फुटबाॅल स्पर्धेत चेन्नई, सिकंदराबाद, गोवा, पुणे उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 November 2019

केरळचा गोकुलम्‌ एफसी, मंगळूरचा युनिपोया विद्यापीठ, सोलापूरचा एसएसआय अकादमी आणि स्थानिक गडहिंग्लज युनायटेड यांचा पराभव झाल्याने स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

गडहिंग्लज - येथील युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे सुरू असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत चेन्नई एफसी, सिकंदराबाद रेल्वे, गोव्याचा कलंगुट असोसिएशन आणि पुण्याचा बाँबे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

केरळचा गोकुलम्‌ एफसी, मंगळूरचा युनिपोया विद्यापीठ, सोलापूरचा एसएसआय अकादमी आणि स्थानिक गडहिंग्लज युनायटेड यांचा पराभव झाल्याने स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.

रोमहर्षक झालेल्या सामन्यात पुण्याने तुल्यबळ केरळचा एका गोलने पराभव करून घोडदौड कायम ठेवली. संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट खेळ करूनही गोलची परतफेड करता न आल्याने केरळला पराजयाला सामोरे जावे लागले. पुण्याने केलेला धुसमुसळा खेळ आणि जोरदार पावसामुळे केरळच्या प्रयत्नांवर पाणी फिरले.

केरळचा गोलरक्षक मेघराज हा पुढे आलेला पाहून पुण्याच्या प्रताप तमंगने सुरेखपणे चेंडू मारून निर्णायक गोलची नोंद केली. उत्तरार्धात गोल फेडण्यासाठी केरळने जंगजंग पछाडले. परंतु, त्यात यश आले नाही. पुण्याच्या तब्बल सहा खेळाडूंना पिवळे कार्ड दाखवून पंचांनी ताकिद दिली; तर पुण्याच्याच बन्स रॉय आणि केरळचा अदिल आमल यांना धोकादायक खेळ केल्याबद्दल पंच सुनील पोवार यांनी रेड कार्ड दाखविले. 

गोव्याने मंगळूरला एका गोलने नमवून आगेकूच केली. पूर्वार्धात ३६ व्या मिनिटाला चंदन गोवेकरच्या क्रॉस पासवर गौरव कांकोनकरने महत्त्वपूर्ण मैदानी गोल केला. उत्तरार्धात मंगळूरने गोल फेडण्यासाठी केलेले प्रयत्न गोव्याच्या बचावफळीने निष्फळ ठरविले. सिकंदराबादने सोलापूरला टायब्रेकरमध्ये हरवून उपांत्य फेरी गाठली. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत होता. सिकंदराबादच्या रामजीने, तर सोलापूरच्या गौरव नागटिळकने गोल केला. टायब्रेकरमध्ये सिकंदराबादच्या अल्फ्रेड, संतोष, भारनाथ यांनाच, तर सोलापूरच्या श्रेयस पाटीललाच गोल करता आला. 

चेन्नई एफसीने गडहिंग्लज युनायटेडचा ३-२ असा पाडाव केला. चेन्नईच्या लोकेशने पहिला गोल करून खाते उघडले. पाठोपाठ युगांतने गोल करून आघाडी वाढविली. युनायटेडच्या सचिन बारामतीने गोल करून सामना २-१ असा चुरशीचा केला. पूर्वार्धाच्या शेवटी चेन्नईने प्रसन्नच्या गोलच्या जोरावर सामन्यात ३-१ अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धाच्या जादा वेळेत युनायटेडच्या ओंकार घुगरीने गोल केला. पण, सामना वाचविण्यासाठी तोपर्यंत बराच उशीर झाला होता. 
 


​ ​

संबंधित बातम्या