क्रिकेट जगताला धक्का, कोरोनामुळे संजय डोबाल यांनी गमावला जीव

टीम ई-सकाळ
Monday, 29 June 2020

कोरोनाने क्रीडा जगतात शिरकाव करण्यास सुरवात केली आहे. आज सकाळी कोरोनाचा संसर्ग झालेल्या माजी क्रिकेटपटूचा दुर्देवी अंत झाला आहे. 

कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालल्याचे दृश्य सध्या जगभरात दिसत आहे. मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या या विषाणूचा संसर्ग हळूहळू जगभर पसरत गेला. जगातील सर्वच देश कोरोनाच्या या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातील परिस्थिती देखील यापेक्षा वेगळी नाही. आत्तापर्यंत देशात साडे 5 लाख नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. तर 16 हजार 475 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे देशातील क्रीडा स्पर्धा मागील तीन महिन्यांपासून स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. तरीदेखील कोरोनाने क्रीडा जगतात शिरकाव करण्यास सुरवात केली आहे. आज सकाळी कोरोनाचा संसर्ग झालेल्या माजी क्रिकेटपटूचा दुर्देवी अंत झाला आहे. 

कोरोनामुळे आता बुद्धिबळ जगतातील 'ही' स्पर्धा स्थगित 

दिल्ली क्लबचे क्रिकेटपटू आणि 23 वर्षाखालील संघाचे माजी सहाय्यक कर्मचारी संजय डोबाल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्ली क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, मागील आठवड्यात संजय डोबाल यांना आरोग्याशी संबंधित त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आल्यावर, बहादूरगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान करण्यात आलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला होता. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नसल्यामुळे, नंतर त्यांना  द्वारका येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळेस त्यांच्यावर प्लाझ्मा उपचार देखील करण्यात आल्याचे दिल्ली संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर आज 53 वर्षीय संजय डोबाल यांची प्रकृती अधिकच खालावत जाऊन निधन झाल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.  

क्रिकेटच्या मैदानातील 'हे' लाजिरवाणे रेकॉर्ड तुम्हाला माहिती आहेत का ?    

दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावरील एक परिचित व्यक्ती म्हणून संजय डोबाल यांची ओळख होती. तसेच वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, मिथुन मनहस यांसारख्या दिल्लीच्या दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये ते लोकप्रिय होते. संजय डोबाल यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर, गौतम गंभीर आणि मिथुन मनहस यांनी सोशल मीडियाच्या ट्विटर वरून प्लाझ्मासाठी अपील केली होती. व यानंतर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार दिलीप पांडे यांनी प्लाझ्मादात्याची व्यवस्था केली होती. मात्र त्यानंतर देखील त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.                

 


​ ​

संबंधित बातम्या