बार्सिलोनाविरुद्धच्या पराभवाने रेयाल शर्यतीतून बाद 

वृत्तसंस्था
Monday, 4 March 2019

बार्सिलोनाने रेयाल माद्रिदविरुद्धची या मोसमातील हुकमत कायम राखताना स्पॅनिश फुटबॉल लीगमधील परतीच्या लढतीतही विजय मिळवला. या सामन्यातील 0-1 पराभवामुळे रेयाल ला लिगा विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. 

बार्सिलोना : बार्सिलोनाने रेयाल माद्रिदविरुद्धची या मोसमातील हुकमत कायम राखताना स्पॅनिश फुटबॉल लीगमधील परतीच्या लढतीतही विजय मिळवला. या सामन्यातील 0-1 पराभवामुळे रेयाल ला लिगा विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. 

रेयालच्या विजेतेपदाच्या आशा संपल्यापेक्षा ही लढत लिओनेल मेस्सी आणि सर्गिओ रामोस यांच्यातील चकमकीने जास्त चर्चेत राहिली. रामोसने मेस्सी चेंडूवर ताबा घेण्यापूर्वीच त्याला जोरदार किक केले आणि त्यानंतर त्याचा हात मेस्सीवर लागल्याचे दिसले. या वेळी मेस्सीच्या तोंडातून रक्त आले. मेस्सीने आपल्या ओठाकडे लक्ष वेधत रामोसला ढुशी देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांत शाब्दिक बाचाबाचीही झाली. काही वेळाने मेस्सी जमिनीवर खाली पडला; मात्र रेफरींनी कोणालाही कोणतेही कार्ड दाखवले नाही. हा अपवाद सोडल्यास रेयालने क्वचितच बार्सिलोनासमोर आव्हान निर्माण केले. 

लढतीचा निर्णय इवान रॅकिटिच याच्या अचूक गोलने केला. रेयालचे जास्तीत जास्त नुकसान करण्याचे आमचे लक्ष्य साध्य झाले, असे बार्सिलोनाचे मार्गदर्शक एरनेस्टो वालवेर्दे यांनी सांगितले. या विजयामुळे बार्सिलोनाने रेयालला 12 गुणांनी मागे टाकले. त्याचबरोबर दोघांतील लढतीच्या 87 वर्षांच्या इतिहासात प्रथमच बार्सिलोनाचे (96) विजय रेयालपेक्षा (95) जास्त झाले. त्याचबरोबर एकाच मोसमात रेयालने बार्सिलोनाविरुद्धच्या सलग तीन लढती गमावल्या. 

बायर्नने डॉर्टमंडला गाठले 
म्युनिच : बायर्न म्युनिचने बोरुसिया मोएशेनग्लॅडबॅशला 5-1 असे पराभूत केले आणि जर्मन लीग विजेतेपदाच्या स्पर्धेत बोरुसिया डॉर्टमंडला गाठले. डॉर्टमंडची ऑसबर्गविरुद्धची 1-2 हारही बायर्नच्या पथ्यावर पडली. डिसेंबरमध्ये डॉर्टमंडने बायर्नला नऊ गुणांनी मागे टाकले होते; मात्र त्यानंतर बायर्नने 12 पैकी 11 लढती जिंकत विजेतेपदाच्या शर्यतीत आले. 

सिटी अव्वलस्थानी 
बदली खेळाडू रियाद माहरेझ याच्या गोलमुळे मॅंचेस्टर सिटीने बोर्नमाऊथला 1-0 असे हरवले आणि प्रीमियर लीगमध्ये अव्वल स्थान मिळवले. सिटीने (71) आता लिव्हरपूलला दोन गुणांनी मागे टाकले आहे; पण लिव्हरपूलची एक लढत शिल्लक आहे. मॅंचेस्टर युनायटेडने चॅंपियन्स लीगची पूर्वतयारी करताना साऊदम्प्टनविरुद्ध 1-2 पिछाडीवरून 3-2 बाजी मारली. 

संबंधित बातम्या