Pro Kabaddi : कबड्डीच्या महासागरात महाराष्ट्राचा सिद्धार्थ सर्वात महागडा

शैलेश नागवेकर
Tuesday, 9 April 2019

गत स्पर्धेत प्रमुख खेळाडूंवर कोटींची उधळण करणाऱ्या संघ मालकांनी यंदाच्या प्रो कबड्डी लिलावात सावध पवित्रा घेतला. सहापैकी केवळ दोनच खेळाडूंना कोटींचा भाव मिळाला, परंतु कबड्डीच्या या महासागरात महाराष्ट्राचा सिद्धार्थ देसाई सर्वात महागडा ठरला त्याच्यासाठी तेलगू टायटन्सने १ कोटी ४५ लाख मोजले.

मुंबई : गत स्पर्धेत प्रमुख खेळाडूंवर कोटींची उधळण करणाऱ्या संघ मालकांनी यंदाच्या प्रो कबड्डी लिलावात सावध पवित्रा घेतला. सहापैकी केवळ दोनच खेळाडूंना कोटींचा भाव मिळाला, परंतु कबड्डीच्या या महासागरात महाराष्ट्राचा सिद्धार्थ देसाई सर्वात महागडा ठरला त्याच्यासाठी तेलगू टायटन्सने १ कोटी ४५ लाख मोजले.

येत्या सातव्या मोसमासाठी प्रो कबड्डीचा दोन दिवसांचा लिलाव आजपासून सुरु झाला. परदेशी आणि देशातील सर्वोत्तम खेळाडूंसाठी आज बोली लागली. गतवर्षी फझल अत्राचली या परदेशी खेळाडूंसह सहा खेळाडूंना कोटींची रक्कम मिळाली होती. यंदा सिद्धार्थ देसाई आणि नितीन तोमर (1.20 ) हेच करोडपती ठरले.

गतवर्षी यू मुम्बाकडून खेळणारा सिद्धार्थ स्टार चढाईपटू ठरला होता. यंदा संघात कायम रहण्यापेक्षा लिलावात येणे त्याने पसंद केले. आजच्या लिलवात त्याच्यावरच सर्वांचे लक्ष होते.  30 लाखांच्या पायाभूत किंमतीवरून त्याचे नाव पुकारण्यात आले तेव्हा तेलगूने थेच  1  कोटींची बोली लावली, त्यासाठी पुण्यानेही प्रयत्न केले अखेर तेलगूने बाजी मारली.
रिशांकला सर्वात कमी किंमत

गतवर्षी युपी योद्धाचा कर्णधार असलेल्या रिशांकला  1 कोटी 1  लाख मिळाले होते. यंदा त्याला  61  लाखांचीच किमत मिळाली. युपीने ट्रम कार्ड (बोली लागणाऱ्या किंमतीत कायम ठेवणे) लावून आपल्या संघात कायम ठेवले. 

बचावाला कमी प्राधान्य
लिलावात पुन्हा एकदा चढाईपटूंना अधिक भाव देण्यावर भर राहिला. बचाव खेळाडूंत महेंद्रसिंगला सर्वाधिक  80 लाख बंगळूरने दिले. तर दोन अष्टपैलू खेळाडूंत यू मुम्बाने संदीर नरवालसाठी  89  लाख मोजले.

मी शेतकरी कुटूंबातून आलो आहे, कबड्डीसाठी आहार, व्यायाम यासाठी किती खर्च होतो हे मला माहित आहे, त्यामुळे यातील काही रक्कम मी माझ्या गावातील, तालुक्यातील गरीब खेळाडूंसाठी खर्च करणार आहे. एवढी रक्कम मी अपेक्षित केली नव्हती, एवढील बोली लागल्यावर मी नाचायलाच लागलो आहे.
-सिद्धार्थ देसाई

अव्वल श्रेणीचे खेळाडू
अष्टपैलू : रण सिंग : 55 तमिळ थलैवा
संदीप नरवाल : 89 यू मुम्बा 

(पकड) : रविंदर पहल : 61 लाख, दिल्ली,  सुरेंद्र नाडा : 77 लाख पाटणा, गिरीश इरनाक : 33  लाख (पुणे), सुरजित : 56 लाख पुणे, जयदीप :  35  लाख (पाटणा), महेंद्रसिंग : 80  लाख (बंगळुर), परवेश :  75  लाख (गुजरात), विशाल भारद्वाज : 60 लाख (तेलगू), अमित हुडा ;  53 (जयपूर) 

चढाई :
चंद्रन रणजीत : 70 लाख (दिल्ली), सिद्धार्थ देसाई : 1  कोटी 45  लाख (तेलगू), नितीन तोमार :  1 कोटी 20  लाख (पुणे), मोनु गोयत :  93  लाख (यूपी योद्धा), राहुल चौधरी :  94 लाख (तमिळ थलैवा), रिशांक देवाडिगा : 61  लाख (यूपी), प्रशांक कुमार राय : 77 लाख (हरियाना), श्रीकांत जाधव : 68  लाख (यूपी योद्धा) 

इराणचा नबिबक्क्ष परदेशी खेळाडूंमध्ये महागडा
परदेशी खेळाडूंमध्ये इराणचा अष्टपैलू महम्मद नबिबक्क्ष याला सर्वाधिक 77.75 लाखांची बोली लागली. बंगाल संघाने त्याची बोली जिंकली. नबिबक्क्ष प्रो कबड्डीत प्रथमच खेळणार आहे.  दुबईत झालेल्या मास्टर्स कबड्डी स्पर्धेत त्याने चमक दाखवली होती. इराणच्या अबोझरसाठीही चांगली स्पर्धा झाली. त्याच्यासाठी 75 लाख मोजून तेलगूने आपल्या संघात कायम ठेवले.

संबंधित बातम्या