फेडरर झगडला, पण लढला अन् जिंकला

मुकुंद पोतदार
Tuesday, 26 February 2019

दुसऱ्या सेटमध्ये फेडरर पिछाडीवर असताना प्रेक्षकांनी त्याच्यासाठी मेक्सिकन वेव्ह करीत प्रोत्साहन दिले. एरवी फेडररचा धडाका सुरु असतो आणि त्याने आघाडी घेतलेली असते तेव्हा प्रेक्षक असे करीत असतात. यावेळी त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत दिलेले प्रोत्साहन प्रेरणादायक असल्याचे फेडररने म्हटले आहे.

स्वित्झर्लंडचा अद्वितीय टेनिसपटू रॉजर फेडरर याने दुबई जर्मनीच्या फिलीप कोलश्क्रायबरला 6-4, 3-6, 6-1 असे हरविले. फिलीप 35 वर्षांचा आहे, तर फेडररचे वय 37 आहे. सर्व 14 लढतींत फेडररची सरशी झाली आहे. फेडररसाठी मोसमाची सुरवात अपयशी झाली. ऑस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीत ग्रीसच्या स्टीफानोस त्सित्सिपासकडून त्याचा धक्कादायक पराभव झाला. या पराभवानंतर फेडरर प्रथमच स्पर्धात्मक सामन्यासाठी कोर्टवर उतरला होता.

फेडररने 2016 नंतर प्रथमच क्ले कोर्टवर खेळायचे ठरविले आहे. निवडक स्पर्धांत सहभागी होण्याचे धोरण फेडररला फलदायी ठरले, पण अलिकडे त्याची दुसरी बाजू सुद्धा उघड होत आहे. स्पर्धात्मक पातळीवरील सहभागाविषयी फेडररला फेरविचार करणे भाग पडले आहे. त्यामुळेच त्याने नावडत्या किंवा कमी पसंतीच्या क्ले कोर्टवर खेळायचा निर्णय त्याला घ्यावा लागला आहे.

फेडररला कारकिर्दीतील 100व्या विजेतेपदाची प्रतिक्षा आहे. दुसऱ्या सेटमध्ये फेडरर पिछाडीवर असताना प्रेक्षकांनी त्याच्यासाठी मेक्सिकन वेव्ह करीत प्रोत्साहन दिले. एरवी फेडररचा धडाका सुरु असतो आणि त्याने आघाडी घेतलेली असते तेव्हा प्रेक्षक असे करीत असतात. यावेळी त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत दिलेले प्रोत्साहन प्रेरणादायक असल्याचे फेडररने म्हटले आहे.

2012 मध्ये कारकिर्द सर्वाधिक भरात होती, पण तेव्हा प्रेक्षकांचा इतका पाठिंबा नसायचा. आता जेथे जातो तेथे मिळणारे प्रेम खरीखुरी मेजवानी असल्याची भावनाही फेडररने व्यक्त केली. ऑस्ट्रेलियन ओपनमधील पराभवानंतर फेडररच्या निवृत्तीवरून पुन्हा चर्चा सुरु झाली, पण या स्पर्धेपूर्वी फेडररने गुडबाय सिझन सुरु करण्याचा इतक्यात विचार नसल्याचा पुनरुच्चार केला.

प्रेक्षकांच्या प्रतिसादाची अनुभूती घेत राहणे हे मी खेळत राहण्याचे एक प्रमुख कारण आहे. मला त्यांच्या सहवासात राहायचे आहे. मला चांगले शॉट््स मारायचे आहेत. मला show प्रदर्शित करायचा आहे, असे फेडररने उद्गार आहेत. यावरून तो आता स्वःत खेळाचा आनंद लुटण्यासाठी आणि त्याद्वारे प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी खेळतो आहे हे स्पष्ट होते.

फेडररला आता सिद्ध करण्यासारखे काहीही उरलेले नाही. तो विक्रमी कारकिर्द घडवित होता तेव्हा त्याचे यश आनंददायक होता. फेडररला स्वतःला या यशाचा आनंद लुटता आला हे नक्की, पण त्याला तेव्हा सतत peform किंवा prove करणे अनिवार्य असताना खेळाचा आनंद किती लुटता आला असेल हा प्रश्न त्याच्या निवृत्तीचा विषय छेडणाऱ्यांनी स्वतःलाच विचारावा. प्रामाणिक विचार केल्यास याचे उत्तर नकारार्थी असण्याची शक्यताच जास्त असेल.

स्टीफानोसविरुद्ध पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर फेडरर हरला. त्याला 12 पैकी एकही ब्रेकपॉइंट जिंकता आला नव्हता. हा पराभव त्याच्यासाठी धक्कादायक ठरण्याचे कारण म्हणजे पहिला सेट जिंकल्यानंतर फेडरर यापूर्वी या स्पर्धेत 89 सामन्यांत केवळ दोन वेळा हरला होता. रॅफेल नदाल आणि रशियाचा मॅराट साफीन यांच्याविरुद्ध हे घडले होते. 2013 नंतर प्रथमच फेडररला सलग तीन ग्रँड स्लॅम स्पर्धांत किमान उपांत्य फेरी गाठता आली नाही. 2017 मध्ये तीन ग्रँड स्लॅम स्पर्धांत भाग घेताना दोन जिंकणाऱ्या फेडररचा स्टिफानोसविरुद्ध झालेला पराभव अनपेक्षित ठरण्यामागे ही पार्श्वभूमी सुद्धा महत्त्वाची आहे.

फेडररने यापूर्वीचे विजेतेपद मायदेशात मिळविले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये स्विस इनडोअर विजेता ठरला होता. असंख्य विक्रम केलेल्या फेडररकडून आता आणखी एका महत्त्वाच्या विक्रमाची अपेक्षा आहे. कारकिर्दीत सर्वाधिक जेतेपदांचा उच्चांक अमेरिकेच्या जिंबो उर्फ जिमी कॉनर्स यांच्या नावावर आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून फेडरर ऑफसीझनमध्ये दुबईत ट्रेनिंग करतो. त्यामुळे येथे ही कामगिरी साकार झाली तर ते यश फेडररसाठी मायदेशातील आधीच्या जेतेपदाप्रमाणेच सुखद असेल हे नक्की.

संबंधित बातम्या