World Cup 2019 : पाकने अफगाणिस्तानला 227 धावांत रोखले; शाहिनचे पुन्हा चार बळी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 June 2019

उपांत्य फेरी अवाक्‍यात आल्यामुळे आक्रमणाला धार आलेल्या पाकिस्तानने शनिवारच्या सामन्यात अफगाणिस्तानला 9 बाद 227 धावांत रोखले. फॉर्मात आलेल्या शाहिन आफ्रिदीने पुन्हा चार विकेट मिळवण्याची कामगिरी केली. 

वर्ल्ड कप 2019 : लीडस्‌ : उपांत्य फेरी अवाक्‍यात आल्यामुळे आक्रमणाला धार आलेल्या पाकिस्तानने शनिवारच्या सामन्यात अफगाणिस्तानला 9 बाद 227 धावांत रोखले. फॉर्मात आलेल्या शाहिन आफ्रिदीने पुन्हा चार विकेट मिळवण्याची कामगिरी केली. 

तळ्यात मळ्यात करत असलेल्या पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवून विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी संजिवनी मिळवली त्यामुळे त्यांचा खेळ उंचावत आहे. तुलनेने दुबळ्या असलेल्या अफगाणिस्तानच्या फलंदाजीला रोखणे त्यांना जड गेले नाही. 

लख्ख सूर्यप्रकाश आणि फलंदाजीस उपयुक्त खेळपट्टी अशी संधी असताना नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण वर्चस्व पाकिस्तानी गोलंदाजांचे राहिले. रेहमत शाह आणि कर्णधार गुलबदीन नईब यांनी बऱ्यापैकी सुरुवात केली असली तरी शाहिनने सुरुवातीला दोन दणके देत त्यांची 2 बाद 27 अशी अवस्था केली त्यानंतर त्यांचा डाव अडखळत राहिला. 

इक्राम अलिखिल आणि अशगर अफगाण यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला तेव्हा अफगाणिस्तानला चांगली धावसंखेचे स्वप्न दिसू लागले होते, पण 42 धावा करणाऱ्या अशगरचा संयम राखता आला नाही. खराब फटका मारून त्याने स्वतःच विकेट गमावली. पाकिस्तानी गोलंदाजांनी ही संधी पुरेशी होती. थोड्याच वेळात त्यांनी अफगाणिस्तानची 5 बाद 125 अशी अवस्था केली तेव्हा दोनशे धावांचा टप्पाही त्यांना कठिण वाटत होता. 

नजिबुल्हा झद्राननेही 42 धावा केल्या पण त्यानेही अशगरसारखी चुक करून विकेट गमावली. त्यानंतर अफगाणिस्तानच्या तळाच्या फलंदाजांना शाहिन, वाहेब यांचा तिखट मारा झेलणे कठिण गेले. शिनवारीच्या 19 धावा त्यांना दोनशेच्या पलिकडे नेणाऱ्या ठरल्या. 

संक्षिप्त धावफलक : अफगाणिस्तान 50 षटकांत 9 बाद 227 (रेहमत शाह 35 -43 चेंडू, 5 चौकार, अशगर अफगाण 42 -35 चेंडू, 3 चौकार, नजिबुल्हा झद्रान 42 -54 चेंडू, 6 चौकार, इमाद वसिम 10-0-48-2, शाहिन आफ्रिदी 10-0-47-4, वाहेब रियाझ 8-0-29-2)  
 


​ ​

संबंधित बातम्या