विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा हाउसफुल 

वृत्तसंस्था
Tuesday, 6 November 2018

कलिंगा स्टेडियमवरील तिकीटविक्रीस सोमवारी सकाळी 9 वाजता सुरवात झाली. त्या वेळी सर्व तिकीट खिडक्‍यांवरील रांगा कमालीच्या वाढल्या होत्या. एका तासातच भारताच्या साखळी लढती; तसेच बाद फेरीच्या लढतींची तिकिटे संपल्याचे जाहीर झाले. चाहत्यांनी ऑनलाइन तिकिटे यापूर्वीच संपली आहेत, असेही सांगितले. 

भुवनेश्‍वर : भारतात या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेतील भारताच्या सर्व साखळी लढतींची तसेच बाद फेरीच्या सामन्यांची सर्व तिकिटे संपली आहेत. कलिंगा स्टेडियम तसेच भुवनेश्‍वरमधील 18 आउटलेट्‌सवरील सर्व तिकिटे संपली असल्याचे फलक तिकीटविक्री सुरू झाल्यावर एका तासातच झळकले. 

कलिंगा स्टेडियमवरील तिकीटविक्रीस सोमवारी सकाळी 9 वाजता सुरवात झाली. त्या वेळी सर्व तिकीट खिडक्‍यांवरील रांगा कमालीच्या वाढल्या होत्या. एका तासातच भारताच्या साखळी लढती; तसेच बाद फेरीच्या लढतींची तिकिटे संपल्याचे जाहीर झाले. चाहत्यांनी ऑनलाइन तिकिटे यापूर्वीच संपली आहेत, असेही सांगितले. 

ओडिशातील क्रीडा अधिकारी ऑनलाइनसाठी किती तिकिटे उपलब्ध होती आणि काउंटरवर किती तिकिटांची विक्री करण्यात आली, याबाबत मौनच बाळगले. स्टेडियमची क्षमता यापूर्वीच आठवरून 15 हजारपर्यंत वाढवण्यात आली आहे. एका व्यक्तीस दोनच तिकिटे देण्यात येतील असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे अनेक तिकिटे व्हीआयपींसाठी राखीव ठेवण्यात आली असल्याचा आरोप चाहत्यांनी केला. अर्थातच किती तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध होती हे गुलदस्तातच आहे. 

या स्पर्धेस 28 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. त्याच दिवशी भारताची पहिली साखळी लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. त्यानंतर भारत 2 डिसेंबरला बेल्जियमविरुद्ध; तर 8 डिसेंबरला कॅनडाविरुद्ध खेळणार आहे. भारताच्या लढती नसलेल्या दिवसाची तिकीटविक्री मात्र सुरू आहे. त्याचबरोबर क्रॉसओव्हर लढतींचीही तिकिटे शिल्लक आहेत. 

पाकिस्तान व्हिसाबाबत अद्याप निर्णय नाही 
विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेतील सहभागासाठी पाकिस्तानने व्हिसासाठी अर्ज केला आहे, पण अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. गतवर्षीच्या आशियाई कुस्ती स्पर्धेच्या वेळी आपल्याला व्हिसा नाकारल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. दोन देशांतील तणाव लक्षात घेता भारत सरकारचा निर्णय महत्त्वाचा असेल. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने यापूर्वीच यजमान भारतास पाकिस्तानला व्हिसा देण्याबाबत विनंती केली आहे. 

संबंधित बातम्या