेटिका रिबेलो आणि सतीश कुडचडकर या डॉक्टरद्वयींनी पेडे-म्हापसा येथील दयानंद बांदोडकर क्रीडा संकुलात सिद्ध केली. सिक्लेटिका 81, तर सतीश 74 वर्षांचे आहेत. अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत या जोडीने 60 वर्षांवरील वयोगटात मिश्र दुहेरीत ब्राँझपदक प्राप्त करून साऱ्यांची वाहव्वा मिळविली. 

सतीश व सिक्लेटिका यांची कामगिरी स्पृहणीय ठरते, कारण त्यांच्या वयोगटात प्रतिस्पर्धी या डॉक्टरद्वयींच्या तुलनेत वयाने सुमारे दोन दशकांच्या फरकाने लहान होते. सतीश आणि सिक्लेटिका यांनी अफलातून खेळ करत अचाट फिटनेसचे अफलातून प्रदर्शन घडविले. उल्लेखनीय बाब म्हणजे, वैद्यकीय शिक्षण घेत असताना डॉ. सतीश हे डॉ. सिक्लेटिका यांचे विद्यार्थी होते. आज बॅडमिंटन कोर्टवर या गुरू-शिष्य जोडीने धमाकेदार खेळ करून नवोदितांना प्रेरणाही दिली. 

मेहनत आणि समर्पित वृत्ती 
डॉ. कुडचडकर यांनी ब्राँझपदक कामगिरीचे श्रेय खडतर मेहनत, समर्पित वृत्ती आणि निर्धारी वृत्तीस दिले. डॉ. सतीश कुडचडकर शल्यचिकित्सक आहे आणि त्यांचे कुडचडेत स्वतःचे इस्पितळ आहे. आपल्या तंदुरुस्तीविषयी ते म्हणाले, ‘‘मी दररोज सकाळी साडेपाच वाजता उठतो, त्यानंतर खेळण्याचा सराव करतो. शल्यचिकित्सक असल्यामुळे काही वेळा इस्पितळात उशिरापर्यंत काम करावे लागले. उशिरा झोपलो, तरी सकाळच्या दिनचर्येत फरक पडत नाही. नेहमीच सकाळी लवकर उठून खेळण्याच्या सरावास जातो. दररोज सुमारे दोन तास मी सराव करतो. खेळ माझी तीव्र आवड आहे.’’ डॉ. सतीश हे केवळ बॅडमिंटनपटूच नाहीत, तर दर्जेदार क्रिकेटपटूही आहेत. ते अजूनही गोवा क्रिकेट असोसिएशनच्या क्लब पातळीवरील क्रिकेट सामन्यांत खेळतात. 

तेव्हा गरोदर असताना चँपियन... 
सिक्लेटिका या डॉक्टर या नात्याने अजूनही कार्यरत आहेत. त्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील माजी प्राध्यापकही आहेत. त्या स्त्रीरोगतज्ज्ञ असून त्यांचे मडगाव येथील रिबेलो इस्पितळ ख्यातनाम आहे. त्या बॅडमिंटनमधील माजी चँपियन आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘डॉ. कुडचडकर माझे विद्यार्थी होते. त्यांच्या साथीत खेळताना मला अपूर्व आनंद मिळाला. राज्यासाठी पदक जिंकण्याची भावनाच आगळी आहे. मी तरूण असताना राज्य पातळीवरील बॅडमिंटन स्पर्धांत खेळत होते. राज्य विजेतेपद मिळविले आहे, तसेच मध्य प्रदेशमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना तिहेरी किताबही पटकाविला होता. 1963 साली मी गोव्यात परतले. त्यानंतर राज्यस्तरीय एकेरीतील किताब जिंकला. 1967 मध्ये मी तीन महिन्यांची गरोदर असताना महिला गटातील दुहेरीत किताब जिंकला होता. माझ्या घरी बॅडमिंटन कोर्ट आहे आणि किमान वीस मिनिटे खेळण्याचा सराव करतेच.’’ बॅडमिंटन खेळल्यामुळे उत्कृष्ट तंदुरुस्ती साधता येतेच, त्याचवेळी मानसिकदृष्ट्याही सक्षम राहता येते, असे मत डॉ. सिक्लेटिका यांनी व्यक्त केले.


​ ​

संबंधित बातम्या