साईनाची शर्थीची झुंज अपयशी 

वृत्तसंस्था
Sunday, 21 October 2018

साईनाने तईच्या तुलनेत कमकुवत समजल्या जाणाऱ्या बॅकहॅंडवर लक्ष केंद्रित केले आहे, पण तईने आता कोर्टला समांतर तसेच वेगाने खोलवर जाणारे फटके परतवण्याचाही चांगला सराव केला आहे. त्यामुळे तईने वर्चस्व घेतल्यावर ते भेदणे सोपे नसते. हेच पहिल्या आणि तिसऱ्या गेममध्ये घडले. तईविरुद्ध काही तरी वेगळे करण्याच्या दडपणाखाली साईनाकडून अपेक्षित नसलेल्या चुका झाल्या.

मुंबई : पहिल्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन विजेतेपदाच्या सहाव्या वाढदिवशी पुन्हा तीच कामगिरी करण्यास साईना नेहवालला अपयश आले. तिने रविवारी अंतिम फेरीत तई त्झु यिंग हिला कडवी झुंज दिली. गेल्या काही महिन्यांतील सर्वोत्तम खेळ केला, तरीही तिला अंतिम सामन्यात हार पत्करावी लागली. 

ओडेन्स येथील स्पर्धेत साईनाने सुरवातीच्या फेऱ्यात जपानीविरुद्धचा अपयशाचा फेरा भेदला होता, पण तिला तईविरुद्धची सलग अकरावी लढत गमवावी लागली. तईचे एवढे एकतर्फी वर्चस्व एकाही आघाडीच्या खेळाडूविरुद्ध नाही, तरीही साईनाच्या खेळाचे कौतुक करावेसे वाटते. तिला 13-21, 21-13, 6-21 पराभवास सामोरे जावे लागले. 
जागतिक क्रमवारीत दुसरी असलेली अकेन यामागुची आणि माजी जगज्जेती नोझोमी ओकुहारा यांना साईनाने पराजित केले होते, त्या वेळी साईनाची आक्रमकता निर्णायक ठरली होती, तईविरुद्ध हे पुरेसे नसते. साईनाने या दोन्ही लढतीत बेसलाईनजवळ अचूक पेरणी केली होती, पण तईला साईड लाइनच्या पट्ट्यात फसवावे लागते आणि हे सोपे नसते. तईकडे फटक्‍यांचा भरपूर भाता आहे; तसेच मनगटाच्या वेगाने हालचाली करीत शटलची दिशा ऐनवेळी बदलण्याची तिची खासियत आहे. 

साईनाने तईच्या तुलनेत कमकुवत समजल्या जाणाऱ्या बॅकहॅंडवर लक्ष केंद्रित केले आहे, पण तईने आता कोर्टला समांतर तसेच वेगाने खोलवर जाणारे फटके परतवण्याचाही चांगला सराव केला आहे. त्यामुळे तईने वर्चस्व घेतल्यावर ते भेदणे सोपे नसते. हेच पहिल्या आणि तिसऱ्या गेममध्ये घडले. तईविरुद्ध काही तरी वेगळे करण्याच्या दडपणाखाली साईनाकडून अपेक्षित नसलेल्या चुका झाल्या. तिची सर्व्हिसच बेसलाईनच्या बाहेर गेली. तसेच कमरेच्या वरून केल्यामुळे अवैध ठरली त्याचबरोबर तईच्या सर्व्हिसचा अंदाज अनेकदा चुकला. दुसऱ्या गेममध्ये साईनाने तईला बेसलाइनजवळ ठेवत तिला चुका करण्यास भाग पाडले; मात्र या गेममध्ये प्रत्येक गुण जिंकल्यावर व्यक्त होणारा आनंद तिच्या चाहत्यांच्या मनात धोक्‍याची घंटा वाजवत होता. निर्णायक गेममध्ये तईच्या चुका कमी होत असताना साईनाच्या वाढत गेल्या आणि तईने वर्षातील आठवे विजेतेपद जिंकले. 

साईनाचे हुकलेले यश 
- साईना 2012 नंतर प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत, त्या वेळी विजेती. 
- साईनाचा तईविरुद्धचा सलग 11 वा पराभव, तर एकंदरीत तेरावा. 
- साडेपाच वर्षांत साईनाचा तईविरुद्ध विजय नाही. 
- साईनाने यंदा तईविरुद्ध प्रथमच गेम जिंकला, यापूर्वीच्या चार लढतींत दोन गेममध्येच हार. 
- यंदा इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत तईचा साईनाविरुद्ध विजय. 
- 2016 च्या ऑस्ट्रेलियन ओपननंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधील यश साईनास दुरावतच आहे. 
- साईनाने या स्पर्धेत अकेन यामागुची, तसेच नोझोमी ओकुहाराविरुद्धची पराभवाची मालिका खंडित केली होती, पण तईविरुद्धची कायम. 
- तईचा यंदाच्या 56 पैकी केवळ 5 लढतीत पराभव. 
 

संबंधित बातम्या