भारत सोडण्यास सांगण्याचा कोहलीस काय अधिकार?

वृत्तसंस्था
Wednesday, 7 November 2018

विराट कोहली ऑफिशियल ऍप नुकताच आला आहे. त्याचे प्रमोशन करण्यासाठी विराट त्यावर व्हिडिओ अपलोड करीत आहे. त्यात तो चाहत्यांच्या मतावर टिप्पणी करतो. त्यातील एकाने कोहलीपेक्षा आपल्याला इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आवडतात, असे सांगितल्यावर कोहलीने अशा चाहत्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही. अन्य देशांऐवजी आपल्या देशास महत्त्व द्यायला हवे, असेही सुनावले. 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाला जे पाठिंबा देत नाहीत त्यांनी देशच सोडायला हवा, असे मत विराट कोहलीने व्यक्त केल्यामुळे नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत. एका क्रिकेट चाहत्याने आपल्याला भारतीय खेळाडूंपेक्षा इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आवडतात, असे सांगितले. त्यावर विराटने ही टिप्पणी केली. यानंतर विराटला सोशल मिडीयावर चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. 

विराट कोहली ऑफिशियल ऍप नुकताच आला आहे. त्याचे प्रमोशन करण्यासाठी विराट त्यावर व्हिडिओ अपलोड करीत आहे. त्यात तो चाहत्यांच्या मतावर टिप्पणी करतो. त्यातील एकाने कोहलीपेक्षा आपल्याला इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आवडतात, असे सांगितल्यावर कोहलीने अशा चाहत्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही. अन्य देशांऐवजी आपल्या देशास महत्त्व द्यायला हवे, असेही सुनावले. 

कोहलीने एका चाहत्याचे ट्विट वाचून दाखवले. त्यात त्या चाहत्याने कोहलीला जास्तच डोक्‍यावर चढवलेला फलंदाज असे म्हणतानाच मला तरी त्याच्या फलंदाजीत काही खास दिसत नाही. मी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया खेळाडूंच्या फलंदाजीचा भारतीयांच्या खेळापेक्षा जास्त आनंद घेतो, असे म्हटले आहे. 

ओके, मग तू भारतात राहायलाच नको असे मला वाटते. तू येथून जा आणि कुठेही राहा. तू आमच्या देशात का राहतोस आणि अन्य देशांवर प्रेम का करतोस? तुला मी आवडत नसेन तर मला काही वाटणार नाही; पण आमच्या देशात तू राहावेस आणि अन्य गोष्टी आवडाव्यात. आपल्याला काय हवे ते तू ठरवायला हवेस, असे उत्तर कोहलीने दिले आहे. 

कोहलीच्या या उत्तराने अनेकांना धक्का बसला आहे. देश सोडून जायला सांगण्याची टोकाची प्रतिक्रिया धक्कादायक आहे, असे ट्विट केले जात आहे. 

ट्‌विटरवरील प्रतिक्रिया 
- आता काय भारताबाहेरील त्याच्या चाहत्यांनी भारतात यावे असे तर कोहली सांगत नाही, का त्यांनीही त्यांना काय हवे ते ठरवायला हवे. 
- कोहली हा फेडररचा फॅन आहे; मग त्यानेही भारत सोडायला हवा. नाहीतर तो युकी, साकेत किंवा रामचा फॅन हवा. 
- माझा कोहलीबद्दलचा आदर वाढला आहे. चार वर्षांच्या मुलासारख्या भावना असताना दडपणाखाली क्रिकेट खेळणे किती अवघड आहे. 
- हे तर पाकिस्तानात चालते व्हा सारखेच झाले. 
- भारतीय संघास ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये भारतीय वंशांचे चाहते प्रोत्साहित करतात. आता अनिवासी भारतीयांनी भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत ऑस्ट्रेलियालाच पाठिंबा द्यायला हवा. 
- कोहली हा कोत्या मनोवृत्तीचा आहे. साध्या पीआर कार्यक्रमातही त्यामुळे हे घडते. 
- भारतीयांना भारत सोडण्यास सांगण्याचा कोहलीस काय अधिकार? 
- कोहलीने आता इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ क्रिकेट सोडून भारतीय मातीतील कबड्डी खेळायला हवे. 

संबंधित बातम्या