छेत्री मेस्सीपेक्षा सरस, भारताचा थायलंडवर विजय

वृत्तसंस्था
Monday, 7 January 2019

भारतीय फुटबॉलचा चेहरा असलेल्या सुनील छेत्रीने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलच्या क्रमवारीत अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे. त्याच्या दोन गोलमुळे भारताने आशियाई फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी देताना थायलंडचा 4-1 असा सहज पराभव केला.

मुंबई/ अबूधाबी : भारतीय फुटबॉलचा चेहरा असलेल्या सुनील छेत्रीने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलच्या क्रमवारीत अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे. त्याच्या दोन गोलमुळे भारताने आशियाई फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी देताना थायलंडचा 4-1 असा सहज पराभव केला.

सुनील छेत्रीने 22 व्या मिनिटास मिळालेल्या पेनल्टीवर गोल करीत लिओनेल मेस्सीला मागे टाकत कार्यरत फुटबॉलपटूंच्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळवला. त्या वेळी छेत्रीचा हा गोल पेनल्टीवर असल्याची खोचक टिप्पणी झाली. दरम्यान, थायलंडने बरोबरी साधल्याने काहींच्या टीकेला धार आली, पण छेत्रीने उत्तरार्धातील पहिल्याच मिनिटास अफलातून गोल करीत भारतीय वर्चस्वाची नांदी केली. अनिरुद्ध थापा आणि जेजे लालपेखलुआ यांनी त्यानंतर गोल करीत थायलंडला प्रतिकाराची संधीच दिली नाही. या सफाईदार विजयामुळे भारताच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

ब्ल्यू टायगर्स संबोधले जाणाऱ्या भारताचा खेळ योजनबद्ध होता. थायलंडच्या वेगवान आक्रमक सुरवातीस तोंड देताना भक्कम बचाव केला, त्याचबरोबर हुशारीने प्रतिआक्रमण करीत थायलंडच्या योजना खिळखिळ्या केल्या. गेल्या काही वर्षांतील भारतीय फुटबॉलचा वाढता दबदबा उत्तरार्धात दिसला. भारतीयांनी थायलंड खेळाडूंना चुका करण्यास भाग पाडले आणि संधी मिळताच कमालीची वेगवान चाल करीत गोल केले. या सामन्यासाठी भारताचे नेतृत्व गोलरक्षक गुरप्रीतकडे होते, त्याचा या विजयात मोलाचा वाटा होता. त्याने थायलंडची सुरवातीची आक्रमणे रोखत भारतीय प्रतिआक्रमणास चांगली सुरवात केली. त्याच्या भक्कम बचावाने भारतीय आक्रमकांचा आत्मविश्‍वास उंचावला आणि विजय सुकर झाला.

लक्षवेधक
- सध्या खेळत असलेल्या फुटबॉलपटूंत क्रिस्तियानो रोनाल्डो (85) अव्वल, तर सुनील छेत्री (67) दुसरा आणि लिओनेल मेस्सी (65) तिसरा.
- सर्वकालिक सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत रॉबी किनला मागे टाकण्यासाठी दोन गोलची गरज.
- भारताचा स्पर्धा इतिहासातील सर्वांत मोठा विजय.
- भारताने स्पर्धेत 1964 नंतर पहिल्यांदाच लढत जिंकली.
- भारत दीर्घ कालावधीनंतर स्पर्धेत गटात अव्वलस्थानी.
- आगामी लढत : संयुक्त अरब अमिराती (10 जानेवारी).

आमने सामने
तपशील थायलंड भारत
चेंडू वर्चस्व 65.2 34.8
ऑन टार्गेट 3 6
ऑफ टार्गेट 5 7
पासेस 532 285

संबंधित बातम्या