मेस्सी, रोनाल्डोबरोबर तुलनाच होऊ शकत नाही : छेत्री 

वृत्तसंस्था
Monday, 7 January 2019

मार्गदर्शक कॉन्स्टंटाइन म्हणाले... 
- विजयी सलामीचे समाधान; पण त्यात वाहवत जाणार नाही. 
- बाद फेरीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अजून खूप काही करावे लागणार. 
- विजयच नव्हे तर संघाची कामगिरीही सुखावणारी. 
- उत्तरार्धात खेळात माफक बदल केला; त्याचा पुरेपूर फायदा. 
- बाद फेरीसाठी दोन सामन्यांतून दोन गुण तरी हवेत. 
- विजयी मालिका सुरू राहिल्याचे समाधान. 
- अमिरातीविरुद्धही चांगला खेळ हवा; पण तेच आमच्या मार्गातील एकमेव अडथळा नव्हेत. 

मुंबई/ अबुधाबी : फुटबॉलसारख्या सांघिक खेळात वैयक्तिक विक्रमांना मी कधीही महत्त्व देत नाही. माझी लिओनेल मेस्सी किंवा ख्रिस्तियानो रोनाल्डोबरोबर तुलनाच होऊ शकत नाही, असे भारताचा अव्वल फुटबॉलपटू सुनील छेत्री याने सांगितले. 

भारताने आशियाई फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी देताना थायलंडचा सहज पाडाव केला होता. त्याचबरोबर या सामन्यात दोन गोल करीत छेत्रीने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलच्या क्रमवारीत लिओनेल मेस्सीला मागे टाकले. आता तो रोनाल्डोचा 87 गोलचा विक्रमही मागे टाकेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. माझे लक्ष कोणत्याही विक्रमावर नसून, या स्पर्धेतील संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यावर आहे. ही लढत आमच्यासाठी खूपच खडतर आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही गोष्टीवर विचार करणार नाही, असे छेत्रीने सांगितले. तो म्हणाला, मी वैयक्तिक विक्रम कधीही गांभीर्याने घेत नाही. मेस्सी आणि रोनाल्डोबरोबर माझी तुलनाच होऊ शकत नाही. ही होते, त्या वेळी माझा सन्मान वाढतो. मी प्रत्येक सामन्यात गोल करणारच, असे गृहीत धरत नाही. मात्र संधी मिळते, त्यावेळी प्रयत्नांची शर्थ करतो, असे त्याने सांगितले. 

भारताची या स्पर्धेतील सर्वांत महत्त्वाची साखळी लढत अमिरातीविरुद्ध होणार आहे. हा सामना दहा जानेवारीस आहे. "अमिरातीविरुद्धच्या सामन्यापूर्वी आम्ही ताजेतवाने असायला हवे. त्याचबरोबर दुखापतीचाही प्रश्‍न नको. त्यानंतर आमचा चांगला खेळ कायम ठेवण्याचेही आव्हान असेल. हाच नव्हे तर बहारीनविरुद्धची लढत खडतर असेल. गटातील तीनही संघ तांत्रिकदृष्ट्या सरस आहेत, असे छेत्री म्हणाला. 

मार्गदर्शक कॉन्स्टंटाइन म्हणाले... 
- विजयी सलामीचे समाधान; पण त्यात वाहवत जाणार नाही. 
- बाद फेरीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अजून खूप काही करावे लागणार. 
- विजयच नव्हे तर संघाची कामगिरीही सुखावणारी. 
- उत्तरार्धात खेळात माफक बदल केला; त्याचा पुरेपूर फायदा. 
- बाद फेरीसाठी दोन सामन्यांतून दोन गुण तरी हवेत. 
- विजयी मालिका सुरू राहिल्याचे समाधान. 
- अमिरातीविरुद्धही चांगला खेळ हवा; पण तेच आमच्या मार्गातील एकमेव अडथळा नव्हेत. 

संबंधित बातम्या