परदेशी प्रशिक्षण ही काळाची गरज

आदित्य वाघमारे
Thursday, 30 August 2018

आशियाई स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही याचा खेद आहे. पण सगळे झटकून २०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपण तयारीला लागलो आहोत. यासाठी जॉर्जिया आणि अमेरिकेला जाण्याचा विचार मनात असल्याचे मराठवाड्याचा भूमिपुत्र, कॉमनवेल्थ पदक विजेता राहुल आवारे म्हणाला.

देशांतर्गत केला जाणारा सराव महत्वपूर्ण आहेच. याच्याच साथीने पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये होणारे कुस्तीतील बदल आपल्याला आत्मसाद करण्यासाठी परदेशी प्रशिक्षण आणि प्रशिक्षक गराजेचे आहेत. आशियाई स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही याचा खेद आहे. पण सगळे झटकून २०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपण तयारीला लागलो आहोत. यासाठी जॉर्जिया आणि अमेरिकेला जाण्याचा विचार मनात असल्याचे मराठवाड्याचा भूमिपुत्र, कॉमनवेल्थ पदक विजेता राहुल आवारे म्हणाला. विविध प्रश्न आणि त्याला औरंगाबादेत दिलेली दिलखुलास उत्तरे ती अशी...

आशियाई स्पर्धा तुला खेळता अली नाही, काय सांगशील?

- आशियाई स्पर्धेत पदक जिंकणे हे ऑलिम्पिक आणि कोमनवेल्थच्या तुलनेचे नक्कीच आहे. त्यासाठी करावी लागणारी मेहनत आणि सराव ऑलिम्पिक स्पर्धेपेक्षा जराही कमी नसतो. अश्या स्पर्धेत आपल्याला सहभागी होता येऊ नये आणि ते ही योग्यता असताना, याचा खूप खेद वाटतो. मनाला याचे इतके शल्य आहे की वृत्तपत्र हाती घेऊन या स्पर्धेच्या बातम्या वाचाव्यात, असेही आज वाटत नाही. माझ्या सरावात कसूर नव्हता, कोमनवेल्थमध्ये दोन महिन्यांपूर्वी देशासाठी ५५-५७ किलो गटात पदक पटकावले आहे. असे असताना या ६० दिवसात असे किती वजन वाढेल. मला त्याची काळजी आहेच की. पण काही बाबतीत गैरसमज पसरवले जातात, याचे ही दुःख आहे. 

आशियाईचा विषय संपला, पुढे काय? 

- माझ्या आयुष्यात अनेकवेळा कटू प्रसंग आले आहेत. त्यांचा धीराने सामना करत मी इथेपर्यंत आलो. आशियाईची संधी गेली याबद्दल वाईट वरात असले तरी पुढे भविष्य आहे. हा प्रसंग पचवून आपण नव्या जोमाने कामाला लागलो आहोत. आपल्यात धमक आहे हे आत्ताच सिद्ध करून दाखवले आहे.त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक हे लक्ष्य मनात ठेवून २०२० सालच्या या स्पर्धेत आपण देशासाठी खेळणार आहोत. त्या दृष्टीने आपण सराव सुद्धा करत आहोत. 

आशियाई स्पर्धेतील देशाच्या पैलवानांनी केलेल्या कामगिरीबाबत काय वाटते?

-  जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत कुस्तीने देशाला पाहिले पदक मिळवून दिले ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. इतर खेळांच्या तुलनेत या स्पर्धेत भारतीय कुस्तीगीरांनी आपला दबदबा दाखवला आहे. या स्पर्धेतील स्पर्धक तोडीचे असतात त्यामुळे कठीण असलेले सामने पटकावून आपल्या देशाच्या खेळाडूने पदक जिंकणे समाधानाची बाब आहे. २००८ पासून भारतीय कुस्तीचा आलेख उंचावतो आहे हे भूषणावह आहे. 

परदेशी प्रशिक्षक असावा की नसावा, तुझे मत काय? 

- देशात केला जाणारा सराव आणि प्रशिक्षण नक्कीच महत्वाचे आहे. देशातील सराव शिबिरे खूप शिकवणारी असतात. पण कालानुरूप बदल हवा असेल आणि जगासोबत खेळायचे असेल तर परदेशी प्रशिक्षक हा आवश्यक आहेच. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये कुस्तीचे नवे टेक्निक डाव शोधले जातात. ते समजावून घ्यायचे असतील तर परदेशी प्रशिक्षण आवश्यक आहे. याबाबत सुशीलकुमार आणि योगेश्वर दत्तसुद्धा वेळोवेळी बोलले आहेत. त्यांना सुद्धा याचा मोठा फायदा झाला आहे. 

