आव्वाज! कुणाचा घोषणांनी भारावले वातावरण 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 January 2019

अरे आव्वाज कुणाचा...!' अशा घोषणा आतापर्यंत पुण्यातील शैक्षणिक जीवनात आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक नाट्यस्पर्धेतच ऐकायला मिळत होत्या. पण, "स्कूलिंपिक्‍स' या आंतरशालेय स्पर्धेच्या निमित्ताने आता शालेय स्तरावरही या घोषणा ऐकू येऊ लागल्या.

पुणे : "अरे आव्वाज कुणाचा...!' अशा घोषणा आतापर्यंत पुण्यातील शैक्षणिक जीवनात आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक नाट्यस्पर्धेतच ऐकायला मिळत होत्या. पण, "स्कूलिंपिक्‍स' या आंतरशालेय स्पर्धेच्या निमित्ताने आता शालेय स्तरावरही या घोषणा ऐकू येऊ लागल्या. अशाच घोषणांनी आणि विद्यार्थ्यांच्या सळसळत्या उत्साहात "सकाळ' आयोजित मॅप्रो "स्कूलिंपिक्‍स' स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी पंडित फार्म येथे पार पडला. 

'सकाळ' माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, मुख्य प्रायोजक मॅप्रो फूड्‌स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मयूर व्होरा, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री स्मिता गोंदकर यांच्यासह 'स्कूलिंपिक्‍स'शी नाते जोडले गेलेल्या टॅब कॅपिटलचे अभय भुतडा, एमआयटीचे मंगेश कराड, लोकमान्य को-ऑप सोसायटीचे सुशील जाधव, रोझरी एज्युकेशन सोसायटीचे विवेक अरान्हा, विनय अरान्हा, ध्रुव ग्लोबल स्कूल आणि वेट न जॉयचे यश मालपाणी, श्री वेंकटेश बिल्डकॉनचे अंकुश असबे, भैरवी व्हेजचे राहुल मुरकुटे, एमजेएम हॉस्पिटलचे मनिीष बोरसे, एनपीएवीचे संजीव केला, एसपी एंटरप्रायजेसचे सचिन बामगुडे, मॉडेल एलिनॉर ख्रिस यांच्या हस्ते भविष्यातील चॅंपियन्सचा गौरव करण्यात आला. 

शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक यांच्यासह उपस्थित असलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करायला त्यांचे पालक, आजी, आजोबा, काका, काकी यांच्यामुळे या पारितोषिक वितरणाला उत्साह आणि प्रोत्साहनाची वेगळीच झालर लाभली. शालेय जीवनातच क्रीडापटू म्हणून घडण्यासाठी घरून मिळणारे प्रोत्साहन सर्वांत महत्त्वाचे ठरत असते, त्यामुळे या पालक वर्गालाही मान्यवरांनी दिलेला मानाचा मुजरा वैशिष्ट्यपूर्ण ठरला. 

व्यासपीठ महत्त्वाचे : अभिजित पवार 
शालेय जीवनात अभ्यासाबरोबर आपल्या अंगभूत कलागुणांना मिळणारा वाव हा त्या विद्यार्थ्याच्या कारकिर्दीमधील एक महत्त्वाचा भाग असतो. विद्यार्थ्यांच्या अंगातील क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी "सकाळ'ने त्यांच्यासाठी "स्कूलिंपिक्‍स'चे व्यासपीठ उभे केले आणि त्याचा खूप मोठा फायदा या विद्यार्थ्यांनी घेतला. सर्व सहभागी आणि यशस्वी विद्यार्थी यासाठी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दांत अभिजित पवार यांनी विद्यार्थ्यांची पाठ थोपटली. 

ते म्हणाले, "खेळामुळे सगळी जीवनशैलीच बदलते. अंगात शिस्त भिनते आणि नेतृत्त्व तसेच निर्णय घेण्याची कसोटी लागते. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूने मेहनत घेतली आहे. त्या सर्वांचे अभिनंदन. भविष्यात देशासाठी पदक जिंकण्याची प्रेरणा या निमित्ताने खेळाडूंमध्ये निर्माण झाली हे महत्त्वाचे. अशीच मेहनत कायम ठेवल्यात भविष्यात मोठे खेळाडू म्हणून तुम्ही नावारूपाला यात शंका नाही. तुमच्याबरोबच तुम्हाला खेळासाठी प्रेरित करणाऱ्या पालक, शिक्षकांचेही अभिनंदन.'' 

भारावून गेलो : सचिन 
येथे विद्यार्थ्यांचे कौतुक करायला आलो. ज्या वेळी येत होतो तेव्हाच मुलांचा उत्साह पाहून भारावून गेलो. त्यांना मनातलं बोलताना पाहिले, जिंकताना पाहिले काय हा आत्मविश्‍वास. त्यांच्याकडे नुसते पाहून माझा आत्मविश्‍वास वाढला. ही महाराष्ट्राची मुले आहेत, अजून पुढे जायला हवीत. "सकाळ'चा "स्कूलिंपिक्‍स' हा उपक्रम दरवर्षी खेळाडू घडवतोय, दरवर्षी मोठा होतोय नक्कीच यातून उद्याचे चॅंपियन्स घडतील, सकाळ तुम्हाला सलाम ! 

असे आहेत विजेते 
सुवर्ण करंडक : सिंहगड स्प्रिंग डेल, वडगाव (14 सुवर्ण, 16 रौप्य, 37 ब्रॉंझ 155 गुण) 
रौप्य करंडक : अभिनव इंग्रजी विद्यालय एरंडवणे (14 सुवर्ण, 17 रौप्य, 13 ब्रॉंझ, 134 गुण) 
ब्रॉंझ करंडक : मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर (16 सुवर्ण, 6 रौप्य, 11 ब्रॉंझ, 134 गुण) 

स्पर्धेचे मानकरी 
आरुष बधे (मिलेनियम प्रशाला, जलतरण प्रकारात नऊ सुवर्ण) 
वैष्णवी मोरे (सेंट जोसेफ प्रशाला, जलतरण प्रकारात 5 सुवर्ण, दोन रौप्य) 
 
विशेष नैपुण्यपद 

रितेश कडगी (श्री सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कोथरूड, खो-खो खेळात धारदार आक्रमक) 
विनायक हांडे (नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांचे मिलिटरी स्कूल, फुलगाव, हॉकीमध्ये 12 गोल) 
अनीहा डिसूझा : (एसपीएम इंग्लिश माध्यम स्कूल, सदाशिव पेठ, टेबल टेनिस प्रकारात एकेरी आणि दुहेरीत सुवर्णपदक) 

संबंधित बातम्या