World Cup 2019 : टुकू-टुकू खेळणार नाही हे शब्द केदारने खरे करून दाखविले : भावे 

मुकुंद पोतदार
Wednesday, 17 April 2019

केदार जाधव आठ-दहा वर्षे रणजी पातळीवर 30-40च्या सरासरीने कारकीर्द घडविण्यात कधीच समाधानी नव्हता. दोन मोसम असे काही तरी करून दाखवेन की निवड समितीला माझी दखल घेणे भाग पडेल, असे तो म्हणायचा.

वर्ल्ड कप 2019 : पुणे : केदार जाधव आठ-दहा वर्षे रणजी पातळीवर 30-40च्या सरासरीने कारकीर्द घडविण्यात कधीच समाधानी नव्हता. दोन मोसम असे काही तरी करून दाखवेन की निवड समितीला माझी दखल घेणे भाग पडेल, असे तो म्हणायचा. त्याने शब्द खरे करून दाखवीत भारतीय संघात स्थान मिळविले. तेथेही हाच दृष्टिकोन ठेवत त्याने स्थान भक्कम केले. आपले शब्द असे खरे करून दाखविणारा आणि त्यासाठी कसून कठोर मेहनत करणारा झुंजार लढवय्या पहिला वर्ल्ड कपर बनणार याचा मनस्वी आनंद आहे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया सुरेंद्र भावे यांनी व्यक्त केली. 

www.sakalsports.com संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संघनिवडीबद्दलही भाष्य केले. दीड दशकाच्या प्रथमश्रेणी व अ दर्जाचे क्रिकेट मिळून 9779 धावा केलेले, खेळाडू तसेच प्रशिक्षक म्हणून रणजी उपविजेतेपद मिळविलेले भावे राष्ट्रीय निवड समितीचे माजी सदस्य आहेत. 2011च्या विश्वकरंडक स्पर्धेत विजेता ठरलेला संघ त्यांच्या समितीने निवडला होता. महाराष्ट्राच्या निवड समितीचेही ते सदस्य होते. एकूण संघनिवडीबद्दल त्यांनी दहापैकी 8 ते साडेआठ गुण दिले. ते म्हणाले की, रिषभ पंतची निवड व्हायला हवी होती. तो आक्रमक फलंदाज आहे. तो डावखुरा असणे संघासाठी फायद्याचे ठरले असते. 

चार नंबरच्या फलंदाजावरून इतकी चर्चा होण्याची गरजच नाही. त्या क्रमांकावर विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी यांच्यापासून केदार जाधव, के. एल. राहुल असे पर्याय आहेत. विजय शंकरला लगेच इतक्‍या वर खेळवतील असे वाटत नाही, असे भावे यांनी नमूद केले. स्वतः विराट, रोहित यांचा फॉर्म भारताचे बलस्थान राहील, असे सांगताना त्यांनी इंग्लंडमधील हवामानाच्या संदर्भात सावधानतेचा इशारा दिला. पाऊस पडल्यास विकेटवर कव्हर टाकली जातील. त्यामुळे दवाचे प्रमाण वाढेल. अशा वातावरणात चेंडू स्विंग होतो, तेव्हा आपले फलंदाज झगडतात. त्यामुळे फलंदाजांसमोर आव्हान असेल, असे ते म्हणाले. 

केदारच्या मेहनतीविषयी ते म्हणाले की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अ संघाकडून केलेली कामगिरी केदारसाठी महत्त्वाची ठरली. तो सुरवातीला तंदुरुस्तीकडे गांभीर्याने पाहात नव्हता; पण योयो टेस्टमध्ये अपेक्षित यश आले नाही म्हटल्यावर त्याने मनावर घेतले. तो कधीच धावण्याविषयी उत्साही नसायचा, पण हाच केदार पीवायसी ग्राउंडला आठ-दहा राउंड मारू लागला. 

कोणत्याही पातळीवर खेळताना केदार संघासाठी झोकून देणारा आहे. त्यामुळेच त्याने यष्टीरक्षणही करण्यास पुढाकार घेतला. त्याच्यातील गोलंदाजाचा शोध लावण्याचे श्रेय महेंद्रसिंह धोनीला दिले पाहिजे. केदारनेही त्याचा विश्‍वास सार्थ ठरवीत संधीचे सोने केले. हाच केदार विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी गांभीर्याने तयारी करून सज्ज होईल. त्याने संघातील हक्काचे स्थान प्रयत्नपूर्वक कमावले आहे, याचाही अभिमान वाटतो. 
- सुरेंद्र भावे, महाराष्ट्राचे रणजी प्रशिक्षक, माजी निवड समिती सदस्य 

संबंधित बातम्या