पाकिस्तानात खेळण्याचा 'एआयटीए'ला विश्‍वास 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 February 2019

कोलकता : डेव्हिस कंरडक टेनिस स्पर्धेत पाकिस्तानात जाऊन खेळण्याची परवानगी टेनिस संघाला मिळेल असा विश्‍वास भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) व्यक्त केला आहे. स्पर्धेच्या 'ड्रॉ' अनुसार भारत-पाक ही लढत या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानात अपेक्षित आहे. 

कोलकता : डेव्हिस कंरडक टेनिस स्पर्धेत पाकिस्तानात जाऊन खेळण्याची परवानगी टेनिस संघाला मिळेल असा विश्‍वास भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) व्यक्त केला आहे. स्पर्धेच्या 'ड्रॉ' अनुसार भारत-पाक ही लढत या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानात अपेक्षित आहे. 

ड्रॉ जाहीर झाल्यावर आम्ही केंद्र सरकारच्या निर्णयाशी बांधिल असू, असे म्हणणारे "एआयटीए'चे सचिव हिरण्मय चॅटर्जी यांनी पाकिस्तानात खेळण्याची परवानगी मिळेल असा विश्‍वास दर्शविला. ते म्हणाले,""ही लढत पाकिस्तानात होणार आहे आणि ती आपल्याला खेळावीच लागेल. आपण जर पाकिस्तानात खेळायला गेलो नाही, तर आपल्यावर दोन वर्षांची बंदी येईल. त्यामुळे या आधारावर टेनिस संघाला पाकिस्तानात खेळण्याची परवानगी मिळू शकते असा विश्‍वास वाटतो.'' 

आपल्या विश्‍वास योग्य असल्याचे सांगताना चॅटर्जी म्हणाले,""पाकिस्तान संघ गेल्यावर्षी विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा खेळायला भारतात आला होता. तसाच आपला टेनिस संघही तिकडे खेळायला जाऊ शकतो.'' 

केंद्र सरकारने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात खेळण्याची परवानगी दिलेली नाही याकडे त्यांचे लक्ष वेधले असता चॅटर्जी म्हणाले,""क्रिकेट हा ऑलिंपिक खेळ नाही आणि डेव्हिस करंडक स्पर्धा ही टेनिसमधील विश्‍वकरंडक स्पर्धा आहे. यात "आयटीएफ' तारीख आणि केंद्र ठरवते त्यानुसार लढती होता. या वेळी आपली लढत पाकिस्तानशी त्यांच्या देशात होणार आहे आणि आम्ही जाणार आहोत.'' 

भारताने 1964 मध्ये पाकिस्तानातील डेव्हिस करंडक लढतीत 4-0 असा विजय मिळविला होता. मात्र, त्यानंतर एकदाही भारतीय टेनिस संघ पाकिस्तानात खेळायला गेलेला नाही. सध्याची राजकिय परिस्थिती लक्षात घेता ही लढत त्रयस्थ केंद्रावर खेळविली जाऊ शकते असा मतप्रवाह पुढे येत आहे. चॅटर्जी यांनी हा मुद्दा खोडून काढला. ते म्हणाले,""या चर्चेत काही अर्थ नाही. आमचे पाकिस्तान टेनिस संघटनेशी चांगले संबंध आहेत आणि आमच्या खेळाडूंनी पाकिस्तानात जाण्यास आम्हाला काहीच गैर वाटत नाही. जर, गेलो नाही तर आपल्यावर बंदी येऊ शकते आणि त्यानंतर जागतिक गटात येणे आपल्यासाठी खूप कठिण असेल.'' 

पाकिस्तान टेनिस संघटना आता 25 जूनपूर्वी लढत कुठल्या कोर्टवर आणि कुठे खेळवायची याचा निर्णय घेईल. तो आपल्याकडे पाठवतील आणि त्यानंतर "एआयटीए' खेळाडू आणि प्रशिक्षक स्टाफच्या व्हिसा मिळविण्यासाठी अर्ज करतील. 

भारताचे प्रशिक्षक झीशान अली यांनी ड्रॉ अनुकूल पडल्याचे मात मांडले. मात्र, पाकिस्तानात जाण्याविषयी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. ते म्हणाले,""आपल्याला या लढतीतून जागतिक गटात प्रवेश करण्याची चांगली संधी आहे. प्रज्ञेशची कामगिरी चांगली होतीयं, सप्टेंबरपर्यंत युकी भांब्रीदेखलि तंदुरुस्त होईल. रामनाथनही आपल्या कामगिरीत सातत्य राखेल. हे तिघे एकत्र आले तर आपल्या संघाची ताकद वाढलेली असेल. पाकिस्तानात खेळण्याविषयी काही बोलणार नाही. पण, आमची कुठेही आणि कुठल्याही कोर्टवर खेळण्याची तयारी आहे.''

संबंधित बातम्या