संपतरावांची सुकन्या ऋतुजा, कदम कदम बढाए जा

मुकुंद पोतदार
Monday, 15 October 2018

पीवायसी हिंदू जिमखान्यावर हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारी ऋतुजा टेनिसमधील नैपुण्यामुळे अमेरिकेत टेक्सास ए अँड एम विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊ शकली. तेथे चार वर्षांच्या कालावधीत तिने एनसीएए स्पर्धांत उल्लेखनीय कामगिरी केली. प्रामुख्याने दुहेरीत तिने लक्षवेधी यश मिळविले.

पुणे : टेनिसपटू ऋतुजा भोसलेसाठी यंदाचे वर्षे धमाकेदार ठरले आहे. फेडरेशन करंडक आणि आशियाई क्रीडा स्पर्धांत तिने देशाचे प्रतिनिधीत्व केले. याशिवाय तिने सलग दोन वेळा दोन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.

पीवायसी हिंदू जिमखान्यावर हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारी ऋतुजा टेनिसमधील नैपुण्यामुळे अमेरिकेत टेक्सास ए अँड एम विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊ शकली. तेथे चार वर्षांच्या कालावधीत तिने एनसीएए स्पर्धांत उल्लेखनीय कामगिरी केली. प्रामुख्याने दुहेरीत तिने लक्षवेधी यश मिळविले.

भारतात आल्यानंतर तिने एमएसएलटीएच्या पुढाकारामुळे मिळालेल्या वाईल्ड कार्डचा फायदा घेत औरंगाबादमधील आयटीएफ स्पर्धेत यशस्वी पदार्पण केले.

ऋतुजाचे वडील संपतराव भोसले पोलिस दलात सक्रीय आहेत. इतर गावांत बदली झाल्यामुळे ते ऋतुजाबरोबर स्पर्धांसाठी जाऊ शकत नाहीत. आई नीता याच बऱ्याच वेळा तिच्याबरोबर जातात. संपतराव यांनी सांगितले की, आई आणि ऋतुजाचे नाते वेगळे आहे. जणू काही तुझे माझे जमने-तुझ्यावाचून करमेना. स्पर्धांच्यावेळी माझा संपर्क नियमित असतो. ऋतुजाच्या नुसत्या काही शब्दांनी मला तिच्या तयारीचा, सामन्याच्या महत्त्वाचा अंदाज येतो.

पोलिस अधिकारी पिता असल्यामुळे शीस्त उपजत आली की धाकामुळे, या प्रश्नावर ऋतुजा हसत म्हणाली की, पप्पा माझे फार लाड करतात अशी मम्माची तक्रार असते.

ऋतुजाने यंदा दुहेरीत थायलंडमध्ये सलग दोन, तर नुकतेच ऑस्ट्रेलियात सलग दोन विजेतिपदे मिळविली.

संबंधित बातम्या