आधी हरायचे तेव्हा ताप चढायचा, बॅडमिंटनमुळे संयमी बनले : तापसी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 January 2019

प्रीमियर बॅडमिंटन लिगमध्ये पुढे अनेक वर्षे येतील; पण पहिले वर्ष पुन्हा येणार नाही. या लीगमुळे संयम, सहनशीलतेचे महत्त्व पटले, अशी भावना पुणे-7 एसेस संघाची प्रमुख व प्रतिभासंपन्न अभिनेत्री तापसी पन्नू हिने व्यक्त केली.

पुणे : प्रीमियर बॅडमिंटन लिगमध्ये पुढे अनेक वर्षे येतील; पण पहिले वर्ष पुन्हा येणार नाही. या लीगमुळे संयम, सहनशीलतेचे महत्त्व पटले, अशी भावना पुणे-7 एसेस संघाची प्रमुख व प्रतिभासंपन्न अभिनेत्री तापसी पन्नू हिने व्यक्त केली.

पीबीएलच्या पुणे टप्प्यासाठी आलेल्या तापसीने नववर्षाच्या पहिल्या दिवशी "सकाळ भवन'ला भेट दिली. त्या वेळी फेसबुक लाईव्ह मुलाखतीत ती पुढे म्हणाली की, लीगमधील संघामुळे मी विजय आणि पराभवाला सारख्याच प्रकारे सामोरे जाण्यास शिकले. सुरुवातीला संघ हरायचा तेव्हा मला ताप यायचा. आता तसे नाही. रोजचा दिवस वेगळा असतो. जिंकण्यासाठी हरणे आवश्‍यक असते. त्याशिवाय जिंकण्याची मजा लुटता येत नाही.
तापसीने गेले दोन दिवस पुण्यात नेमबाजी, टेनिस अशा खेळांचाही आनंद लुटला. याविषयी ती म्हणाली की, इतके खेळ मी पाठोपाठ पूर्वी कधी खेळले नव्हते. त्यामुळे नवे वर्ष फार संस्मरणीय ठरले आहे. अशी अनुभूती पूर्वी कधी आली नव्हती.

बॅडमिंटन संघ मिळविण्यासाठी स्वतः प्रयत्न केल्याचेही तापसीने नमूद केले. ती म्हणाली की, गतमोसमात प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या तिसऱ्या अध्यायानंतर संघ घेण्याचा विचार मनात आला. मला बॅडमिंटनचा खेळ आवडतोच. त्यामुळे आणखी एक पाऊल पुढे टाकावे असे वाटले. मी स्वतःहून संयोजकांशी संपर्क साधला.

पुण्याची निवड करण्यामागे तिने सांगितले की, बॅडमिंटन संघ म्हणून प्रतिमा निर्माण झाली नाही असे शहर मला हवे होते. बॅडमिंटनचा जन्म पुण्यात झाला आहे. त्यामुळे पुण्याची निवड यथार्थ ठरली.

संघाची प्रमुख या नात्याने काय अनुभव आले, याविषयी ती म्हणाली की, मी अभिनेत्री असले तरी बॅडमिंटनच्या संदर्भात मी स्टार नाही. माझा प्रत्येक खेळाडू स्टार आहे. आपण स्टार आहोत असे त्याला वाटले पाहिजे, अशी वातावरणनिर्मिती करण्यावर माझा प्रयत्न आहे. खेळाडू जिंकला, तर माझा संघ जिंकेल, मी जिंकेन. एरवी रुपेरी पडद्यावर माझा वावर असतो; पण कोर्टवर मी पडद्यामागे तर खेळाडू आघाडीवर आहेत, तर खेळाडू माझा संघ लक्षात ठेवतील.

तापसीचे बोल
- बॉलीवूडच नव्हे तर प्रत्येकाने किमान एक खेळ खेळणे आवश्‍यक. त्यामुळे जीवनात सुख-दुःखाचा समतोल साधणे सुकर होते.
- कोणत्याही महिला क्रीडापटूची भूमिका करायला मिळाली तरी आनंदच होईल. त्यातही टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा जीवनपट साकारायला आवडेल, कारण तिची कारकीर्द फार इंटरेस्टिंग
- मी स्वतः एका महिला क्रीडापटूवर चित्रपट बनवित आहे. ती भारताची आहे, मुलगी आहे, तिचा खेळ फारसा परिचित नाही. सध्या बाकीचा तपशील गोपनीय राखणेच इष्ट.

संबंधित बातम्या