युवराजची 'किंमत' झाली कमी

वृत्तसंस्था
Thursday, 6 December 2018

पंजाबने यापूर्वीच युवराज सिंगला करारमुक्त केल्याने त्यालाही या लिलाव प्रक्रियेतून जावे लागणार आहे. मात्र बराच काळ आतंरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब असणाऱ्या युवराजची किंमत मात्र कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. 

नवी दिल्ली : पुढील मोसमात होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेसाठी जयपूर येथे 18 डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव होणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने यापूर्वीच युवराज सिंगला करारमुक्त केल्याने त्यालाही या लिलाव प्रक्रियेतून जावे लागणार आहे. मात्र बराच काळ आतंरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब असणाऱ्या युवराजची किंमत मात्र कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. 

या लिलावासाठी 50 भारतीय आणि 20 परदेशी अशा एकूण 70 खेळाडूंवर बोली लागणार आहे. पंजाबने गेल्या मोसमात युवराजसोबत दोन कोटींचा करार केला होता. परंतु यंदा त्याची मूळ किंमत 1 कोटीच असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुढील वर्षी होणारा विश्वकरंडक आणि ऑस्ट्रेलियाचे व्यस्त वेळापत्रक पाहता ग्लेन मॅक्सवेल आणि अॅरॉन फिंच यांनी या लिलाव प्रक्रियेतून माघार घेतली आहे. 

भारतीयांमध्ये युवराजसह मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि वृद्धीमान साहा यांचीही मूळ किंमत एक कोटी करण्यात आली आहे. मागील वर्षी सर्वांत महागडा ठरलेल्या राजस्थान रॉयल्सच्या जयदेव उनाडकटचीही किंमत 1.5 कोटी करण्यात आली आहे. 

 

संबंधित बातम्या