पैशांअभावी पाकिस्तानचा संघ 'वर्ल्ड कप'मधून बाहेर?

वृत्तसंस्था
Thursday, 8 November 2018

तब्बल चार वेळा जगज्जेता ठरलेल्या पाकिस्तानच्या हॉकी संघावर 28 नोव्हेंबरपासून होणाऱ्या विश्वकरंडकातून पैशांअभावी माघार घेण्याची नामुष्की पत्करावी लागण्याची दाट शक्यता आहे.

इस्लामाबाद : तब्बल चार वेळा जगज्जेता ठरलेल्या पाकिस्तानच्या हॉकी संघावर 28 नोव्हेंबरपासून होणाऱ्या विश्वकरंडकातून पैशांअभावी माघार घेण्याची नामुष्की पत्करावी लागण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट संघटनेने (पीसीबी) हॉकी संघाला विश्वकरंडकासाठी आर्थिक मदत नाकारल्याने त्यांच्या हॉकी संघाच्या विश्वकरंडकातील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

येत्या 28 नोव्हेंबरपासून भारतात होत असलेल्या हॉकी विश्वकरंडक स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या संघाला पीसीबीकडून आर्थिक मदत केली जाणार होती. मात्र विश्वकरंडक स्पर्धा अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपला असताना पीसीबीने हॉकीच्या संघाला आर्थिक मदत करणार नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे आता या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक निधी गोळा करण्यासाठी इतरत्र हात पसरण्याची वेळ पाकिस्तानच्या हॉकी संघटनेवर आली आहे.

या सर्व घटनाक्रमामुळे विश्वकरंडक हॉकी स्पर्धेतील पाकिस्तानचा सहभाग अधांतरी झाला आहे. 

पाकिस्तान हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक ताकीर दार आणि व्यवस्थापक हसन सरदार यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाचे अध्यक्ष एहसान मनी यांच्याशी चर्चा करुन हॉकी संघाचा विश्वकरंडकासाठी कर्ज देण्याची विनंती केली होती.

''एहसान मनी हे आम्हाला गुरुवारी भेटणार होते. मात्र, त्यांनी फोन करुन आमच्याशी संवाद साधला. हॉकी संघाने 2000 मध्ये लेफ्टनंट जनरल निवृत्त ताकीर झिया यांच्या कालावधीत घेतलेले कर्ज फेडलेले नसल्याने 
पीसीबी आता हॉकी संघाला नव्याने कर्ज देऊ शकत नाही', असे त्यांनी आम्हाला फोनवर सांगतिले,'' अशी माहिती दार यांनी दिली.

संबंधित बातम्या