साईनाकडून सिंधू चेकमेट; चौथे राष्ट्रीय जेतेपद 

वृत्तसंस्था
Saturday, 16 February 2019

सौरभ विजेता 
सौरभने प्रतिभाशाली लक्ष्य सेनला 21-18, 21-13 असे हरवून सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय जेतेपद मिळविले. 2016 व 17 मध्येही त्याने लक्ष्यलाच हरवून ही कामगिरी केली होती. पुरुष दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा-चिराग शेट्टी विजेते ठरले. त्यांनी श्‍लोक रामचंद्रन-एम. आर. अर्जुन यांच्यावर 21-13, 22-20 अशी मात केली. 

गुवाहाटी : साईना नेहवालने बहुचर्चित लढतीत पी. व्ही. सिंधूला दोन गेममध्येच हरवून राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. सलग दुसऱ्यांदा तिने अशी कामगिरी केली. कारकिर्दीत चौथ्यांदा तिने राष्ट्रीय जेतेपद पटकावले. पुरुष एकेरीत सौरभ वर्माने हॅट्ट्रिक साधली. 

साईनाने 21-18, 21-15 असा विजय संपादन केला. दोन वेळच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेत्या साईनाने भारतामधील लढतींत सिंधूवर वर्चस्व राखले आहे. वास्तविक सिंधूने चांगली सुरवात केली होती, पण नंतर साईनाच्या वैविध्यपूर्ण शॉट्‌समुळे तिला झगडावे लागले. साईनाची सुरवात बऱ्याच वेळा संथ असते. या वेळी हेच घडले, पण त्यानंतर तिने सतत बरोबरी राखली. त्यामुळे पहिल्या गेममधील ब्रेकच्या वेळी साईना 11-10 अशी पुढे होती. मग तिने सिंधूला धावाधाव करण्यास भाग पाडत गुण जिंकले.

सिंधूने त्यानंतर 17-18 अशी स्थिती साधली, पण साईनाने डावपेच कायम ठेवत वैविध्य राखले. त्यामुळे तिला पहिला गेम जिंकता आला. दुसऱ्या गेममध्येही साईना 0-2, 3-5 अशी मागे होती. 5-5 अशी बरोबरी साधल्यानंतर साईनाने सरस अनुभव पणास लावला. त्यातच सिंधूचा अंदाज चुकून चुका होऊ लागल्या. ब्रेकच्या वेळी साईना 11-9 अशी पुढे होती. 13-9 अशा आघाडीसह तिने पकड भक्कम केली. त्यानंतर तिने विजय लांबू दिला नाही. 

सौरभ विजेता 
सौरभने प्रतिभाशाली लक्ष्य सेनला 21-18, 21-13 असे हरवून सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय जेतेपद मिळविले. 2016 व 17 मध्येही त्याने लक्ष्यलाच हरवून ही कामगिरी केली होती. पुरुष दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा-चिराग शेट्टी विजेते ठरले. त्यांनी श्‍लोक रामचंद्रन-एम. आर. अर्जुन यांच्यावर 21-13, 22-20 अशी मात केली. 

लाइट गायब 
साईना-सिंधू लढतीत पहिल्या गेममध्ये लाइट काही वेळ अचानक गायब झाली. त्यामुळे सामना थोडा वेळ थांबवावा लागला. बिघाड दुरुस्त झाल्यानंतर खेळ पुढे सुरू झाला तेव्हा सिंधूने सलग दोन गुण जिंकले होते, पण साईनाने लगेच लय मिळविली. स्पर्धेच्या प्रारंभी साईनाने कोर्ट असमतोल असल्याच्या कारणावरून प्रारंभी खेळण्यास नकार दिला होता. 

संबंधित बातम्या