पण त्या पठ्ठ्यानं आपली जबाबदारी पार पाडणं कधीही सोडलं नाही...

गौरव दिवेकर
Friday, 11 January 2019

राहुल द्रविडचा खेळ कधीच सुरवातीपासून चटकन आवडेल असा नव्हता. त्याच्याकडे गांगुलीसारखं ग्लॅमर नव्हत, सचिनसारखं देवत्वही नव्हतं. तरीही तो इतकी वर्षं खेळला. नुसताच खेळला नाही, तर जागतिक आणि भारतीय क्रिकेटमधला एक अढळ तारा बनला.

राहुल द्रविडचा खेळ कधीच सुरवातीपासून चटकन आवडेल असा नव्हता. त्याच्याकडे गांगुलीसारखं ग्लॅमर नव्हत, सचिनसारखं देवत्वही नव्हतं. तरीही तो इतकी वर्षं खेळला. नुसताच खेळला नाही, तर जागतिक आणि भारतीय क्रिकेटमधला एक अढळ तारा बनला.

सुरवातीला तर राहुलचा खेळ एकदम डोक्‍यातच जायचा. तो काळच होता तसा. सचिन आघाडीपासून धडाक्‍यात आक्रमण करतोय, "गॉड ऑफ ऑफसाईड' गांगुली त्याला तोलामोलानं साथ देतोय, अजय जडेजाचं 'रनिंग बिटविन द विकेट्‌स' भुरळ घालतंय अशा काळामध्ये क्षेत्ररक्षक कुठे उभा आहे, हे अचूक ओळखल्यासारखं नेमका त्याच्याचकडे फटका मारणारा राहुल संथ वाटणं साहजिकच होतं. रोमेश कालुवितरणा-सनथ जयसूर्या जोडीनं फटकेबाजीचे नवनवे नमुने दाखवल्यानंतर आपल्याही फलंदाजांनी असंच खेळावं, असं वाटत असलं तर त्यात नवल असं काहीच नव्हतं. राहुलची फलंदाजी त्यावेळी रटाळ वाटायची. काही प्रमाणात तसं होतंही..

कारकिर्दीच्या सुरवातीला राहुल 'वनडे'चा खेळाडू नक्कीच नव्हता. कसोटीध्ये भरपूर चेंडू वाया घालवायला मिळतात म्हणून तिथे खेळत असेल, असं वाटायचं. सातत्यानं त्याच्यावर टीका झाली, होत होती. पण त्या पठ्ठ्यानं आपली जबाबदारी पार पाडणं कधीही सोडलं नाही.

अनेकदा एखाद्यावर आपण इतकं रागवत असतो, की कालांतरानं त्याचं तसं असणं, हीच आपली गरज बनते. राहुलचंही तसंच काहीसं होतं. सगळ्यांच्या शिव्या खाऊनही राहुल तिथेच होता. सचिन-सौरव सलामीला, त्यानंतर राहुल या 'बॅटिंग ऑर्डर'चीही सवय होत गेली. आघाडीचे फलंदाज बाद झाले, डाव गडगडला की 'स्कोअर बोर्ड' पाहताना जाणवायचं, की अरे, एकटा राहुलच टिकून होता. 'टिकण्याचं' महत्त्व काय, हे कदाचित राहुलशिवाय कुणीच सांगू शकणार नाही.

राहुलचं क्रिकेटमधलं स्थान काय? त्याचे समकालीन खेळाडू राहुलविषयी किती आदरानं बोलतात, हे नव्यानं सांगायची गरजच नाही. आम्हा सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींसाठी राहुलचं महत्त्व कुठल्याही आकडेवारीपेक्षा कितीतरी मोठं आहे. सचिनच्या कसोटीमध्ये 14 हजार धावा आहेत, म्हणून कदाचित राहुलच्या 12 हजार धावा कमी वाटतात. पण तसं नाहीये. आपण चाहतेच खेळाडूंमध्ये शर्यती लावतो, आपणच त्याला नंबर देतो आणि आपल्या आवडत्या खेळाडूला वर दाखवण्यासाठी इतरांना छोटं दाखवायचा प्रयत्न करतो. पण याची खरंच गरज आहे?

धीरोदत्त, शांत आणि खंबीर राहुलची प्रतिमा कायमच मनात राहिली. 'टीम मॅन' म्हणजे काय, असं कुणाला शिकवायचं असेल, तर फक्त राहुलची कारकिर्द अभ्यासायला द्या. सलामीला यायचंय? राहुल आहे, लवकर विकेट पडल्यात? राहुल आहे, यष्टिरक्षक हवाय? राहुल आहेच... अशी कुठली गोष्ट होती, जी राहुलनं केली नाही? संघासाठी कुठलीही भूमिका कुठलीही तक्रार न करता त्यानं निभावली. पण हे तो कायमच करत आला आहे.  राहुलचं 'टायमिंग' ही सर्वांसाठीच कायम कौतुकास्पद गोष्ट होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशानंतर त्यानं निवृत्तीचं 'टायमिंग'ही अगदी अचूक पकडलं. त्याच्यासारखा खेळाडू पुन्हा होणे नाही, अशी भावना सचिननं व्यक्त केली होती. गेली 16 वर्षं एकत्र खेळणाऱ्या राहुलविषयी सचिननंच ही भावना व्यक्त केल्यावर आणखी काही शिल्लक राहते?

राहुल 'अनसंग हिरो' आहेच.. राहुलकडे पाहताना कायमच एक आधाराची भावना मनात येत असे. अनेक खेळाडू येतात आणि निवृत्तही होतात. पण ज्याच्या निवृत्तीनंतर डोळे पाणावतील, असे खेळाडू नक्कीच कमी असतात. राहुल त्यांच्यापैकीच एक होता... त्याच्या निवृत्तीनंतर ट्विटरवर आलेल्या प्रतिक्रियांपैकी एक प्रतिक्रिया खरंच सुंदर होती. त्यात म्हटलं होतं, "आता क्रिकेटचं 'जंटलमेन्स गेम' हे विशेषण काढून टाकायला हवं. 'द जंटलमन' राहुल आता खेळणार नाही...!'' 

आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपल्यानंतरही कोणताही गाजावाजा न करता युवा आणि नवोदित खेळाडूंना घडविण्याचे महान काम त्याने आता हाती घेतले आहे. भारतीय क्रिकेटच्या या अनसंग हिरोला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! 

संबंधित बातम्या