धावतोय म्हणून मेजवानी झोडायची परवानगी नाहीच! 

निखिल शहा 
Thursday, 6 December 2018

धावपटूंना सर्वाधिक गरज असते ती कार्बोहायड्रेट्‌सची, जे तुम्हाला पोळी, भात आणि भाज्यांमधून मिळते. त्यामुळे भरपूर भाज्या खा. त्या चावून खाव्या लागतात. त्यातून भरपूर कार्बाहायड्रेट्‌स मिळतील. कमी तेलात शिजविलेल्या भाज्या खाणे उपयुक्त ठरते. 

धावपटूंनी कोणता आहार घ्यावा, याविषयी बरीच चर्चा सुरू असते. परदेशी धावपटू पास्ता खातात याचा अर्थ आपणही तोच खायचा असे अजिबात नाही. ती मंडळी लहानपणापासून जे खातात तेच खातात.

आपण पोळी-भाजी, भात-आमटी, भाकरी, दही असे पदार्थ कित्येक पिढ्यांपासून खात आलो आहोत. आपल्या पोटाला अशाच अन्नाची सवय आहे. आपण तेच खायला हवे. हॉटेलमध्ये जास्त खाणे म्हणजे वजनवाढीला आणि आजारपणाला आमंत्रण देणे होय. तुम्ही स्वतःसाठी मार्केटमध्ये भाजी आणायला जाता तेव्हा ती सेंद्रिय आहे की ताजी आहे की नाही हे पाहता. हॉटेलवाल्यांना अशी निवडानिवडी करायला वेळ आहे असे तुम्हाला वाटते का? 

कोणतेही वर्कआउट करताना कमकुवत स्नायूंची जागा भक्कम स्नायू घेतात हे आपण या स्तंभातून वेळोवेळी जाणून घेतले आहे. ही प्रक्रिया घडताना आपले शरीर विविध स्रोत वापरत असते. अशावेळी तुम्ही बाहेर खाल्ले तर संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे शर्यतीच्या सरावाच्या कालावधीत तुम्ही घरातले ताजे, स्वच्छ, शुद्ध अन्न खाल्लेलेच योग्य ठरते. 

धावपटूंना सर्वाधिक गरज असते ती कार्बोहायड्रेट्‌सची, जे तुम्हाला पोळी, भात आणि भाज्यांमधून मिळते. त्यामुळे भरपूर भाज्या खा. त्या चावून खाव्या लागतात. त्यातून भरपूर कार्बाहायड्रेट्‌स मिळतील. कमी तेलात शिजविलेल्या भाज्या खाणे उपयुक्त ठरते. 

किती खायचे हेसुद्धा महत्त्वाचे असते. अनेकदा असे होते की सरावामुळे आपण बरीच एनर्जी खर्च केली आहे. त्यामुळे जास्त खाल्ले तरी चालेल असा समज आपण करून घेतो. तुम्ही मांसाहार करीत असाल तर चालू शकते; पण अगदी डझनभर अंडी खायची गरज नाही. 

धावलो म्हणजे मेजवानी झोडायला मोकळे, असे अजिबात नाही. याचे सोपे गणित सांगतो. तुम्ही 30 मिनिटे धावलात तर एक पोळी जादा खाऊ शकता. त्यापेक्षा जास्त नाही! आणखी एक सल्ला म्हणजे "ड्रिंक्‍स' घेणे टाळा. त्यामुळे स्नायूवर्धनाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. त्यातून तुमची दुसऱ्या दिवसाची धाव बिघडू शकते. दोन जेवणाच्या मधे साखर किंवा स्नॅक्‍स घ्यायचे नाहीत. 
(लेखक मॅरेथॉनपटू, संयोजक, मार्गदर्शक आहेत)

संबंधित बातम्या