गुडघेदुखीमुळे सेरेनाची माघार 

वृत्तसंस्था
Sunday, 24 March 2019

या वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धेत पुढील वर्षी सहभागी होण्याची मला आशा आहे. मायामीतील चाहते अनोखा प्रतिसाद देतात. 
- सेरेना विल्यम्स, अमेरिकेची टेनिसपटू 

मायामी, फ्लोरिडा : मातृत्वानंतर पुनरागमनासाठी प्रयत्नशील असलेली अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिला दुखापतीमुळे पुन्हा हादरा बसला. गुडघेदुखीमुळे तिला मायामी टेनिस स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

याआधी इंडियन वेल्समधील स्पर्धेत विषाणू संसर्गामुळे तिला माघार घ्यावी लागली होती. सेरेना आठवेळची विजेती आहे. दुसऱ्या फेरीत तिने स्वीडनच्या रिबेका पीटरसनचे कडवे आव्हान परतावून लावले होते. त्यानंतर तिसऱ्या फेरीत तिची चीनच्या वॅंग क्वियांगविरुद्ध लढत होती. पण, वॅंगला बाय देणे तिला भाग पडले. 

सेरेनाने 2002 मध्ये ही स्पर्धा सर्वप्रथम जिकली. त्यानंतर तिने 2015 मध्ये आठवे जेतेपद मिळविले होते. ग्रॅंडस्लॅम पातळीवर सेरेनाने 2017 मध्ये ऑस्ट्रेलियन जेतेपद मिळविले होते. ते तिचे 23वे ग्रॅंडस्लॅम जेतेपद होते. मार्गारेट कोर्ट यांच्या 24 जेतेपदांच्या सर्वकालीन विक्रमाची बरोबरी करण्याची आणि तो मोडण्याची सेरेनाला प्रतीक्षा आहे. मात्र, यंदा तिला दुखापती आणि आजारपणाने ग्रासले आहे. त्यामुळे तिची तंदुरुस्ती सर्वोच्च पातळीवर नाही. 

या वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धेत पुढील वर्षी सहभागी होण्याची मला आशा आहे. मायामीतील चाहते अनोखा प्रतिसाद देतात. 
- सेरेना विल्यम्स, अमेरिकेची टेनिसपटू 

संबंधित बातम्या