TATA Open : बोपण्णा-दिवीज उपांत्य फेरीत

मुकुंद पोतदार
Thursday, 3 January 2019

सिमॉची विजयी सलामी
गतविजेत्या फ्रान्सच्या जिल सिमॉने बेलारूसच्या इल्या इव्हाश्‍का याचे आव्हान पहिल्या सेटच्या पिछाडीवरून 6-7 (3-7), 6-2, 6-1 असे परतावून लावले. सिमॉला प्रेक्षकांचा पाठिंबा उत्साहवर्धक ठरला. त्यामुळे अडीच तास चाललेल्या लढतीत तो मोक्‍याच्या क्षणी खेळ उंचावू शकला. निर्णायक सेटमध्ये त्याने एकच गेम गमावला. 

पुणे : एशियाड सुवर्णपदक विजेत्या रोहन बोपण्णा-दिवीज शरण यांनी टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेत झुंजार विजयासह उपांत्य फेरी गाठली. या जोडीने लिअँडर पेस आणि मेक्‍सिकोचा मिग्युएल अँजेल रेयेस-वरेला यांना 6-7 (4-7), 6-4, 17-15 असे हरविले. सहा मॅचपॉईंट वाचवित बोपण्णा-शरण यांनी आगेकूच केली.

कोर्ट नंबर वनवर दोन्ही बाजूला प्रेक्षकांनी खचाखच गर्दी केल्यामुळे ही लढत गुरुवारचे आकर्षण आणि पर्यायाने वैशिष्ट्य ठरली. त्यात बहुतांश वेळी बोपण्णाची भक्कम सर्व्हिस निर्णायक ठरली.

सामन्यानंतर बोपण्णाने सांगितले की, माझी भारतीय खेळाडूंशी चांगली जोडी जमते. महेश भूपतीबरोबर मी 2012-13 मध्ये खेळण्याचा आनंद लुटला. इंडोनेशियातील सुवर्णपदकामुळे दिवीजबरोबर भट्टी जमली. मी डावखुऱ्या जोडीदाराबरोबर प्रथमच खेळत आहे. इतका चुरशीचा सामना मी पूर्वी कधी खेळलो नव्हतो. समोर लिअँडर पेस किंवा आणखी कुणीही प्रतिस्पर्धी असला तरी चुरशीने खेळण्यावर भर असतो. दिवीजने जोडी चांगली जमली असली तरी टोकियो ऑलिंपिकचे लक्ष्य इतक्‍यात ठेवणे घाईचे ठरेल, असे नमूद केले.

क्रोएशियाच्या इव्हो कार्लोविचने लॅट्‌वियाच्या एर्नेस्ट गुल्बीसला कारकिर्दीत प्रथमच हरवित उपांत्य फेरी गाठली. त्याने 7-6 (7-5), 7-6 (7-5) असा विजय मिळविला. यापूर्वी तिन्ही सामन्यांत तो हरला होता.

रामकुमारची झुंज अपयशी
बुधवारी मध्यरात्री रामकुमार रामनाथन याची झुंज अपयशी ठरली. मॅलेक जझिरीकडून तो तीन सेटमध्ये 7-6 (8-6), 6-7 (5-7), 6-3 असा हरला. हा सामना दोन तास 46 मिनिटे चालला. कडाक्‍याच्या थंडीतही थांबलेल्या प्रेक्षकांसाठी रामकुमारचा झुंजार खेळ पाहायला मिळाला. रामच्या पराभवामुळे भारताच्या एकेरीतील आशा संपुष्टात आल्या. जझिरी जागतिक क्रमवारीत 45व्या क्रमांकावर आहे. टायब्रेकमध्ये गेलेला पहिला सेट जिंकून रामने सुरुवात चांगली केली होती; पण दुसऱ्या सेटमध्ये जझिरीने चारपैकी चार ब्रेकपॉईंट वाचविले, तर रामला एकही ब्रेकपॉईंट मिळविता आला नाही. हा सेट जिंकून जझिरीने बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये रामला पाच डबल फॉल्टचा फटका बसला. दुसरीकडे जझिरीने एकही अशी चूक केली नाही. पहिल्या सेटमध्ये पाच डबल फॉल्ट झाल्यानंतर जझिरीकडून दुसऱ्या सेटमध्ये एकच डबल फॉल्ट झाली.

सिमॉची विजयी सलामी
गतविजेत्या फ्रान्सच्या जिल सिमॉने बेलारूसच्या इल्या इव्हाश्‍का याचे आव्हान पहिल्या सेटच्या पिछाडीवरून 6-7 (3-7), 6-2, 6-1 असे परतावून लावले. सिमॉला प्रेक्षकांचा पाठिंबा उत्साहवर्धक ठरला. त्यामुळे अडीच तास चाललेल्या लढतीत तो मोक्‍याच्या क्षणी खेळ उंचावू शकला. निर्णायक सेटमध्ये त्याने एकच गेम गमावला. 

संबंधित बातम्या