सिंबायोसिस, फर्ग्युसन, गरवारे कॉलेजचे विजय 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 October 2018

शिक्षण विभाग पुणे महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने आयोजित एकोणीस वर्षांखालील मुलांच्या गटाच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सिंबायोसिस, फर्ग्युसन, स. प. आबासाहेब गरवारे, एसएनबीपी कनिष्ठ कॉलेजने आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली

पुणे : शिक्षण विभाग पुणे महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने आयोजित एकोणीस वर्षांखालील मुलांच्या गटाच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सिंबायोसिस, फर्ग्युसन, स. प. आबासाहेब गरवारे, एसएनबीपी कनिष्ठ कॉलेजने आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. 

एसएसपीएमएस मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सिंबायोसिस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने विश्वकर्मा कॉलेजचा दोन गोलने पराभव केला. सिंबायोसिसच्या सिद्धार्थ सोनवणेने 18 व्या मिनिटास गोल करून संघाचे खाते उघडल्यानंतर युवराज दौतुलवारने 26 व्या मिनिटास दुसरा गोल केला. 

दुसऱ्या लढतीत एसएनबीपी कनिष्ठ कॉलेजने धनकवडीच्या भारती विद्यापीठाचा 3-0 असा पराभव केला. यावेळी एसएनबीपी कॉलेजकडून वरद मोरे (8 वे मिनीट), अमिर सय्यद (21 वे मिनीट) व हर्षल जाधव (28 वे मिनीट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. 

नवीन मेदीबोयनाने खेळाच्या पाचव्या मिनिटास केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर अरिहंत कॉलेजने आदित्य इंग्रजी माध्यम प्रशालेचा पराभव केला. 

भारती इंग्रजी माध्यम आणि एसएसपीएमएस डे कनिष्ठ कॉलेज यांच्यातील लढत शेवटपर्यंत चुरशीची झाली. या लढतीच्या अकराव्या मिनिटाला ओंकार धनवडेने गोल करून भारत प्रशालेला आघाडी मिळवून दिली होती. यानंतर एसएसपीएमएऐस डे कॉलेजने बरोबरी साधण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र, त्यात त्या संघाला यश आले नाही. 

फर्ग्युसन कॉलेजने हिलग्रीन प्रशालेचा दोन गोलने पराभव केला. यात फर्ग्युसन कॉलेजच्या सत्यन पाटीलने नवव्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली तर 27 व्या मिनिटाला वेदांत मलकरणेकरने दुसरा गोल करून फर्ग्युसन कॉलेजची आघाडी 2-0 ने वाढवली ही आघाडी कायम राखून फर्ग्युसन कॉलेजने बाजी मारली. 
आबासाहेब गरवारे कॉलेजने मुक्तांगण इंग्रजी माध्यम प्रशालेवर तीन गोलच्या फरकाने विजय प्राप्त केला. गरवारे कॉलेजच्या आदित्य जोशीने बाराव्या मिनिटास गोल करून संघाचे खाते उघडल्यानंतर मल्हार खेडेकरने 18 व 20 मिनिटास लागोपाठ दोन गोल करून संघाला विजय मिळवून दिला. 
 

संबंधित बातम्या