रोनाल्डोचा बोलबाला; गोलचा मान डिबालाला

वृत्तसंस्था
Thursday, 25 October 2018

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ओल्ड ट्रॅफर्डवरील 'पुनरागमना'मुळे बहुचर्चित ठरलेल्या चॅंपियन्स लीगमधील सामन्यात युव्हेंट्‌सने मॅंचेस्टर युनायटेडला एकमेव गोलने हरविले. 17व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा खेळाडू पाऊलो डिबाला याने केलेला गोल निर्णायक ठरला.

मॅंचेस्टर : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ओल्ड ट्रॅफर्डवरील 'पुनरागमना'मुळे बहुचर्चित ठरलेल्या चॅंपियन्स लीगमधील सामन्यात युव्हेंट्‌सने मॅंचेस्टर युनायटेडला एकमेव गोलने हरविले. 17व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा खेळाडू पाऊलो डिबाला याने केलेला गोल निर्णायक ठरला.

पूर्वार्धात इटालियन विजेत्या युव्हेंट्‌सला अनेक संधी मिळाल्या. चेंडूवर 70 टक्के ताबा राखताना त्यांनी दहा शॉट मारले होते. मॅंचेस्टर युनायटेडला दुसऱ्या सत्रात थोडाफार सूर गवसला; पण पॉल पोग्बा याचा फटका गोलपोस्टला लागून रिबाउंड झाला. होजे मॉरीनीयो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघासाठी हा निकाल निराशाजनक ठरला. प्रतिस्पर्धी प्रेक्षकांनी मॉरीनीयो यांना उद्देशून शेरेबाजीही केली.

रोनाल्डो आकर्षण
चॅंपियन्स लीगचा ड्रॉ जाहीर झाल्यापासून रोनाल्डो या लढतीचे आकर्षण होता. अलीकडे बलात्काराच्या आरोपांमुळे तो वादात सापडला आहे. मात्र, याचा काहीही परिणाम झाला नसून आपण आनंदात आहोत, असे विधान या लढतीच्या पूर्वसंध्येस त्याने केले होते. या पार्श्‍वभूमीवर त्याचे संघाबरोबर मैदानावर आगमन झाले, तेव्हा स्थानिक प्रेक्षकांनीही त्याचे जोरदार स्वागत केले. एका बाल चाहत्याने रोनाल्डोच्या नावाचा बॅनर आणला होता.

दृष्टिक्षेपात
- "ह' गटात युव्हेंट्‌स तीन सामन्यांतून नऊ गुणांसह आघाडीवर
- मॅंचेस्टर युनायटेड तीन सामन्यांतून चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर
- उभय संघांत तुरीनमध्ये सात नोव्हेंबर रोजी लढत
- व्हॅलेन्सिया व यंग बॉइज यांच्यातील 1-1 बरोबरी मॅंचेस्टर युनायटेडच्या पथ्यावर

संबंधित बातम्या