दोन वर्षांनंतर जोकोविच अव्वल स्थानी

वृत्तसंस्था
Monday, 12 November 2018

सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने तब्बल दोन वर्षांनंतर जबरदस्त पुनरागमन करत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले. पाच महिन्यांपूर्वी त्याची जागतिक क्रमवारीत 12 वर्षांतील सर्वात नीचांकी स्थानावर घसरण झाली होती.

पॅरिस : सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने तब्बल दोन वर्षांनंतर जबरदस्त पुनरागमन करत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले. पाच महिन्यांपूर्वी त्याची जागतिक क्रमवारीत 12 वर्षांतील सर्वात नीचांकी स्थानावर घसरण झाली होती. मात्र यंदाच्या वर्षात 14 विजेतेपदं पटकावत त्याने अवव्ल स्थानावर झेप मारली.  

जानेवारीमध्ये त्याच्या कोपऱ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याची जागतिक क्रमवारीत 22 व्या स्थानावर घसरण झाली होती. मात्र साऱ्या अडचणींवर मात करत त्याने कारकिर्दीतील चौथे विंबल्डन विजेतेपद पटकाविले तर सप्टेंबरमध्ये अमेरिकन ओपनचेही विजेतेपद पटकाविले. 

 

नुकत्याच जाहीर झालेल्या एटीपी क्रमवारीत स्पेनच्या राफेल नदालला मागे टाकत, जोकोविचने पहिले स्थान पटकाविले. नुकत्याच झालेल्या पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारत त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान निश्चित केले. मात्र त्याला अंतिम फेरीत रशियाच्या कैरन खाचानोवविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. 

स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररने आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. गेल्या १४ वर्षात एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानावर फक्त जोकोविच, नदाल, फेडरर आणि मरे या ‘बिग फोर’ खेळाडूंचेच वर्चस्व राहिले आहे. 

''गेल्या वर्षात दुखापतीमुळे मी जे भोगले आहे त्यानंतर मिळालेले हे यश अविश्वसनीय आहे. ही कामगिरी अत्यंत आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. पाच महिन्यांपूर्वी हे सर्व अशक्य वाटतं होते,'' असे मत त्याने व्यक्त केले. 
 

संबंधित बातम्या