विंबल्डन : निर्णायक सेटमध्ये अखेर टायब्रेक 

वृत्तसंस्था
Friday, 19 October 2018

खेळाडूंशी चर्चेतून निर्णय 
निर्णायक पाचव्या सेटमध्ये टायब्रेकचा नियम पात्रता फेरीपासून पुरुष, महिला एकेरी, मिश्र, ज्यूनीयर एकेरी व दुहेरी अशा सर्व गटांना लागू होईल. गेल्या 20 वर्षांतील स्पर्धांच्या "डाटा'चा आढावा तसेच खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय झाला.

लंडन : टेनिसमधील सर्वाधिक परंपराप्रिय विंबल्डनमध्ये अखेर निर्णायक सेटमध्ये टायब्रेक खेळविण्याचा निर्णय झाला. पुढील वर्षापासून अंमलबजावणी होईल. त्यानुसार 12-12 अशा बरोबरीनंतर निर्णायक पाचव्या सेटमध्ये टायब्रेक होईल. ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्‍लबने ही घोषणा केली. 

विंबल्डनमध्ये पुरुष एकेरीत काही सामने मॅरेथॉन शब्दही फिका पडेल इतके लांबले. 2010 मध्ये अमेरिकेचा जॉन इस्नर आणि फ्रान्सचा निकोलस माहूत यांच्यातील लढत ग्रॅंड स्लॅम इतिहासातील सर्वांत प्रदीर्घ ठरली. पहिल्याच फेरीचा तो सामना होता. त्यात अखेरचा सेट इस्नरने 70-68 असा जिंकला. यंदा उपांत्य फेरीत इस्नर आणखी एक मॅरेथॉन सामना खेळला. उपांत्य फेरीत त्याची दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसन याच्याशी लढत होती. अँडरसन याने पाचवा सेट 26-24 असा जिंकला. हा सामना स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाचा प्रदीर्घ ठरला होता. एकूण सहा तास 35 मिनिटे ही लढत चालली होती. त्यानंतर अँडरसन यानेच या स्वरूपाचा फेरविचार करण्यात यावा, असे आवाहन केले होते. त्यास काही प्रमुख खेळाडूंनी पाठिंबा दिला होता. 

ऑल इंग्लंड क्‍लबचे अध्यक्ष फिलिप ब्रुक यांनी सांगितले, "निर्णायक सेटमध्ये योग्य वेळी नेहमीच्या ओघात सामना संपला नसेल, तर टायब्रेक लागू करण्याची वेळ आली आहे असे आमचे मत पडले. असे सामने लांबण्याचे प्रसंग दुर्मीळ असल्याचे आम्हाला ठाऊक आहे; पण 12-12 अशा बरोबरीनंतर टायब्रेक घेण्याने योग्य संतुलन साधले जाईल. त्यामुळे दोन्ही खेळाडूंना सामना अनुकूलतेने पूर्ण करण्याची पुरेशी संधी मिळेल. त्याच वेळी सामना सुद्धा सर्वमान्य अशा कालावधीत समाप्त होईल.'' 
सिंगापूरमधील बैठकीत याविषयी "डब्ल्यूटीए', "आयटीएफ' आणि "एटीपी'च्या प्रतिनिधींशी चर्चा होईल, असेही सांगण्यात आले. 

खेळाडूंशी चर्चेतून निर्णय 
निर्णायक पाचव्या सेटमध्ये टायब्रेकचा नियम पात्रता फेरीपासून पुरुष, महिला एकेरी, मिश्र, ज्यूनीयर एकेरी व दुहेरी अशा सर्व गटांना लागू होईल. गेल्या 20 वर्षांतील स्पर्धांच्या "डाटा'चा आढावा तसेच खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय झाला.

संबंधित बातम्या