TATA Open : बोपण्णा-दिवीज सुवर्ण विजेत्यांची सलामीही सोनेरी

मुकुंद पोतदार
Saturday, 5 January 2019

दृष्टिक्षेपात
- बोपण्णा-दिवीज जोडीचे एटीपी टूरवरील पहिलेवहिले जेतेपद
- बोपण्णाचे एटीपी टूरवरील 18 वे विजेतेपद, तर दिवीजचे चौथे
- यापूर्वी दोघांचे ऑक्‍टोबर 2017 मध्ये यश
- बोपण्णा व्हिएन्नातील स्पर्धेत उरुग्वेच्या पाब्लो क्‍युव्हाजच्या साथीत विजेता
- दिवीजचे अँटवर्पमध्ये स्कॉट लिप्स्की याच्या साथीत यश.

पुणे : एशियाड सुवर्णपदक विजेत्या रोहन बोपण्णा-दिवीज शरण यांनी नव्या मोसमात सलामीही सोनेरी दिली. टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धा जिंकताना या जोडीने ब्रिटनच्या ल्यूक बॅंब्रीज-जॉनी ओमारा यांच्यावर 6-3, 6-4 अशी एकतर्फी मात केली.

म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या कोर्टवर भारतीय जोडीने अग्रमानांकनास साजेसा खेळ केला. पहिल्या सेटमध्ये भारतीय जोडीने आठव्या गेममध्ये ब्रेक मिळविला. नवव्या गेममध्ये बोपण्णाने भक्कम सर्व्हिसच्या जोरावर ब्रिटिश जोडीला संधी दिली नाही. पहिल्या सेटच्या आघाडीनंतर भारतीय जोडीला प्रेक्षकांनी आणखी जोरदार प्रोत्साहन दिले. दुसऱ्या सेटमध्ये चौथ्या गेममध्ये 0-30 अशा पिछाडीनंतर दिवीजने बिनतोड सर्व्हिस केली. त्यानंतर बॅंब्रीजची सर्व्हिस भेदत भारतीय जोडीने पकड भक्कम केली. बोपण्णाने सर्व्हिस लव्हने राखली. मग ओमाराचीही सर्व्हिस भेदत भारतीय जोडीने 5-2 अशी आघाडी घेतली. पुढील गेममध्ये सर्व्हिस राखण्याची गरज असताना दिवीजने ती गमावली, पण बोपण्णाने विजय आणखी लांबू दिला नाही.

दृष्टिक्षेपात
- बोपण्णा-दिवीज जोडीचे एटीपी टूरवरील पहिलेवहिले जेतेपद
- बोपण्णाचे एटीपी टूरवरील 18 वे विजेतेपद, तर दिवीजचे चौथे
- यापूर्वी दोघांचे ऑक्‍टोबर 2017 मध्ये यश
- बोपण्णा व्हिएन्नातील स्पर्धेत उरुग्वेच्या पाब्लो क्‍युव्हाजच्या साथीत विजेता
- दिवीजचे अँटवर्पमध्ये स्कॉट लिप्स्की याच्या साथीत यश.

टायब्रेक खेळण्याची कुणाचीच इच्छा नसते. आम्ही सर्व्हिसवर लक्ष केंद्रीत केले. सुरुवात भक्कम केली. त्यात यश आले. प्रतिस्पर्धी जोडी आमच्यापेक्षा जास्त अनुभवी होती, तर ही आमची पहिली स्पर्धा व पहिलाच अंतिम सामना होता. ब्रिटिश जोडीने गेल्या वर्षी टूरवर यश मिळविले आहे. जोडी म्हणून ते सरस होते, पण मायदेशात खेळण्याचा आम्हाला फायदा झाला. आमच्या प्रत्येक ब्रेकनंतर झालेला जल्लोष प्रेरणादायी ठरला.
- रोहन बोपण्णा

आज माझी सर्व्हिस सरस झाली. कोर्ट वेगवान होते. आधीच्या फेऱ्यांत आम्ही संध्याकाळी खेळलो. हा सामना दुपारी झाला. त्याचाही फायदा झाला. आमचा खेळ भक्कम झाला. सर्व्हिस आणि परतीचे फटकेही चांगले बसले. ते उपयुक्त ठरले. दुसऱ्या सेटमध्ये चौथ्या गेममधील बिनतोड सर्व्हिसनंतर फिनिशिंगचा आत्मविश्‍वास उंचावला.
- दिवीज शरण

अँडरसनचे जेतेपदाचे स्वप्न साकार
दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनचे जेतेपदाचे स्वप्न यंदा साकार झाले. गतवर्षी तो उपविजेता ठरला होता. त्याने क्रोएशियाचा आव्हानवीर इव्हो कार्लोविच याचे आव्हान 7-6 (7-4), 6-7 (2-7), 7-6 (7-5) असे परतावून लावले. ही लढत दोन तास 44 मिनिटे चालली. अँडरसनने 21; तर कार्लोविचने 36 बिनतोड सर्व्हिस केल्या. त्यातही अँडरसनला एकाही ब्रेकपॉइंटला सामोरे जावे लागले नाही; तर कार्लोविचने आठपैकी आठ ब्रेकपॉइंट वाचवले. अँडरसनला गेल्या वर्षी अंतिम फेरीत जील सिमॉने हरविले होते. या वेळी उपांत्य फेरीत त्याने सिमॉवर मात केली.

उत्तुंग स्पर्धक
सहा फूट 11 इंच उंचीचा कार्लोविच आणि सहा फूट आठ इंच उंची असलेला अँडरसन यांच्यातील अंतिम सामना पहिल्या पॉइंटपूर्वीच ऐतिहासिक ठरला. एटीपी टूरवरील स्पर्धेत अंतिम फेरी गाठलेल्या स्पर्धकांमध्ये हे दोघे सर्वांत उत्तम ठरले.
यापूर्वी 2013 मध्ये अटलांटामधील स्पर्धेत सहा फूट 10 इंच उंची असलेल्या अमेरिकेच्या जॉन इस्नरने अँडरसनला तीन टायब्रेकमध्ये हरवले होते.

संबंधित बातम्या