टेनिसपटू प्रज्ञेशचा आणखी एक माईलस्टोन 

वृत्तसंस्था
Thursday, 7 March 2019

2019 मधील प्रज्ञेशची कामगिरी 
- ग्रॅंड स्लॅम पदार्पण 
- ऑस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता फेरीत तीन सामने जिंकले 
- जागतिक क्रमवारीत कारकिर्दीत प्रथमच "टॉप हंड्रेड'मध्ये 
- एटीपी मास्टर्स 1000 मालिकेतील स्पर्धेत मुख्य ड्रॉची पात्रता साध्य 

इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया : भारताच्या डेव्हिस करंडक संघातील टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्‍वरन याने कारकिर्दीत आणखी एक माईलस्टोन गाठला. त्याने एटीपी मास्टर्स 1000 मालिकेतील स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रथमच प्रवेश मिळविला. यंदाच त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पदार्पण केले होते. 

प्रज्ञेश 29 वर्षांचा आहे. जागतिक क्रमवारीत तो 97व्या क्रमांकावर आहे. पात्रता फेरीत त्याला नववे मानांकन होते. त्याने अखेरच्या दुसऱ्या सामन्यात इटलीच्या साल्वातोर कॅरुसोवर 6-2, 3-6, 6-2 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. हा सामना एक तास 41 मिनिटे चालला. कॅरुसो 168व्या स्थानावर आहे. पहिल्या फेरीत प्रज्ञेशने तैवानच्या जॅसन जुंगवर (132) 7-5, 6-4 अशी मात केली होती. 

कॅरुसोविरुद्ध प्रज्ञेशने आक्रमक सुरवात करताना पहिल्याच गेममध्ये ब्रेक मिळविला. तिसऱ्या गेममधील ब्रेकसह त्याने पकड भक्कम केली. मग सर्व्हिस राखल्यामुळे त्याला 4-0 अशी आघाडी मिळाली. पहिल्याच सेटपॉइंटवर त्याने पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटच्या प्रारंभी त्याने एक ब्रेकपॉइंट गमावला. आठव्या गेममध्ये सर्व्हिस खंडित झाल्यामुळे तो 3-5 असा मागे पडला. हा सेट त्याने गमावला. निर्णायक सेटमध्ये प्रज्ञेशने पुन्हा खेळ उंचावला. त्याने सलग दोन ब्रेकसह 4-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर सर्व्हिस खंडित होऊनही त्याने पकड निसटू दिली नाही. एका ब्रेकचे वर्चस्व कायम राखत त्याने तिसऱ्या मॅचपॉइंटवर विजय नक्की केला. प्रज्ञेशने 11 पैकी पाच ब्रेकपॉइंट जिंकले, तर तीन पैकी एक वाचविला. 

पहिल्या फेरीत फ्रान्सच्या बेनॉईट पैरेशी त्याची लढत होईल. पैरे 69व्या क्रमांकावर आहे. या दोघांतील ही पहिलीच लढत असेल. भारतीय वेळेनुसार शनिवारी पहाटे ही लढत होईल. 

गेल्या वर्षी कॅरुसोविरुद्ध त्याची दोन वेळा लढत झाली होती. त्यात इटलीतील व्हिसेन्झा येथील स्पर्धेत प्रज्ञेश हरला होता, तर फ्रेंच ओपनच्या पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात त्याने विजय मिळविला होता. रामकुमार रामनाथनला (136) पहिल्या फेरीत सर्बियाच्या फिलिप क्रॅजीनोविचकडून (113) 4-6, 0-6 असे पराभूत व्हावे लागले. 

2019 मधील प्रज्ञेशची कामगिरी 
- ग्रॅंड स्लॅम पदार्पण 
- ऑस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता फेरीत तीन सामने जिंकले 
- जागतिक क्रमवारीत कारकिर्दीत प्रथमच "टॉप हंड्रेड'मध्ये 
- एटीपी मास्टर्स 1000 मालिकेतील स्पर्धेत मुख्य ड्रॉची पात्रता साध्य 

संबंधित बातम्या