जागतिक मैदानी स्पर्धा - अंजलीच्या कामगिरीकडे लक्ष

नरेश शेळके
Monday, 23 September 2019

-जागतिक मैदानी स्पर्धेसाठी चारशे मीटर शर्यतीत भारतीय पदाधिकारी, प्रशिक्षकांचा फोकस हिमा दासवर असताना हरियानाच्या फारशा परिचीत नसलेल्या 21 वर्षीय अंजली देवीने बाजी मारली आणि अखेर दोहा साठी आपले तिकीट पक्के केले.

-भुवनेश्‍वर येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत 51.79 सेकंदाची वेळ नोंदवून अंजलीने सर्वांना चकीत केले होते. ती तिच्या कारकिर्दीतील केवळ दुसरी चारशे मीटरची शर्यत होती

-जागतिक स्पर्धेत चारशे मीटर शर्यतीत उपांत्य फेरी गाठणारी बिनामोल एकमेव धावपटू होय. किमान जागतिक स्पर्धेतील बिनामोल आणि हरियानाच्याच असलेल्या निर्मलाच्या कामगिरीची बरोबरी अंजली करू शकेल का? हा लाख मोलाचा प्रश्‍न आहे.

जागतिक मैदानी स्पर्धेसाठी चारशे मीटर शर्यतीत भारतीय पदाधिकारी, प्रशिक्षकांचा फोकस हिमा दासवर असताना हरियानाच्या फारशा परिचीत नसलेल्या 21 वर्षीय अंजली देवीने बाजी मारली आणि अखेर दोहा साठी आपले तिकीट पक्के केले. तिच्या प्रवेशासाठी बरेच नाट्य घडले. जागतिक स्पर्धेसाठी गेल्यावर्षी सप्टेंबरपासून पात्रता कालावधीत सुरू झाला होता. त्यानंतर लगेच भुवनेश्‍वर येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत 51.79 सेकंदाची वेळ नोंदवून अंजलीने सर्वांना चकीत केले होते. ती तिच्या कारकिर्दीतील केवळ दुसरी चारशे मीटरची शर्यत होती. त्यामुळे अनेक जाणकार बुचकळ्यात पडले होते. या कामगिरीच्या जोरावर तिला राष्ट्रीय शिबिरात स्थान देण्यात आले. पोलंड आणि झेक येथील सरावासाठीही पाठविण्यात आले. मात्र, दुखापत झाल्याचे कारण सांगून ती मार्च महिन्यात भारतात परत आली आणि तेंव्हापासून ती राष्ट्रीय शिबिरात दाखल झाली नव्हती. दरम्यान, लखनौ येथील आंतरराज्य स्पर्धेत तिने पुन्हा 51.53 सेकंदाची वेळ देत पात्रता गाठली. महासंघाच्या धोरणानुसार जो शिबिरात सहभागी होत नाही, त्याला रिले संघात स्थान दिले जात नाही. त्यामुळे प्रथम 25 खेळाडूंची नावे जाहीर झाली त्यात अंजलीचा समावेश नव्हता. तिला पुन्हा कन्फर्मेटरी ट्रायल द्यावी लागली. त्यात तिने 52.30 सेकंद वेळ दिली आणि अखेर महासंघाने तिला दोहाला पाठविण्याचा निर्णय घेतला. खरे तर ट्रायलपूर्वीच तिची प्रवेशिका आयोजकाकडे पोचली होती. त्यामुळे हा दिखावा का करण्यात आला, हे कोडेच आहे. हिमा एैवजी आता अंजली दोहात चारशे मीटर शर्यतीत धावताना दिसेल. पी. टी. उषा, के. एम. बिनामोल यांच्यामुळे या इव्हेंटला भारतात एक प्रतिष्ठा आहे. त्यामुळे अंजलीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जागतिक मैदानी स्पर्धा आणि भारतीय महिला चारशे मीटर हा इतिहास बघितला तर बिनामोल आणि निर्मला शेरॉनचा अपवाद वगळता इतरांना फारसे यश मिळालेले नाही. बिनामोलने 2001 च्या एडमंटन तर निर्मला दोन वर्षांपूर्वी लंडनच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली होती. ऑलिंपिक पाठोपाठ (सिडनी) जागतिक स्पर्धेत चारशे मीटर शर्यतीत उपांत्य फेरी गाठणारी बिनामोल एकमेव धावपटू होय. किमान जागतिक स्पर्धेतील बिनामोल आणि हरियानाच्याच असलेल्या निर्मलाच्या कामगिरीची बरोबरी अंजली करू शकेल का? हा लाख मोलाचा प्रश्‍न आहे. अंजलीने अशी कामगिरी केली तर फक्त राष्ट्रीय शिबिरातीलच ऍथलिट्‌स जबरदस्त कामगिरी करू शकतात, हा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा समज खोटा ठरेल. 

महिला चारशे मीटर 
विश्‍वविक्रम ः 47.60 सेकंद (मारिटा कोच) 
स्पर्धाविक्रम ः 47.99 सेकंद (जर्मिला क्रॅतोचविलोवा) 
यंदाची आघाडीची वेळ ः 49.05 सेकंद (शॉन मिलर-युबो) 
अंजलीची सर्वोत्तम वेळ ः 51.53 सेकंद 


​ ​

संबंधित बातम्या