राज्य क्रीडा महोत्सवाचा बहुमान; मैदानांअभावी विद्यापीठाची होतेय धावपळ

अलताफ कडकाले
Monday, 8 April 2019

ज्य क्रीडा महोत्सवाचे यजमानपद यंदा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला मिळाले आहे. मात्र, विद्यापीठाकडे मैदानांची उपलब्धताच नाही. ​

सोलापूर : राज्य क्रीडा महोत्सवाचे यजमानपद यंदा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला मिळाले आहे. मात्र, विद्यापीठाकडे मैदानांची उपलब्धताच नाही. तसेच महोत्सवाची तारीख जवळ येत असल्याने मैदानांअभावी विद्यापीठातील प्रशासनाची धावपळ होत असल्याचे सध्या चित्र आहे. मैदाने तयार करण्यापासूनचे नियोजन सोलापूर विद्यापीठाला करावे लागत असल्याने स्पर्धा पार पाडण्यासाठी मोठी पराकाष्टा करावी लागणार आहे. 

महाविद्यालयीन जीवनातील क्रीडा क्षेत्रात मानाचा असणारा 2019 चा राज्य क्रीडा महोत्सव पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात होणार आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा महोत्सव आयोजनाच्या पूर्व तयारीची पहिली बैठक नुकतीच विद्यापीठाच्या सिनेट हॉलमध्ये झाली. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, कुलसचिव डॉ. विकास घुटे, क्रीडा संचालक डॉ. सुरेश पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. एच. के. आवताडे, डॉ. तानाजी कोळेकर, भगवान अधटराव, अश्‍विनी चव्हाण, ऍड. एन. एस. मंकणी, डॉ. माया पाटील, विद्यार्थी कल्याण मंडळाचे डॉ. वसंत कोरे, डॉ. प्रभाकर कोळेकर, निमंत्रित सदस्य डॉ. प्रदीप देशमुख, डॉ. सुरेश लांडगे, हिराचंद नेमचंद कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पराग शाहा, विद्यापीठ क्रीडा बोर्डाचे सदस्य तथा सिनेट सदस्य प्रा. सचिन गायकवाड, डॉ. किरण चौगुले, डॉ. नंदकुमार देशपांडे, प्रा. आनंद चव्हाण, प्रा. संतोष गवळी, प्रा. डॉ. किरण चोकाककर आदी उपस्थित होते. 

विद्यापीठाकडे कोणत्याही प्रकारच्या मैदानाची उपलब्धता नाही. स्पर्धकांच्या निवासाचीही ठोस व्यवस्था नसल्याने विविध उप समित्या गठित करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी क्रीडा विभागाची सुधारणा होण्यासाठी यापुढे नियोजनाच्या बैठका वेळेवर घेतल्या जातील. तसेच, खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्याबाबत प्रयत्न करू, असे सांगितले. प्रास्ताविकामध्ये क्रीडा संचालक डॉ. सुरेश पवार यांनी राज्य क्रीडा महोत्सव आयोजन संदर्भात माहिती दिली. 

सिंहगडवर निवासाची जबाबदारी 
विद्यापीठाच्या अडचणीवेळी धावून येणाऱ्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयावर विद्यापीठ प्रशासनाने राज्य क्रीडा महोत्सवात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसह प्रशिक्षकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी सोपविण्याचे नियोजन केले असून "सिंहगड' ही जबाबदारी पार पाडण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी सिंहगड अभियांत्रिकीने युवा महोत्सवाचे यजमानपद स्वीकारून विद्यापीठाला सहकार्य केले होते. 

राज्य क्रीडा महोत्सवासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद विद्यापीठाच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. नवीन मैदाने तयार करण्यासाठी तांत्रिक समित्या स्थापून कामाला सुरवात करणार आहे. तसेच, क्रीडा महोत्सव चांगला झाला पाहिजे याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. यासाठी आपण सर्वांनी क्रीडा समितीमध्ये चांगले काम करावे, जेणेकरून या स्पर्धा व्यवस्थित पार पडतील. 
- डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू 

सोलापूर विद्यापीठाचा क्रीडा विभागाचा 14 वर्षांचा "बॅकलॉग" कुलगुरूंनी भरून काढावा. विद्यापीठातील आधुनिक मैदाने, खेळाडूंच्या प्रवासाची समस्या, विद्यापीठातच सराव शिबिराची व्यवस्था, अपूर्ण ऍथलेटिक्‍स ट्रॅकचा प्रश्‍न, सर्वसमावेशक क्रीडा महोत्सवाच्या तयारीत लक्ष नाही या समस्या असून यावर विद्यापीठाने पूर्व खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. 
-प्रा. सचिन गायकवाड, सिनेट सदस्य, सुटा संघटना

संबंधित बातम्या