सदोष खेळ सिंधूची पाठ सोडेना

वृत्तसंस्था
Thursday, 4 April 2019

सिंधूच्या यशाची टक्केवारी घटली
जागतिक क्रमवारीतील अव्वल दहा बॅडमिंटनपटूंची या वर्षातील यशाची सरासरी बघितल्यास त्यात सिंधूची यशाची टक्केवारी सर्वांत कमी म्हणजे 62.50 टक्के आहे. आश्‍चर्य म्हणजे त्यात साईनाची सरासरी 83.33 टक्के आहे. सिंधूची डोकेदुखी ठरलेल्या सुंगची 63.63 टक्के. सर्वोत्तम 92.85 टक्के यश चेन युफीए हिचे आहे.

क्वालालम्पूर/ मुंबई : सदोष खेळ पी. व्ही. सिंधूची पाठ सोडण्यास तयार नाही. राष्ट्रीय स्पर्धेपासून हा त्रास तिला होत आहे, त्याचा फटका आता ऑल इंग्लंडपाठोपाठ मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतही बसला आहे. दरम्यान, किदांबी श्रीकांतने दुसऱ्या फेरीची लढत दोन गेममध्ये जिंकत भारताचे आव्हान कायम राखले आहे.
सिंधूच्या पराभवामुळे संयोजकही निराश झाले असतील. पहिले दोन दिवस सिंधू, तसेच साईना नेहवालच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. दोघींच्या मैदानाबाहेरील फोटोसोबत सेल्फीही घेतले जात होते. मात्र दोघींचेही आव्हान आता संपुष्टात आले आहे. सिंधूला ऑल इंग्लंड स्पर्धेच्या पहिल्या फेरीत दक्षिण कोरियाच्या सुंग जि ह्यून हिने पराजित केले होते. सुंगने याच निकालाची पुनरावृत्ती केली. या वेळी सिंधू 18-21, 7-21 अशी पराभूत झाली. आठव्या मानांकित श्रीकांतने थायलंडच्या खॉशित फेतप्रादाब याला 21-11, 21-15 असे पराजित करीत आगेकूच केली.

सुंगपेक्षा जागतिक क्रमवारीत सिंधू सध्या सरस आहे; पण सुंग काही वर्षांपूर्वी जागतिक क्रमवारीत दुसरी होती. तिने सिंधूविरुद्धच्या सलग तीन लढती जिंकल्या आहेत. सिंधूने गतवर्षी जागतिक स्पर्धेत सुंगला हरवले होते, त्यानंतर सिंधूची पीछेहाटच झाली आहे.
खरंतर सिंधूची सुरवात या वेळी चांगली होती, तिने आक्रमण करीत पकडही घेतली असे वाटले. मात्र सुंगने प्रतिआक्रमणाऐवजी सिंधूला रॅली करण्यास भाग पाडले. त्यातच सिंधूचा शटलचा अंदाजही चुकण्यास सुरवात झाली. बॅकलाइन तिला जास्तच सतावत होती. सलग दोनदा तिचा शटलबाबतचा अंदाज चुकला. याच दोन चुकांमुळे तिने पहिला गेम गमावला. याच प्रकारच्या चुकांचा तिला राष्ट्रीय स्पर्धेत, ऑल इंग्लंडमध्येही फटका बसला होता.

सिंधूच्याच शेजारील कोर्टवर श्रीकांतची लढत होती; पण त्याने सिंधूच्या अपयशाचा खेळावर परिणाम होऊ दिला नाही. त्याने नेटजवळ सुंदर खेळ केला, तसेच प्रतिस्पर्धीस बॅकलाइनला नेल्यावर केलेले ड्रॉप्सही सुरेख होते. पहिल्या फेरीच्या तुलनेत त्याचा खेळ नक्कीच सरस झाला होता. दरम्यान, पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला केंतो मोमोता आशियाई क्रीडा विजेत्या जोनातन ख्रिस्तीविरुद्ध दोन गेममध्येच पराजित झाला. ही लढत श्रीकांतच्याच भागातील होती. श्रीकांत आणि चेन लॉंग लढतीचा विजेता आता ख्रिस्ती-व्हिक्‍टर ऍक्‍सेलसेन यांच्यातील विजेत्याशी खेळणार आहे.

सिंधूच्या यशाची टक्केवारी घटली
जागतिक क्रमवारीतील अव्वल दहा बॅडमिंटनपटूंची या वर्षातील यशाची सरासरी बघितल्यास त्यात सिंधूची यशाची टक्केवारी सर्वांत कमी म्हणजे 62.50 टक्के आहे. आश्‍चर्य म्हणजे त्यात साईनाची सरासरी 83.33 टक्के आहे. सिंधूची डोकेदुखी ठरलेल्या सुंगची 63.63 टक्के. सर्वोत्तम 92.85 टक्के यश चेन युफीए हिचे आहे.

संबंधित बातम्या