पुण्याच्या एसएनबीपी अकादमीची विजयी सलामी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 October 2018

एसई सोसायटीच्या एसएनबीपी ग्रुप आयोजित तिसऱ्या एसएनबीपी सोळा वर्षांखालील मुलांच्या गटाच्या अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत "अ' गटात यजमान एसएनबीपी अकादमीच्या संघाने हरियानाच्या राजा कर्नल अकादमी संघाचा 9-1 अशा गोलने पराभव करीत विजयी सलामी दिली. 

पुणे : एसई सोसायटीच्या एसएनबीपी ग्रुप आयोजित तिसऱ्या एसएनबीपी सोळा वर्षांखालील मुलांच्या गटाच्या अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत "अ' गटात यजमान एसएनबीपी अकादमीच्या संघाने हरियानाच्या राजा कर्नल अकादमी संघाचा 9-1 अशा गोलने पराभव करीत विजयी सलामी दिली. 

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू झालेल्या या स्पर्धेत राजा कर्नल अकादमीविरुद्धच्या सामन्यात एसएनबीपी अकादमीच्या खेळाडूंचे पूर्ण वर्चस्व होते मध्यतरांसच त्यांनी 4-0 अशी मोठी आघाडी घेतली होती एसएनबीपीकडून साजिद शहा (9 व 57 वे मिनीट), नरेश चाटोळे (25 व 45 वे मिनीट) आणि शादाब मोहम्मदने (39 व 53 वे मिनीट) प्रत्येकी दोन तर अल्फाज सय्यद (27 वे मिनीट), ऋषीकेश मंडाळे (33 वे मिनीट) व आकाशसिंगने (61 वे मिनीट) प्रत्येकी एक गोल करून संघाला सहज विजय मिळवून दिला. राजा कर्नल अकादमीकडून एकमेव गोल रूपींदरसिंगने 63 व्या मिनिटास केला. 

'ज' गटात बिहारच्या आर्मी बॉईज स्पोर्टस कंपनी संघाने सॅल्यूट हॉकी अकादमीचा 6-1 अशा गोलने पराभव केला. मध्यतरांस त्यांनी 5-0 अशी मोठी आघाडी घेतली होती. आर्मी बॉईजच्या विजयात मनोरंजन मिंज (9 व 24 वे मिनीट) व सचित होरोने (28 व 67 वे मिनीट) केलेल्या प्रत्येकी दोन गोलचा प्रमुख वाटा होता त्याला मुनिश टी. (23 वे मिनीट) व सचिन डुंगडुंगने (32 वे मिनीट) प्रत्येकी एक गोल करून सुरेख साथ दिली. पराभूत संघाकडून एकमेव गोल नंदकिशोरने 70 व्या मिनिटास केला होता. 

'ब' गटात दिल्लीच्या घुमनहेरा रायझर्स संघाने उत्तर प्रदेशच्या कोहिनूर अकादमीवर पाच गोलच्या फरकाने विजय मिळविला. पूर्वार्धात दोन्ही संघातील खेळाडूंनी तोडीसतोड खेळ केला. दिल्लीच्या साहिल कुमारने 24 व्या मिनिटास गोल करून संघाचे खाते उघडले मध्यतरांस ही आघाडी कायम होती उत्तरार्धात प्रशांतसिंगने हॅटट्रिकसह (47, 48, 58 व 65 वे मिनीट) चार गोल करत संघाला विजय मिळवून दिला. या स्पर्धेत हॅटट्रिक करणारा प्रशांतसिंग हा पहिलाच खेळाडू ठरला. 
 

संबंधित बातम्या