माहितीये का, अजिंक्य रहाणे दोन वर्षानंतर कोणत्या संघातून पुन्हा खेळणार आहे?

वृत्तसंस्था
Tuesday, 3 December 2019

सर्वाधिक 41 वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबईने आगामी रणजी मोसमासाठी उपलब्ध असलेल्या खेळाडूंतून आपला सर्वोत्तम संघ जाहीर केला.

मुंबई : सर्वाधिक 41 वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबईने आगामी रणजी मोसमासाठी उपलब्ध असलेल्या खेळाडूंतून आपला सर्वोत्तम संघ जाहीर केला. सुर्यकुमार यादवकडे तीन वर्षानंतर पुन्हा नेतृत्व देण्यात आले आहे. मुंबईचा सलामीचा सामना बडोद्याविरुद्ध येत्या सोमवारपासून सुरु होत आहे. 
मिलिंद रेगे यांच्या निवड समितीने जाहीर केलेल्या 15 खेळाडूंच्या संघात भारताचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेचा समावेश करण्यात आला आहे. रहाणे दोन वर्षानंतर मुंबई संघातून खेळणार आहे. टीम इंडियाच्या व्यस्त कार्यक्रमामुळे रहाणेला गेल्या दोन वर्षांत मुंबईतून खेळण्याची संधीच मिळाली नव्हती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

आताही तो काही सामने खेळल्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यासाठी कसोटी मालिका खेळण्यास जाईल त्यानंतर मात्र तो पुन्हा मुंबईच्या सेवेत दाखल होऊ शकेल. मोसमाच्या सुरुवातीलाच रहाणे संघात असल्याचा फायदा मुंबईच्या इतर खेळाडूंना निश्‍चितच होईल. रहाणे सर्वच सामने खेळणार नसल्यामुळे आणि गतमोसमात नेतृत्व करणारा श्रेयस अय्यर वेस्ट इंडीजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघातून खेळणार असल्यामुळे सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व देण्यात आले आहे. 

तीन वर्षांपूर्वी सूर्यकुमार मुंबईचा कर्णधार होता, परंतु स्पर्धेच्या मध्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्याला कर्णधाकरपदावरून दूर करण्यात आले होते. यंदा विजय हजारे आणि मुश्‍ताक अली स्पर्धेतून त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी त्याच्याकडून कर्णधारपदा काढून नेतृत्व देण्यात आलेला आदित्य तरे यंदा उपकर्णधार असेल.


​ ​

संबंधित बातम्या