ऑल इंग्लंड बॅडमिंटन : साईना, सिंधूसाठी ड्रॉ खडतर 

वृत्तसंस्था
Tuesday, 5 March 2019

ऑलिंपिक आणि जागतिक रौप्यविजेत्या सिंधूची सलामी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या सुंग जी ह्यूनविरुद्ध होईल. सिंधूने सुंगविरुद्ध 8-6 असे वर्चस्व राखले असले तरी 14 लढतींत तिला झगडावे लागले आहे. गेल्या वर्षी तीन पैकी दोन लढतींत सिंधू हरली. ही लढत जिंकल्यास दुसऱ्या फेरीत सिंधूसमोर रशियाची एवगेनिया कोसेत्सकाया आणि हॉंगकॉंगची चेयूंग एन्गान यी यांच्यातील विजयी खेळाडूचे आव्हान असेल.

बर्मिंगहॅम : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. ड्रॉ आव्हानात्मक असूनही साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू 18 वर्षांच्या खंडानंतर भारताला ऑल इंग्लंड जेतेपद मिळवून देणार का, याची उत्सुकता आहे. 
साईना व सिंधूचा सध्याचा मेंटॉर आणि मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पी. गोपीचंद याच्या 2001 मधील यशानंतर भारताला या यशाची प्रतीक्षा आहे. जागतिक क्रमवारीतील पहिले 32 खेळाडू या स्पर्धेला पात्र ठरतात. त्यानुसार केवळ तीन भारतीयांना मानांकन आहे. सिंधूला पाचवे, साईनाला आठवे, तर किदांबी श्रीकांतला सातवे मानांकन आहे. 

ऑलिंपिक आणि जागतिक रौप्यविजेत्या सिंधूची सलामी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या सुंग जी ह्यूनविरुद्ध होईल. सिंधूने सुंगविरुद्ध 8-6 असे वर्चस्व राखले असले तरी 14 लढतींत तिला झगडावे लागले आहे. गेल्या वर्षी तीन पैकी दोन लढतींत सिंधू हरली. ही लढत जिंकल्यास दुसऱ्या फेरीत सिंधूसमोर रशियाची एवगेनिया कोसेत्सकाया आणि हॉंगकॉंगची चेयूंग एन्गान यी यांच्यातील विजयी खेळाडूचे आव्हान असेल. ड्रॉनुसार निकाल लागले तर तृतीय मानांकित चीनची चेन युफेई तिची प्रतिस्पर्धी असू शकते. चायना ओपनमध्ये चेनने तिला हरविले होते. चेनने सात लढतींत 4-3 अशी सरस कामगिरी केली आहे. सिंधूने मागील वर्षी उपांत्य फेरी गाठली होती. 

साईनासमोर स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिल्मोरचे आव्हान असेल. क्रिस्टीविरुद्ध तिने सर्व सहा सामने जिंकले आहेत. साईनाने 2015 मध्ये अंतिम फेरी गाठली होती, पण ती उपविजेती ठरली होती. यंदा साईनाला चांगला फॉर्म मिळाला आहे. जानेवारीत तिने इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकली, तर नुकतेच सिंधूला हरवून राष्ट्रीय जेतेपद जिंकले. साईना 29 वर्षांची आहे. पहिली फेरी जिंकल्यास तिच्यासमोर डेन्मार्कची लिने होमार्क कॅएर्सफेल्ट आणि चीनची काई यानयान यांच्यातील विजयी स्पर्धकाचे आव्हान असेल. लिनेविरुद्ध तिने हुकूमत राखली आहे, तर 19 वर्षीय काईविरुद्ध ती अद्याप खेळलेली नाही. ड्रॉनुसार ताई त्झू यिंग तिच्या मार्गातील पहिला मोठा अडसर ठरू शकेल. ताईविरुद्ध ती सलग 12 वेळा हरली आहे. एकूण लढतींत साईना 5 विजय-14 पराभव अशी पिछाडीवर आहे. 

श्रीकांतसमोर फ्रान्सच्या प्राइस लेव्हर्डेझ याचे आव्हान असेल. मागील मोसम श्रीकांतसाठी खराब गेला. यंदा मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम फॉर्म मिळविण्याची त्याला आशा असेल.

संबंधित बातम्या