2011 वर्ल्डकप फिक्सिंग प्रकरण : बीसीसीआयचे भ्रष्टाचार प्रतिबंधक प्रमुख म्हणतात...

टीम ई-सकाळ
Thursday, 2 July 2020

2011 मधील विश्वचषकादरम्यान भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करून विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. मुबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात महेंद्र सिंग धोनीने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

श्रीलंकेच्या विशेष पोलीस तपास पथकाने 2011 मध्ये विश्वचषकादरम्यान भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याची फिक्सिंग संबंधात चौकशी सुरु केली आहे. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक प्रमुख अजित सिंग यांनी, या चौकशीतून काहीच साध्य होणे कठीण असल्याचे म्हटले आहे. 2011 मधील विश्वचषकादरम्यान भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करून विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. मुबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात महेंद्र सिंग धोनीने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.      

गेल्या काही दिवसांपासून भारत-श्रीलंका यांच्यात विश्वचषकामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याचे आरोप करण्यात येत होते. श्रीलंकेचे तत्कालीन क्रिडामंत्री महिंदानंदा अलुथगामेगे यांनी जून महिन्याच्या सुरवातीला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान, 2011 चा विश्वचषक श्रीलंकेने गमावला नव्हता तर तो विकला असल्याचे म्हटले होते. तसेच त्यावेळेस आपण देशाचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे ही गोष्ट बोलता आली नसल्याचे म्हणत, अलुथगामेगे यांनी अंतिम सामन्यात श्रीलंका जाणीपूर्वक पराभूत झाला असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर श्रीलंकेचे सध्याचे क्रिडा मंत्री डल्लास अलाहाप्पेरूमा यांनी या प्रकरणावर चौकशी करण्याचे आदेश दिले होते. 

2011 वर्ल्डकप फिक्सिंग प्रकरण : डी सिल्वा नंतर कुमार संगकाराला समन्स   

यानंतर श्रीलंकन सरकारने मॅच फिक्सिंग संदर्भात सुरु केलेल्या चौकशीवर, बीसीसीआयचे लाचलुचपत प्रतिबंधक प्रमुख अजित सिंग यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच या सामन्याला आता बराच काळ लोटला असल्याने या चौकशीतून काही साध्य होणे कठीण असल्याचे अजित सिंग यांनी म्हटले असून, हा तपास करण्यास अधिकच उशीर झाल्यामुळे पुरावा मिळवणे अधिक कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त विश्वचषकातील भारत-श्रीलंका अंतिम सामन्याची चौकशीच करायची असेल तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीने या तपासाचे नेतृत्व करणे आवश्यक असल्याचे अजित सिंग यांनी नमूद केले. आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धेत हा सामना झाला असल्याने, भ्रष्टाचाराशी संबंधित आरोपांची शहानिशा आयसीसीने करणे योग्य असल्याचे मत अजित सिंग यांनी मांडले. आणि या सामन्याबाबत भारताने कोणताही मुद्दा उपस्थित केला नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.                     

दरम्यान, श्रीलंकेच्या माजी क्रिडा मंत्री महिंदानंदा अलुथगामे यांनी केलेल्या आरोपावर श्रीलंकेचे क्रिकेटपटू कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी, भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारे फिक्सिंगचा प्रकार घडला नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. यासोबतच आरोप करणाऱ्यांनी पुरावे सादर करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले होते. मात्र यानंतर काही दिवसांनी श्रीलंकन सरकारने या प्रकरणाची फौजदारी दखल घेत, मागील आठवड्यात महिंदानंदा अलुथगामे यांची चौकशी केली होती. शिवाय मंगळवारी 30 जूनला पोलिसांकडून 2011मधील भारत-श्रीलंका अंतिम सामन्यातील श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि संघाचा तत्कालीन मुख्य निवडकर्ता, अरविंदा डी सिल्वा याची चौकशी करण्यात आली होती. तर आता  विश्वचषक अंतिम सामन्यातील श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराला श्रीलंकेच्या विशेष तपास पथकाने समन्स बजावले आहे.  

वेस्टइंडीज संघाचे दिग्गज फलंदाज एव्हर्टन वीक्स यांचे निधन          
             
2011 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत-श्रीलंका यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. व श्रीलंकेच्या महेला जयवर्धने याने शतकी खेळी करत भारतासमोर 275 धावांचे आव्हान ठेवले होते. यानंतर सलामीवीर गौतम गंभीरच्या 97 धावा आणि महेंद्रसिंह धोनीने केलेल्या नाबाद 91 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने या सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे या विजयासह दोन दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देणाऱ्या सचिन तेंडुलकरचे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते.

 


​ ​

संबंधित बातम्या