सरावासाठी तुल्यबळ मल्ल मिळत नाही, असे आपले मल्ल बोलतात. काय वाटते?

- आज कुस्तीत जागतिक पातळीवर स्पर्धा वाढली आहे. त्यात टिकायचे असेल तर दर्जेदार सराव हा आलाच. राष्ट्रीय, आशियाई, ऑलिम्पिक स्पर्धा गाजवायची असेल तर तुल्यबळ पार्टनर हा हवाच. त्यासाठी असे मल्ल शिधून त्यांच्यासह सराव करणे गरजेचे आहे. प्रसंगी परदेशी मल्लांची मदत त्यासाठी घेण्यात काही गैर नाही. 

देशातील आजच्या कुस्तीचे एकूण चित्र काय आहे, त्याकडे तू कसे बघतो? 

- आज देशात कुस्तीशिवाय जे खेळ खेळले जातात त्याचे अनेक खेळाडू सधन घरातून येतात. मी गरीब घरातील आहे, सुशीलकुमारचे वडीलही बस चालवायचे. आज देशातील कुस्ती खेळणाऱ्यांच्या गरज मोठ्या आहेत. हरियाणा, दिल्ली, पंजाब ही राज्ये आपल्या पदक विजेत्यांना तीन कोटी रुपये आणि नोकरी प्रदान करतात. महाराष्ट्रात मात्र ही रक्कम ५० लक्षच आहे. परदेशात ऑलिम्पिक सेंटर स्थापून त्यासाठी मुले दत्तक घेतले जातात. पदक मिळेपर्यंत त्यांना या सेंटरमध्ये घडवले जाते. आपल्याकडे शासनाने असे प्रकल्प हातात घेतले तर आगामी काळात चित्र बदलेल. कुस्तीत संघटना ही खेळाडूची मायबाप आहे. 

कॉमनवेल्थने काय दिले?

- खेळाडू कितीही मोठा असला तरी त्याच्या कामगिरीचा एक चांगला काळ असतो. पदक जिंकणे केवळ विजयाचा भाग नाही तर ती गोष्ट आपल्या क्षमता सिद्ध करणारी असते. हेच दोन महिन्यांपूर्वी घडले. आजही माझ्यातील खेळ जिवंत आहे हे नव्याने जाणले. म्हणूनच तर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीला लागलो आहे. 

टोकियोसाठी काही विशेष तयारी? 

नक्कीच, देशासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकायचे असेल तर कठोर सराव करावा लागणार आहे. आजपर्यंत आपण कष्टाने कमी पडलेलो नाही, पुढेही पडणार नाही. या स्पर्धेत जिंकण्यासाठी देशांतर्गत आणि देशाबाहेर सरावासाठी जावे लागले तर आपण नक्की जाऊ. जॉर्जिया आणि अमेरिका या देशांमध्ये कुस्तीबाबत होणारे तांत्रिक बदल शिकण्यासाठी आणि काळाच्या बरोबर राहण्यासाठी ते आवश्यक आहे. 

२०२४ मध्ये कुस्ती ऑलिम्पिकमधून बाहेर होईल असे वाटते?

- कुस्ती अतिशय पुरातन आणि पसंत केलं जाणारा खेळ आहे. व्यावसायिक खेळ जेव्हापासून ऑलिम्पिकमध्ये आले तेव्हापासून कुस्ती या खेळाचा समावेश यात आहे. आज विकसित राष्ट्रे जशी अमेरिका, रशिया, जपान यांमध्ये कुस्ती पसंतीने खेळली, पहिली जाते. त्यामुळे कुस्ती ऑलिम्पिकमधून बाहेर होईल असे वाटत नाही.

व्यावसायिक कुस्ती स्पर्धेतून काय मिळाले? 

- व्यावसायिक कुस्ती स्पर्धेने आज देशात मल्लांची आर्थिक स्थिती बद्दलण्याचे मोठे काम केले आहे. प्रो रेस्टलिंग सारख्या आपल्या येथील स्पर्धेत जगातील अव्वल कुस्तीगीर खेळण्यासाठी येतात. त्यांच्या साथीने सराव, त्यांच्या विरुद्ध सामने खेळणे हे अनुभव देणारे ठरले आहे. जागतिक, आशियाई, ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत खेळताना या अनुभवाचा फायदा आपल्या मल्लांना भविष्यात नक्की होताना दिसेल.


​ ​

संबंधित बातम्या